बुडापेस्ट

बुडापेस्ट ही हंगेरी या छोटय़ा देशाची राजधानी. डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या या शहराची वस्ती या नदीने दुभागली आहे.

बुडापेस्ट ही हंगेरी या छोटय़ा देशाची राजधानी. डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या या शहराची वस्ती या नदीने दुभागली आहे. डाव्या किनाऱ्यावरील वस्तीला बुडा तर उजव्या किनाऱ्यावरील वस्तीला पेस्ट म्हणतात. मिळून शहराचे नाव झाले बुडापेस्ट. बऱ्याच वेळा बुडापेस्टचे वर्णन ‘मध्य युरोपाचे छोटे पॅरिस’ असे केले जाते. पूर्व आणि पश्चिम युरोपला जोडणाऱ्या मार्गापकी एका महत्त्वाच्या मार्गावर बुडापेस्ट असल्यामुळे या शहरावर परकीयांची आक्रमणे बऱ्याच वेळा झाली. इ.स.पूर्व काळात सेल्टिक वंशाच्या लोकांनी वसवलेल्या छोटय़ा पाडय़ाचे रूपांतर पुढे दुसऱ्या शतकात रोमन लोकांच्या लष्करी छावणीत, ‘अक्विंकम’मध्ये झाले. रोमनांनी त्या भागात उभ्या केलेल्या शहरात रस्ते, इमारती बांधल्या. नवव्या शतकात अर्पाड या हंगेरियन तरुणाने अक्विंकम घेऊन स्वतची सेना उभी केली. दहाव्या शतकाअखेरीस येथे हंगेरीचे राज्य प्रस्थापित होऊन या शहराचे नाव बुडापेस्ट झाले. रोमन लोकांनी या प्रदेशावर चार शतके राज्य केल्यामुळे या शहरात आजही रोमन शैलीच्या स्थापत्याचे अवशेष शिल्लक आहेत. पुढे बुडापेस्टवर काही काळ मंगोलियन लोकांनी राज्य केले तर सोळाव्या शतकात अटोमन तुर्कानी बुडापेस्टवर आपला अमल गाजवला. तुर्काच्या पाठोपाठ ऑस्ट्रियाच्या हॉप्सबर्ग सम्राटांनी काही काळ बुडापेस्ट आपल्या ताब्यात ठेवले. हॉप्सबर्ग साम्राज्यात बुडापेस्टचा आíथक विकास झाला. पुढे १८६७ साली ऑस्ट्रिया-हंगेरी यांचे संयुक्त साम्राज्य बनून काही काळ बुडापेस्ट या साम्राज्याची राजधानी होती. १९१९ साली हंगेरियन तरुण बेला कून याच्या नेतृत्वाखाली बुडापेस्टमध्ये कम्युनिझमची चळवळ सुरू झाली. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ साली बुडापेस्टमध्ये कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आले. पुढे ४० वर्षांनी कम्युनिस्ट चळवळ खिळखिळी होऊन १९८९ साली बुडापेस्टमध्ये प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले. ४० वर्षांच्या कम्युनिस्ट राजवटीच्या काळात बुडापेस्ट आणि हंगेरीची आíथक पीछेहाट होऊन इतर देशांच्या तुलनेत विकास कमी झाला. तसेच दुसऱ्या महायुद्ध काळातही बुडापेस्टने मोठी झळ सोसली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

द्राक्षे : मूळची भारतीय

कॅलिफोíनया विद्यापीठाच्या रीवर्साइड येथील वनस्पती उद्यानाच्या मळ्यात द्राक्षाच्या शेकडो वेली पारदर्शक प्लास्टिकच्या चेम्बरमध्ये वाढताना दिसल्या. हवेतील प्रदूषकांचा द्राक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला तर त्यांच्यापासून तयार होणाऱ्या वाइनच्या गुणांवरही परिणाम होईल. असे होऊ नये म्हणून चेंबरमधली हवा सर्व दृष्टीने – तापमान, आद्र्रता इत्यादी दृष्टीने सामान्य राखली होती. त्यात बाहेरच्या हवेतील प्रदूषकांना प्रवेश नव्हता.

‘तुमच्या फळबागांची तुम्ही किती काळजी घेता’ असे म्हटल्याबरोबर तेथील बागाईतदाराने सांगितले की ‘‘द्राक्ष मळ्यावर या भागातील शेकडो कुटुंबे अवलंबून आहेत. एवढेच नव्हे तर या क्षेत्राचे अस्तित्वच या व्यापारावर अवलंबून आहे. म्हणून आम्ही या मूळच्या भारतीय वनस्पतीच्या अमेरिकन पिकाची काळजी घेतो.’’

‘भारतीय?’ मी विचारले. ‘‘होय, विश्वास नसेल तर चला माझ्या बरोबर.’’ तो संशोधक-बागायतदार, स्टीव्हन मंचेसटर, मला ग्रंथालयात घेऊन गेला. त्याने काही अंक माझ्यासमोर टाकले, एक लेख दाखवला. त्यातील द्राक्षाच्या अश्मीभूत बीचा फोटो दाखवला. त्या बीचे नाव त्याने ‘इंडोवाइटीस चितळेई’ आहे असे सांगितले. ‘‘हे आहेत जगातल्या सर्वात जुन्या द्राक्षाच्या बीचे अवशेष. भारतातल्या वैज्ञानिक डॉ. चितळे यांना हे बी दख्खनच्या डोंगरातल्या मातीच्या थरात सापडले. म्हणून हे नाव.’’

सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी भारत म्हणजे टेथिस महासागराच्या दक्षिण गोलार्धातले एक बेट होते. सुमारे आठ कोटी वर्षांपूर्वी सफरचंद, अक्रोड अशा गुलाबकुलातून फुटून द्राक्षाचे कूळ निर्माण झाले. असे या वनस्पतींच्या जनुकांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. दक्षिण गोलार्धातल्या भारत द्वीपकल्पातील वनस्पती-वैविध्यावर या संशोधनामुळे प्रकाश पडतो. पाच कोटी वर्षांपूर्वी हे द्वीपकल्प युरेशिया खंडाशी संलग्न झाले. त्यानंतर त्या वेळच्या द्राक्षांच्या बिया पक्ष्यांच्या मदतीने युरोपात पोचल्या. स्थानिक परिस्थितीला अनुसरून द्राक्षांचे अनेक प्रकार निर्माण झाले. साधारणपणे द्राक्षाचे मूळ आम्रेनिया (रशियातील ब्लाक आणि कास्पिअन समुद्राजवळ) समजले जाते, त्याला या संशोधनामुळे छेद जातो.

यथावकाश द्राक्षे युरोपियन झाली, वाइनसाठी द्राक्षांचे मोठमोठे मळे दिसू लागले. तेथून त्यांचा प्रवास अमेरिकेत झाला. या अश्मीभूत बियांचे नमुने क्लीवलेंड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे सन २००५ मध्ये ठेवले गेले.

 

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Budapest capital of hungary