सोळाव्या आणि सतराव्या शतकांत भारतात आलेल्या फ्रान्सिस्कन, डोमिनिकन, जेसुइट, डॅनिश मिशनऱ्यांनी भारतीय भाषांचा आणि लिपींचा अभ्यास केला, अनेकांनी भारतीय जीवनशैली आत्मसात करून स्थानिक लोकांशी समरस होऊन इथे रमले, इथलेच झाले. फादर स्टीफन्स, फादर जुवांब द पेट्रोज वगरेंनी युरोपियन भाषांमधील ख्रिस्ती धर्मग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून पुस्तके लिहिली आणि छापून प्रसिद्ध केली; परंतु डॉ. ख्रिश्चन श्वार्ट्झ या डॅनिश मिशनऱ्याने मात्र त्या वेळच्या मद्रास प्रांतात राहून केलेली कामगिरी फारच वेगळी आहे.

त्याने भारतात येऊन मराठी, तमीळ आणि संस्कृत भाषा आणि त्यातील वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी जे प्रयत्न केले ते स्तिमित करणारे आहेत. श्वार्ट्झच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली तंजोर म्हणजेच तंजावूर येथील सरस्वती महाल ग्रंथालय उभे राहिले आहे! ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यासाठी भारतात आलेला हा मिशनरी मराठी आणि तमिळ भाषांच्या अभ्यासात आणि संवर्धनात एवढा रमला की आपले धर्मप्रसाराचे काम काही वेळा बाजूला सारून आयुष्याच्या अखेरीपर्यंत व्रतस्थपणे तेच करीत राहिला. आपल्या बहात्तर वर्षांच्या आयुष्यापैकी अखेरची ४८ वर्षे त्याने तंजावूर आणि ट्रांकेबार येथे व्यतीत करून तंजावरातच १७९८ साली देह ठेवला. मराठी, तमिळ आणि संस्कृत हस्तलिखिते जमवून त्यांच्या पुस्तकांचे मुद्रण करण्याची, तसेच तंजावरच्या राजाला अनेक वेळा संकटांमध्ये मदत करण्याची त्याची कामगिरी अतुलनीय आहे.

सध्याच्या तमीळनाडूतील नागपट्टिणम् जिल्ह्यतील ट्रांकेबार ऊर्फ तरंगमवाडी येथे डेन्मार्कचा राजा चौथा फ्रेडरिक याची वसाहत होती. व्यापार आणि धर्मप्रसार हे हेतू समोर ठेवून फ्रेडरिकने तंजावरच्या राजाकडून तरंगमबाडी हा परगणा विकत घेऊन तिथे डॅनिश मिशन सुरू केले. जन्माने जर्मन असलेल्या ख्रिश्चन फ्रेडरिक श्वार्ट्झ याची नियुक्ती प्रमुख मिशनरी म्हणून १७५० साली या मिशनमध्ये झाली. प्रथम त्याला पोर्तुगीज, जर्मन आणि डॅनिश याच भाषा येत होत्या. लोकांमध्ये मिळून मिसळून वागण्याच्या श्वार्ट्झच्या स्वभावामुळे, त्याने अल्पावधीतच तमिळ भाषेत संभाषण, लेखन यावर प्रभुत्व मिळवले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com