लेखक – डॉ. सुधाकर आगरकर ; तांबं या धातूपासून बनविलेली अनेक भांडी पूर्वी वर्षानुवर्षं घरोघरी नेहमी वापरली जायची. तांब्याच्या उष्णतावहन करण्याच्या उत्तम गुणधर्मामुळे, स्वयंपाकघरात तांब्याची भांडी वापरली जात असत. आजही तांब्याच्या भांड्यांचा योग्य वापर केला तर तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोघांनीही तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं महत्त्व मान्य केलं आहे.
तांब्यामध्ये नैसर्गिकरीत्या जिवाणू मारण्याची क्षमता असते. तांब्याच्या भांड्यात ८-१० तास साठवलेलं पाणी प्यायल्यानं पोटातले विविध संसर्ग, ई-कोलायसारखे हानीकारक जिवाणू नष्ट होण्यास मदत होते. तांबं पोटाची जळजळ कमी करायला आणि पचनक्रिया सुरळीत करायला मदत करतं. तांबं मेंदूतील संदेशवाहकांचं काम वेगवान करतं, ज्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.
शरीरातील मेलॅनिनच्या उत्पादनासाठी तांबं आवश्यक असतं, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. पण याच तांब्याच्या भांड्यांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यास तो शरीरासाठी घातक ठरू शकतो. तांब्याच्या भांड्यात फक्त पाणीच साठवावं; पण गरम पाणी त्यात भरू नये. त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यात कधीही दूध, दही, ताक, लिंबू सरबत किंवा लोणचं ठेवू नये. कारण तांब्याची अशा आम्लयुक्त पदार्थांशी रासायनिक प्रक्रिया होते, त्यामुळे अशा अन्नातून विषबाधा होऊ शकते.
तांब्याची भांडी स्वच्छ ठेवणं त्रासदायक असतं. ही भांडी वातावरणात उघडी राहिली तर त्यावर डाग तयार होतात. हवेतल्या ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन तांब्याचं ऑक्साईड तयार होतं. तांब्याच्या भांड्याची लाली कमी होऊन ते काळसर दिसू लागतं. अधिक काळ हवेचा संपर्क राहिल्यास, तांब्याच्या भांड्यावर हिरवट निळ्या रंगाचे, तांब्याच्या क्लोराईड आणि हायड्रॉक्साईड या क्षारांचे डाग दिसू लागतात. हे क्षार प्रमाणाबाहेर आणि दीर्घकाळपर्यंत आपल्या पोटात गेल्यास, पोटाचे गंभीर आजार उद्भवतात.
म्हणूच तांब्याची भांडी स्वच्छच ठेवावी लागतात, म्हणजेच त्यांच्या पृष्ठभागावर कोणतेही क्षार जमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
यासाठी तांब्याची भांडी वेळोवेळी लिंबू आणि मिठानं किंवा चिंचेनं घासून स्वच्छ करावी लागतात. भांड्याच्या आत हिरवट थर जमा झाला असेल, तर ते वापरू नये. हा हिरवट थर कॉपर ऑक्साईडचा असतो- ते शरीरास अपायकारक असतं. आजकाल बाजारात तांब्याची अशी भांडी मिळतात, ज्यांच्या आतल्या पृष्ठभागावर स्टेनलेस स्टीलचा लेप दिला असतो. अशी भांडी स्वयंपाक करायला वापरली तर तांब्याच्या उष्णतावहन करण्याच्या उत्तम गुणधर्मामुळे भांडं पटकन गरम होतं आणि अशा भांड्यात बनवलेले अन्नपदार्थ तांब्याच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे अशी भांडी वापरायला हरकत नाही.
