काही वाक्प्रचारांमध्ये अंक म्हणजे संख्या असतात. ‘पोबारा करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, पळ काढणे. यामागे एका खेळाचा संदर्भ आहे. पव किंवा पो म्हणजे खेळातल्या फाशावरची ‘एक’ या अर्थाची खूण होय. जेव्हा तीन फाशांपैकी एकावर १ हे दान येते व इतर दोहोंवर सहा, सहा ठिपके मिळून १२ असे दान पडते; तेव्हा एकूण दान १३ झाल्यामुळे सोंगटी दूर जाते. यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला.

‘चौदा चौकडय़ांचे राज्य’ या वाक्प्रचाराचा संदर्भ असा आहे- कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशा चार युगांचा मिळून होणारा काल म्हणजे एक चौकडी. अशा १४ चौकडय़ा होईपर्यंतचा काळ, त्यामुळे लक्षणेने अर्थ आहे अतिशय दीर्घकाळ टिकणारे, संपन्न राज्य. रावणाचे राज्य असे होते, असे मानले जाते.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
controversy over national language controversy over hindi language
चतु:सूत्र : राजभाषेचा वाद…
Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?

‘अठरा विसे दारिद्रय़ असणे’, याचा अर्थ आहे अत्यंत हलाखीची परिस्थिती असणे. मुळात ‘अठरा विसे’ असा शब्द असणार, असे डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी म्हटले आहे. (‘भाषा आणि जीवन’ त्रमासिक, वर्ष २७ अंक ३) त्यांच्या मते लोकभाषेत ‘विसा’ हा शब्द वीस या संख्येचे अनेकवचन म्हणून रूढ आहे. त्यामुळे १८ गुणिले २० म्हणजे ३६० दिवस अर्थातच वर्षभर दारिद्रय़ असे गणित जुळते.

‘छत्तिसाचा आकडा असणे’, हाही असाच एक वाक्प्रचार आहे. ३६ या संख्येत तीन आणि सहा हे आकडे परस्परांकडे पाठ करून असतात. संख्येच्या या दृश्यरूपामुळे वाक्प्रचाराचा अर्थ झाला आहे- शत्रुत्व असणे. यात गणिती अर्थ महत्त्वाचा नाही.

‘चौदावे रत्न दाखवणे’, या वाक्प्रचारामागे समुद्रमंथनाची पौराणिक गोष्ट आहे. समुद्रमंथनात चौदावे रत्न मिळाले, ते होते अमृत. मात्र त्या वेळी देव – दानव यांच्यात युद्ध झाले व दानवांना मार बसला. त्यामुळे चौदावे रत्न याचा अर्थ लक्षणेने ठरला चाबूक आणि या वाक्प्रचाराचा अर्थ रूढ झाला- चाबकाने मारणे, चोप देणे.

अशी ही अंकलिपी उलगडली, की त्यातील आकडय़ांची किंमत (अर्थपूर्णता) कळते.

– डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail. com