स्वातंत्र्यानंतर सुरीनाममध्ये सुरू झालेल्या राजकीय आणि वांशिक संघर्षांमुळे तेथील साधारणत: ३० टक्के जनता हॉलंडमध्ये स्थलांतरित झाली. १९८० मध्ये लष्कराने उठाव केला आणि सरकार उलथवून डेझी बाऊटर्स यांनी सत्ता ताब्यात घेतली. पुढची तीन वर्षे या लष्करी सरकारला विरोध करणाऱ्यांच्या धरपकडीत आणि हत्यासत्रांच्या धुमश्चक्रीत गेली. पुढे सुमारे सात वर्षे लष्कर आणि त्यास विरोध करणारे आफ्रो-अमेरिकी यांच्यातील यादवी युद्धांमध्ये गेली. या गृहयुद्धात जवळपास एक लाख सुरीनामींचा बळी गेला. सुरीनामचे राष्ट्राध्यक्ष डेझी बाऊटर्स यांच्यावर भ्रष्टाचार, अमली पदार्थाचा चोरटा व्यापार आणि विरोधकांचे हत्याकांड असे तिहेरी गुन्हेगारीचे आरोप असूनही ते १९८० पासून २०१९ पर्यंत असे प्रदीर्घ काळ सत्तेवर राहू शकले. पण २०१९ साली, ‘डिसेंबर हत्याकांड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १९८२ सालच्या एका प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून २० वर्षांचा तुरुंगवास सुनावला.

जुलै २०२० मधील सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले चंद्रिकाप्रसाद संतोखी ऊर्फ ‘चान’ हे सुरीनामचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. चान संतोखींचे पूर्वज मूळचे भारतीय-बिहारी. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना त्यांनी काही संस्कृत श्लोक उद्धृत केले होते, हे विशेष! पारामारिबो हे सुरीनामचे राजधानीचे आणि सर्वाधिक मोठे शहर. सुरीनामची अर्थव्यवस्था ही मुख्यत: बॉक्साइटच्या स्रोतांवर अवलंबून असली, तरी सोने आणि खनिज तेल यांच्या निर्यातीतूनही मोठे उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे तांदूळ आणि केळी या शेतमालाच्या निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही वाटा मोठा आहे. अलीकडच्या काळात सुरीनामने साखर निर्यातीचे प्रमाण कमी केले आहे.

बहुसांस्कृतिक, बहुवंशीय सुरीनाममध्ये लोकसंख्येतील ४८ टक्के ख्रिस्ती धर्मीय, २४ टक्के हिंदू, १४ टक्के इस्लाम धर्मीय आहेत. हिंदू लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे सुरीनाममध्ये दिवाळी, दसरा वगैरे सणांच्या दिवशी राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टीचे दिवस नेमून दिलेले आहेत. सुरीनाममध्ये भारतीय, इंडोनेशियन आणि चिनी लोक प्रथम आले, ते दिवस प्रवेश दिन म्हणूनही मोठय़ा उत्साहाने तिथे साजरे केले जातात. डच ही राजभाषा आहे, म्हणून ती सर्वाधिक बोलली जाते; पण भोजपुरी हेलाची सुरीनामी हिंदी ही तिथली तिसरी मोठी प्रचलित भाषा आहे.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com