रंगीबेरंगी संगणकीय चित्रे मनाला आनंद देतात. परंतु कोणतेही चित्र संगणकावर तयार करताना अनेक सूक्ष्म ठिपक्यांच्या रांगोळीसारखे रेखाटले जाते आणि प्रत्येक बिंदूशी निगडित संख्या असतात असे समजल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. संगणकावर चित्र साठवताना त्याचे रूपांतर ‘संगणकीय अंकीय चित्रा’त (डिजिटल इमेज) केले जाते. चित्र म्हणजे अनेक सूक्ष्म बिंदूंसारख्या दिसणाऱ्या चौरसांचा म्हणजेच ‘चित्रपेशीं’चा (पिक्चर एलिमेंट-पिक्सेल) संच असतो. चित्राचे संगणकीय स्वरूप सारणीबद्ध असून त्यात स्तंभ आणि पंक्ती असतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे १० स्तंभ आणि १० पंक्तींच्या चित्र-सारणीमध्ये १० गुणिले १० = १०० चित्रपेशी असतील. चित्रपेशीचे सारणीमधील स्थान ओळखण्यासाठी निर्देशांक असतो. सारणीतील चित्रपेशींची संख्या जेवढी जास्त, तेवढे चित्र सुस्पष्ट!

प्रत्यक्षात चित्रपेशी म्हणजे केवळ बिंदू नसून लाल, हिरव्या आणि निळ्या (आरजीबी) रंगांचे संयोजन असते. तीनही रंग आठ-अंकी संख्येत द्विमान पद्धतीने लिहिले जातात. द्विमान पद्धतीत पाया दोन असल्याने रंगाच्या प्रत्येकी २८=२५६ रंगछटा दाखवता येतात ज्या ० ते २५५ पर्यंतच्या संख्यांनी दर्शवल्या जातात. चित्रात ‘रंगछटापट्टिका’ दाखवली आहे. रंगाची सगळ्यात गडद छटा ० तर सगळ्यात फिकट छटा २५५ समजली जाते. इतर रंगछटा ० आणि २५५च्या दरम्यानच्या संख्येने दर्शविल्या जातात. प्रत्येक चित्रपेशीचा रंग, अशा प्रकारे दिलेल्या त्रिक-संख्येवरून (ट्रिपलेट) ओळखता येतो. त्यामुळे एका चित्रपेशीकरिता २५६३=१,६७,७७,२१६ (दीड कोटीपेक्षा जास्त) संभाव्य रंगछटा असतात.

लाल, हिरवा आणि निळा हे रंग ० दर्शवीत असतील तर तीनही रंगांचे संयुक्त रूप सर्वात गडद असल्याने चित्रपेशीला ‘काळा’ (०, ०, ०) रंग दिला जाईल. तसेच तीनही रंग २५५ दर्शवीत असतील तर चित्रपेशीचा रंग सगळ्यात फिकट म्हणजेच ‘पांढरा’ (२५५, २५५, २५५) असेल. त्याचप्रमाणे लाल, हिरवा आणि निळा हे रंग अनुक्रमे (२५५, ०, ०), (०, २५५, ०) आणि (०, ०, २५५) लिहिले जातात. रंगाची त्रिक-संख्या द्विमान पद्धतीत लिहिताना काळ्या रंगाची चित्रपेशी (००००००००, ००००००००, ००००००००) अशी, तर पांढरी चित्रपेशी (११११११११, ११११११११, ११११११११) अशा प्रकारे संगणकात साठवली जाते. संपूर्ण चित्राची रंगछटा बदलून मूळ रंगापेक्षा गडद करायची असेल, तर ज्या तीव्रतेचा गडदपणा वाढवायचा आहे तेवढी संख्या प्रत्येक चित्रपेशीच्या त्रिक-संख्येतून ऋण केली जाते. रंगछटा फिकट करायची असेल, तर ज्या प्रमाणात रंग फिकट करायचे आहेत, त्याप्रमाणे संख्या त्रिक-संख्येत मिळवली जाते. असे आहे संगणकीय चित्रांमध्ये दडलेले संख्यारूप.

– वैशाली फाटक-काटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org