करोना विषाणू… कोविड-१९! अर्थात तो जीवघेणा काटेरी मुकुट गेल्या काही दिवसांपासून आपल्याला सर्व बातम्यांमध्ये परत दिसू लागला आहे. याचे कारण, जरी पँडेमिक म्हणजे महामारी संपली असली तरी विषाणूचा ओमायक्रॉन हा तुलनेने कमी त्रासदायक प्रकार आपल्यासोबत गेली तीन-चार वर्षं आहे, पुढेही राहणार आहे. जेव्हा एखादा विषाणू आपली आनुवंशिक संरचना बदलतो, तेव्हा त्याचे नवीन रूप तयार होते. अशा नवीन रूपांना व्हेरिअन्ट्स म्हणतात. सध्या संपूर्ण जगामध्ये ओमायक्रॉन व्हेरिअन्ट्सचे दोन-तीन उपप्रकार म्हणजेच ‘एलएफ-८’, ‘एक्सएफजी’ आणि मुख्य म्हणजे ‘एनबी-१.८.१’ आहेत.

त्यापैकी एनबी-१.८.१ ला ‘व्हेरिअन्ट अंडर मॉनिटरिंग’ म्हणजेच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मूळ ‘सार्स कोव्ही-२’ विषाणूमध्ये अनेक उत्परिवर्तने झाली आणि होत आहेत, आणि त्यातूनच त्याचे वेगवेगळे व्हेरिअन्ट्स जन्माला आले. त्यापैकी चिंतेचा विषय असलेले व्हेरिअन्ट्स म्हणजेच ग्रीक मुळाक्षरांनी संबोधित केलेले अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि सध्या ज्या व्हेरिअन्टचे उपप्रकार बघायला मिळत आहेत तो ओमायक्रॉन! ओमायक्रॉन ऑक्टोबर २०२१ मध्ये बोट्स्वाना इथे आढळला. आज जो बहुचर्चित ‘एनबी-१.८.१’ उपप्रकार दिसतो आहे, तो ओमायक्रॉनच्या ‘जेएन-१’ आणि ‘एक्सईसी’ ह्यांच्या संकरातून तयार झाला आहे. आज पूर्ण जगभर हा पसरला आहे. साधारण मे २०२५ च्या सुरुवातीपासून चीन, थायलंड, सिंगापूर, इथे हा प्रचंड प्रमाणात पसरला आणि आज भारतातदेखील कोविडचे रुग्ण वाढत आहेत. जिनोम क्रमधारणा (सीक्वेन्सिंग) झाल्यावर चित्र अजून सुस्पष्ट होईल. आजमितीला भारतात ४-५ हजार पेशंट आहेत, पण कोविड चाचणी अधिक प्रमाणात केल्यास हा आकडा अजून वाढू शकतो. ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत सौम्य असला तरीही कोविडची प्रमुख लक्षणे ताप येणे, सर्दी, खोकला, घशाला त्रास होणे, तसेच काही लोकांमध्ये अतिसार, उलटी, ही तीच आहेत.

भारतात एप्रिल २०२१ च्या सुरुवातीला आलेली डेल्टा व्हेरिअन्टची लाट खूप नुकसान करून गेली. डेल्टा व्हेरिएन्ट विषाणूच्या स्पाईक प्रथिनांमध्ये अशी काही उत्परिवर्तने झाली की त्यामुळे विषाणू पेशीला अधिक घट्ट चिकटत होता, तसेच विषाणू संख्या खूप पटकन वाढत होती. सध्याचा विषाणू तुलनेने सौम्य त्रास देत असला तरीही, ज्यांना श्वसन मार्गाचे आजार किंवा डायबेटिस वा अन्य काही दुखणी आहेत; त्यांनी अधिक काळजी घेतलीच पाहिजे. मास्क अर्थात मुखपट्टी लावणे, गर्दी करणे टाळणे, आणि आजारी असल्यास दुसऱ्यांमध्ये न मिसळणे या पूर्वी केलेल्या गोष्टी आपण आजही पाळल्या पाहिजेत.

डॉ. मोनाली रहाळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org