हवामान बदलाचे भीषण परिणाम विविध स्वरूपांनी समोर येत असूनही अजूनही काही लोकांचा या कल्पनेला विरोध आहे. यांना ‘क्लायमेट डीनायर्स’ असे म्हटले जाते. त्यांच्या मते समुद्रजलाची पातळी वाढत नाही. मात्र यासाठी लागणारे पुरावे त्यांना देता येत नाहीत. परंतु खात्रीलायक संशोधन करणाऱ्या निरनिराळय़ा संस्थांतील विदा हे दाखवून देते की समुद्राची पातळी नियमितपणे वाढत चालली आहे. केवळ निरीक्षणावर नाही तर संगणकाच्या साहाय्याने प्रारूप तयार करून ही जलपातळी कशी आणि किती वाढत चालली आहे याचे नेमके अंदाज देण्यात येत आहेत. मिठागराच्या खाजणात आणि अवसादाच्या आत अडकलेले सूक्ष्म जीवाश्म अभ्यासल्यावर हजारो वर्षांपूर्वी जी समुद्रजलाची पातळी होती त्याचा अंदाज लावता येतो. त्यावरून गेल्या तीन हजार वर्षांत ही पातळी विशेष बदलली नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीनंतरच्या कालखंडात याच समुद्र पातळीत झालेले लक्षणीय बदल गॉजेसच्या साहाय्याने आणि १९९० नंतर सॅटेलाइटच्या मदतीने शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहेत. सुरुवातीला प्रतिवर्षी केवळ ३ सेंटिमीटरने वाढणारी पातळी गेल्या २५ वर्षांत ७ सेंटिमीटरवर गेलेली आढळली. या वाढीचा वेग प्रतिवर्षी अधिकाधिक असल्याचे वूड्स होल सागरविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांचे मत आहे. आपणदेखील हे मुंबईसारख्या शहरात गेल्या ३०-३५ वर्षांत अनुभवले आहे. एके काळाची सुंदर दादर चौपाटी आता जवळजवळ नष्ट झालेली दिसते.
जागतिक स्तरावरील या समुद्रजलपातळीच्या वाढीची प्रमुख कारणे दोन- जागतिक तापमानवाढीमुळे कोमट होणारे सागर, ज्यामुळे त्यांचे औष्णिक प्रसरण होऊन ते अधिक जागा व्यापतात. दुसरे म्हणजे वितळत चाललेले हिमखंड, ज्यांचे पाणी सरतेशेवटी सागरार्पण होते. आक्र्टिक आणि अंटाक्र्टिका येथील हिम तर विलक्षण वेगाने नाहीसे होत आहे. म्हणूनच या शतकाच्या अंतापर्यंत सागरजल काही फुटाने वाढले असेल. याचा परिणाम म्हणजे किनाऱ्यालगतचे प्रदेश, बेटे पाण्याखाली जातील. मालदीव, कीरबाटी हे काही देश तर आता त्यांच्या नागरिकांच्या स्थलांतराचा विचार करू लागले आहेत. बांगलादेशचे अनेक भूप्रदेश समुद्राच्या खाऱ्या पाण्याने उजाड झाले आहेत. समुद्रजलाच्या पातळीच्या वाढीने शेतजमिनीचे क्षारीकरण होणे ही अन्नोत्पदनासाठी धोक्याची बाब आहे. आयपीसीसीच्या अहवालानुसार येत्या शतकात आपली मुंबई आणि कोलकाता पाण्याखाली गेलेले असतील. आपण हे थांबवायचे का?
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org