सणासुदीला श्रीखंड, पुरणपोळी, गुलाबजाम, बासुंदी आदी पदार्थ आपण घरी बनवतो. परंतु कित्येक वर्षांपासून बर्फी, काला जामून, काजू कतली इत्यादी गोड पदार्थ बाजारातूनच विकत आणले जातात. या पदार्थांना दुग्धजन्य पदार्थ म्हटलं जातं. ते अधिक आकर्षक दिसावेत म्हणून त्यांच्यावरती चांदीचा अतिशय पातळ कागद ज्याला आपण ‘वर्ख’ म्हणतो, तो लावला जातो.

चांदी ही सूक्ष्मजीवांना नष्ट करत असली तरी, ती आपल्या शरीरात कोणतीही रासायनिक क्रिया करत नाही, तिला कोणतीही चव किंवा वास नसतो. म्हणूनच चांदीचा ‘वर्ख’ खाण्यायोग्य असतो. पदार्थ चमकदारही दिसतो. मुख्य म्हणजे चांदीच्या वर्खामुळे, पदार्थांवर बसणार्‍या हवेतील सूक्ष्म जीवजंतूंना अटकाव होतो. हवेतल्या दमटपणामुळे दुग्धजन्य पदार्थ लवकर ओलसर होतात आणि त्यावर आरोग्याला घातक सूक्ष्मजंतूंची वाढ लवकर होते. चांदीचा वर्ख लावल्यामुळे दमटपणाही रोखला जातो आणि सूक्ष्मजीवही नष्ट केले जातात. गोड पदार्थावर आवरण म्हणून वर्ख वापरला तरी पदार्थाच्या चवीत काहीही फरक पडत नाही.

चांदी ‘वर्धनीय’ असते म्हणजेच तिचा अगदी पातळ पत्रा तयार करता येतो. असा पातळ पत्रा तयार करण्याच्या प्रक्रियेवरून, वर्खाचे दोन प्रकार मोडतात. वर्ख तयार करण्यासाठी चांदीच्या पातळ पत्र्याचे, अगदी छोटे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे केले जातात. प्रत्येक तुकडा जनावरांच्या म्हणजे बैल, शेळी, मेंढी, बकरी इत्यादींच्या चामड्यांच्या तुकड्यांमध्ये घालून, एकावर एक ठेवून जवळ जवळ अडीच ते तीन तास, हातोडीने ठोकतात. मग त्या चांदीच्या पट्टीच्या तुकड्याचं रूपांतर अत्यंत पातळ वर्खात होतं. याला ‘मांसाहारी वर्ख’ म्हणतात.

भारत सरकारद्वारे २०१६ साली, अशा प्रकारे बनवल्या जाणार्‍या चांदीच्या वर्खावर बंदी घातली गेली. तेव्हापासून हा वर्ख बटरपेपरला, खाण्यायोग्य कॅल्शियम कार्बोनेटची पांढरी पावडर लावून त्यामध्ये चांदीच्या पट्टीचे तुकडे ठेवून, यंत्राद्वारे किंवा हाताने ठोकून तयार केला जातो. कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडरमुळे, हा ‘शाकाहारी वर्ख’ कागदाला चिकटत नाही.

चांदीचा वर्ख महाग असल्यामुळे, मिठाईची किंमतही वाढते. म्हणून काही वेळा व्यापारी, ॲल्युमिनियम, निकेल किंवा कॅडमियमसारख्या जड धातूपासून तयार केलेले, मात्र चांदीसदृश दिसणारे वर्खही वापरतात. असे वर्ख आरोग्यास हानिकारक असतात. मिठाईवर लावलेला वर्ख, हा शुद्ध चांदीचा आहे की अन्य धातूंचा, हे ओळखण्याच्या अनेक पद्धतींपैकी एक सोपी पद्धत आहे. वर्ख हाताला चिकटला नाही तर चांदीचा आणि चिकटला तर अन्य धातूंचा!
उर्मिला फडके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org