scorecardresearch

साम्ययोग : साक्षेपी समन्वय

भविष्यात धर्मसंस्थेला कशाची जोड हवी याबद्दलही त्यांच्या विचारात स्पष्टता दिसते. स्वधर्माविषयी आदर राखूनच त्यांनी धर्म समन्वयाची भूमिका मांडली.

विनोबांनी मांडलेला धर्मश्रद्धांचा समन्वय म्हणजे भाबडेपणा नव्हता. सगळे धर्म चांगलेच आहेत अशीही त्यांची भूमिका नव्हती. प्रत्येक धर्माचे गुण दोष ध्यानात घेऊन त्यांनी ही समन्वयाची भूमिका घेतली. हिंदू धर्माखेरीज अन्य धर्मांच्या संदर्भात विनोबांनी अत्यादराने लिहिले असले तरी त्या धर्मांच्या मर्यादाही ते जाणत होते आणि त्यांनी त्या स्पष्टपणे सांगितल्याचे दिसते. भविष्यात धर्मसंस्थेला कशाची जोड हवी याबद्दलही त्यांच्या विचारात स्पष्टता दिसते. स्वधर्माविषयी आदर राखूनच त्यांनी धर्म समन्वयाची भूमिका मांडली.

विनोबांना हिंदू धर्माबद्दल योग्य तो आदर होता.  हिंदू धर्माच्या अनुषंगाने ते लिहितात,

‘‘मला हिंदुधर्म का प्रिय आहे?

१. असंख्य सत्पुरुष, वामदेव, बुद्धदेव, ज्ञानदेव इत्यादि.

२. अनेक सामाजिक व वैयक्तिक संस्था;  संस्कार आणि आचार, यज्ञ आणि आश्रम, गोरक्षण इत्यादि.

३. शाश्वत नीतितत्त्वे; अहिंसा, सत्य इत्यादि.

४. सूक्ष्म तत्त्व विचार; भूतमात्री हरि इत्यादि.

५. आत्मनिग्रहाचा शास्त्रीय उपाय; योगविद्या.

( विचारपोथी – विचार क्र. ८ ).’’

इस्लामविषयी आदरभाव राखणाऱ्या विनोबांनी त्या धर्माची मर्यादाही सांगितली.

‘‘…इस्लामने म्हटले आहे, ‘ला इकराह फिद्दीन’ – धर्माबाबत कधीही जबरदस्ती होऊ शकत नाही. इस्लामचा प्रारंभी प्रचार त्यागामुळे, आत्मबळामुळे झाला. सुरुवातीच्या खलीफांच्या धर्मनिष्ठेमुळे इस्लामचा प्रचार झाला असला तरी पुढे मुसलमान राजांनी जबरदस्तीनेच धर्माचा प्रसार केला. त्यामुळे द्वेषच पसरला…’’( सर्व धर्म प्रभूचे पाय ).

‘कुराणसारा’ची रचना करताना त्यांनी कुराणातील कथा आणि कायदे यांना त्यात स्थान दिले नाही. मनु:स्मृती, कुराण, बायबल यात कायदे दिसतात तथापि कायदे हे धर्माचे अंग नाही, असे त्यांनी आवर्जून नोंदवले आहे.

ख्रिस्ती धर्माकडेही ते अशाच साक्षेपी नजरेने पाहतात.

‘‘…व्यक्तिगत पातळीवर ख्रिश्चनांनी, मिशनऱ्यांनी भारतात फार चांगले काम केले आहे. गरीब आणि अभावग्रस्त लोकांची त्यांनी विशेष सेवा केली आहे. कुष्ठरोग्यांच्या  सेवाकार्याचा भार सर्वप्रथम ख्रिश्चनांनीच उचलला. त्यांच्या कार्यामागे धर्मांतराची भावना नसती तर त्यांच्याकडून जास्त चांगली कामे झाली असती…(सर्व धर्म प्रभूचे पाय)’’

जातिभेदाला त्यांनी हिंदुधर्मावरचा कलंक म्हटले होते. त्याविरोधात लिहिताना सर्व धर्मातील सद्गुणांचे ऐक्यही त्यांनी महत्त्वाचे मानले होते.

… मला जातिभेद तोडायचा आहे. त्याकरिता मी वेद, गीता, कुराण, बायबल, धम्मपद या सर्वांची मदत घेतो. गीता विरुद्ध बायबल, वेद विरुद्ध धम्मपद असला चावटपणा करू नका. जे सद्भक्त मुसलमान आहेत, जे सद्भक्त ख्रिस्ती, बौद्ध आहेत, त्या सगळ्यांची मिळून एक जमात आहे. ही सगळी जमात एकवटून तिने पाखंडी, दुर्जन यांच्या विरुद्ध मोर्चा उभारला पाहिजे (सर्व धर्म प्रभूचे पाय).

विनोबांनी सर्वच धर्मांच्या मर्यादा वेळोवेळी सांगितल्या असल्या तरी त्यापेक्षा महत्त्वाची एक वेगळीच गोष्ट आहे. सगळ्याच धर्मांचा त्यांना एका तत्त्वाशी मेळ घालायचा होता. त्याला ते कधी ‘प्रभूचे पाय’ म्हणतात तर कधी ‘सत्य-प्रेम-करुणा.’

– अतुल सुलाखे

  jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coordination of beliefs presented by vinoba nephew the virtues and vices of religion akp

ताज्या बातम्या