scorecardresearch

कुतूहल : रंग नेमका कोणता?

रंगाच्या आकलनाची समज जसजशी वाढेल तसतशा आणखी चांगल्या पद्धती पुढील भविष्यात येतील हे निश्चित!

रंगाचे वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांची ‘आंतरराष्ट्रीय दीपन (इल्ल्युमिनेशन) आयोग’ (‘सीआयई’) या नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जी वेळोवेळी रंग मापन व विनिर्देशन (स्पेसिफिकेशन) याची मानदे देत असते. ‘सीआयई’ने १९३१ मध्ये प्रथमच जगात सर्वमान्य अशी रंग मांडायची पद्धती दिली. तिला ‘१९३१’ सीआयई एक्स-वाय-झेड पद्धती’ असे म्हणतात. ‘एक्स-वाय-झेड’ या तीन आकडय़ांनी रंग दर्शवला जातो. यांना ‘तीन उद्दिपन किमती’ (ट्राय स्टिम्युलस व्हॅल्यूज) असे म्हणतात, ज्याचे मानद ‘सीआयई’ ने दिले आहे. यातील त्रुटी लक्षात घेत पुढे १९६४ व १९७६ साली वेगवेगळय़ा पद्धती मान्य केल्या गेल्या. ‘सीआयई एलएबी’ व ‘सीआयई एलयूव्ही’ या त्यातील काही पद्धती होत. या सर्व पद्धतीत रंग निर्देशन रंगाच्या अवकाशातील एका बिंदूने केले जाते. रंगाच्या आकलनाची समज जसजशी वाढेल तसतशा आणखी चांगल्या पद्धती पुढील भविष्यात येतील हे निश्चित!

उपकरण वापरून रंग निर्देशनाच्या पद्धतीव्यतिरिक्त जगात सर्वमान्य व अतिशय अचूक समजली जाणारी एक पद्धती म्हणजे ‘मुन्सेलची रंग-श्रेणी पद्धत’ (मुन्सेल कलर ऑर्डर सिस्टीम). या पद्धतीत रंगाचे त्रेमितिक रूप तीन गुणधर्माच्या आधारे निश्चित केले जाते. ते गुणधर्म आहेत, ह्यु, व्हॅल्यू आणि क्रोमा.

‘ह्यु’ रंगाच्या प्रकाशाच्या तरंगलांबीशी निगडित गुणधर्म आहे. तो रंगाची छटा दर्शवतो. आकाशाचा निळा रंग आणि सागराचा निळा रंग यांच्या छटा वेगळय़ा असतात, हे आपण जाणतोच.

‘व्हॅल्यू’ हे रंग किती गडद किंवा फिका आहे याचे मोजमाप आहे.

रंग किती निर्भेळ आहे, शुद्ध आहे याचे मोजमाप म्हणजे क्रोमा.

हे गुणधर्म निश्चित करून रंगाला विशिष्ट प्रकारे आकडे दिले जातात व सर्व रंग ‘मुन्सेल रंग-वृक्ष’ याच्या साहाय्याने मांडले जातात. ही एकमेव रंग पद्धती अशी आहे जी मानवी दृष्टीशी जवळीक साधते आणि जिच्यात कोणतेही नवीन बनवलेले रंग, पद्धतीच्या मांडणीत कोणतेही बदल न करता, आकडे देऊन समाविष्ट करता येतात.

यामुळेच आता मॅंचेस्टरमधील धाग्याचा रंग सुरतमध्ये जशाचा तसा तयार करणे शक्य झाले. जपानमधील गाडय़ांचे रंग भारतात सहजासहजी बनवता येऊ लागले. तसेच टनावारी बनणाऱ्या टोमॅटो सॉसचा रंग सर्व बाटल्यात अगदी जशाचा तसा ठेवता येतो. थोडक्यात एखाद्या वस्तूचे रंगसातत्य जगभर ठेवता येऊ लागले. आता संगणकाच्या सहाय्याने रंगाचे नियंत्रण अचूकपणे करता येऊ लागले आहे.

– डॉ. विनीता दि. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Color control with computer zws

ताज्या बातम्या