कुतूहल: गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धन १

गोडय़ा पाण्यात संवर्धन करता येतील असे काही उपयुक्त मासे आहेत. १. कटला : कटला या माशाचे तड वरच्या

गोडय़ा पाण्यात संवर्धन करता येतील असे काही उपयुक्त मासे आहेत.
१. कटला : कटला या माशाचे तड वरच्या बाजूला वळलेले असते. तो पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खात असल्याने तो पृष्ठभागावर आढळतो. तो पाण्याच्या मधल्या थरातील प्राणी व प्लवंगसुद्धा खातो. त्याचे डोके रुंद असते. पहिल्या वर्षी तो वजनाने साधारणत: एक ते दीड किलो (लांबी ३८ ते ४६ सेंमी) एवढा वाढू शकतो.
२. रोहू : रोहू पाण्यातील मधल्या भागात वाढतो व तेथील वनस्पती, प्लवंग, चिखलातील सेंद्रिय अन्नकण व पाणवनस्पती खातो. रोहूचा खालचा ओठ जाडसर, मऊ व दातेरी किनारयुक्त असतो. याचे वजन पहिल्या वर्षी साधारणत: ६०० ते ९०० ग्रॅम भरते.
३. मृगल : मृगल प्रामुख्याने तळभागात आढळतो. ओठ पातळ आणि तोंड पुढच्या बाजूला असल्यामुळे तो तळाच्या चिखलातील सेंद्रिय अन्नपदार्थ, पाणवनस्पती, शेवाळ, प्राणी व प्लवंग खातो. मृगल पहिल्या वर्षी साधारणत: ६०० ग्रॅमपर्यंत वाढतो.
४. कॉमन कार्प (सिपला): हा मासा मत्स्यशेतीसाठी जगात सर्वत्र वापरला जातो. हा मासा काळपट, हिरवट, पिवळा, सोनेरी, लालसर अशा विविध रंगांत आढळतो. याच्या तोंडाची ठेवण विश्ष्टि असून अन्न खाण्यासाठी ते काहीसे लांबवता येते. याच्या खालच्या व वरच्या जबडय़ास मिळून एकूण चार मिशा असतात.
५. गवत्या : गवत्या माशाला ग्रासकार्प म्हणूनही ओळखतात. याचे खाद्य प्रामुख्याने पाणवनस्पती व गवत आहे. तलावात वाढणाऱ्या गवताचे नियंत्रण करण्यासाठी यांचा उपयोग होतो. गवत्याचे शरीर लांबट व बरेचसे रोहू माशासारखे दिसते. परंतु, तोंड निमुळते व अरुंद असते. मिशा नसतात. पर बरेच मागे सरकलेले असतात.
६.चंदेरा किंवा सिल्व्हर कार्प: चंदेरा माशाचे शरीर चपटे असून डोके निमुळते होत जाते. खालचा जबडा वरच्या जबडय़ापेक्षा किंचित लांब असतो. पूर्ण शरीरावर बारीक चंदेरी खवले असल्यामुळे या माशाला चंदेरा असे म्हटले जाते.
वॉर अँड पीस: गालगुंड: साथीचा एक आजार

पावसाळ्यात तुम्हा-आम्हाला अनेक साथीच्या विकारांचे भय असते.  जुलाब अतिसार, पोटदुखी, हागवण, मलावरोध, अरुचि, कावीळ, थंडीताप फ्ल्यू, स्वाईन फ्लू असे विकार बळावतात. आपल्या आसपास असंख्य जीवजंतूंची उत्पत्ती, वाढ व नाश दरक्षणाला होत असतो. हे जीवजंतू तुम्हा-आम्हाला सगळ्यांनाच वरीलप्रमाणे रोगांचे बळी करू पाहतात. पण आपल्या शरीरात प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती असते. त्यामुळे हजारातल्या एखाद्याच व्यक्तीला वरील प्रकारच्या विकारांची बाधा होत असते. गालगुंड हा असाच एक प्रकारचा संसर्गजन्य व्याधी आहे. त्याची साथ अनेकानेक वेळा, खास करून लहान बालकांना आपली शिकार बनवत असते. गालगुंडाने ग्रासलेल्या बालकाला जेव्हा पालक मंडळी वैद्य डॉक्टरांकडे घेऊन येतात तेव्हा तो चिकित्सक साहजिकपणे टॉर्चच्या साहाय्याने बालकाचा घसा बघतो, गळा बघतो. गळ्याला बाहेरून सूज आहे का, हे हाताने तपासून; त्या बालरुग्णाला आपल्यापासून थोडे लांब बसावयास सांगतो. त्याचे कारण असे की हा रोग इतक्या झपाटय़ाने, वेगाने पसरणारा संसर्गजन्य व्याधी आहे की, त्या बालकाच्या घश्याच्या आसपासचे जीवाणू मोठय़ा माणसालाही आपला बळी करू शकतात. मग घरातले अन्य बालबच्चे व मोठय़ांनीसुद्धा काळजी घ्यायला नको का?
शक्य असल्यास अशा रुग्णाला इतरांपासून लांब स्वतंत्र खोलीत ठेवावे. टाळ्याला, कानाला, डोक्याला एक मोठा मफलर-स्कार्फ-पट्टा कटाक्षाने गुंडाळावा. त्यामुळे अधिक जंतुसंसर्ग टळतो. लहान बालकाला मीठ पाण्याच्या सोसवेल अशा गरम पाण्याच्या गुळण्या करावयास सांगाव्या. बाहेरून चुना-गुळाचा दाट लेप गालगुंड सुजेला लावावा. प्रवाळ, कामदुधा मौक्तिकभस्म अशी औषधे तारतम्याने द्यावीत. काळ्या मनुका स्वच्छ धुवून बिया काढून नित्य २५/३० द्याव्या. मोठय़ा मुलांना, माणसांना गुलाब द्राक्षासव किंवा रक्तशुद्धी काढा द्यावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..      नीतिनियम
माझे आयुष्य उत्तर नसलेल्या प्रश्नांचे एक गाठोडे आहे आणि ते गाठोडे घेऊन मी फिरतो आहे. प्रश्नांची उत्तरे न मिळताच चालू राहिलेले हे आयुष्य खरे तर दिशाहीन व्हायला हवे, पण तसे न होता ते मोठे वेधक झाले आहे. कर्मे तर चालू आहेतच. ती कुठली थांबायला? पण डोके काही थांबत नाही.
या प्रश्नाच्या गाठोडय़ातला सर्वात बोचरा आणि तीक्ष्ण प्रश्न असा आहे की, जे नीतिनियम मी पाळतो ते मला कोणी दिले? आईवडिलांनी, समाजाने, धर्माने की देवाने?
त्यातला देव सगळ्यात महत्त्वाचा असणार, पण याचेही खरे नाही. इतक्या साऱ्या प्रकारचे देव? कोणी म्हणतो देवाने हे जग घडवले आणि तो देव जरा फटकळच, कारण तुम्ही आणि देव या दोन गोष्टी आहेत. तो न्यायनिवाडा करणारा आहे. तुम्ही  कसे वागलात हे ठरवणार आहे. तुम्ही काहीही पुरावे सादर करा, शेवटी त्याचा निर्णयच खरा. मग विश्वाच्या अंताला यादी बाहेर पडेल, त्यात तुम्ही स्वर्गात जाणार की नरकात हे ठरेल. तिसरीही एक श्रेणी आहे, त्यात तुम्ही अधांतरीही ठेवले जाऊ शकता.
काही म्हणतात, देव माणसाच्या मनाची निर्मिती आहे. हे जरा उलटेच झाले. ते म्हणतात, ‘‘हे जग चैतन्याचा आविष्कार आहे.’’ या आविष्कारातल्या माणसाने लोकांना जरबेत ठेवण्यासाठी हा बागुलबुवा निर्माण केला आहे.
माणूस जात हुशार नक्कीच, पण म्हणजेच चतुर, लबाड आणि संधिसाधू. आपल्याला जास्त मिळावे म्हणून हा माणूस क्ऌप्त्या करतो आणि स्वार्थामुळे समाजावर अन्याय करतो म्हणून त्याला काबूत ठेवण्यासाठी देवाची भीती दाखवत हे नीतिनियमांचे जंजाळ उभे करण्यात आले आहे. इथे भीती ही गोष्ट पाया आहे.
काही म्हणतात, देव वगैरे सगळेच झूट आहे. असली गोष्टच अस्तित्वात नाही. माणूस प्रवाहपतित आहे. या पतनातून वाचायचे असेल तर या पतनाची कारणे शोधून काढायला हवीत आणि त्यावर उपाय करायला हवेत. हे प्रवाहपतन आणि दु:ख सर्व बाजूंनी आपल्याला घेरून आहे. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी नीतिनियमन उपयोगी पडतात.
 आणि काही म्हणतात, देव  सोडा. नीतिनियमच थोतांड आहेत. जे आपले आहे ते आपले, दुसऱ्याचे जे आहे ते आपले कसे करता येईल हे बघावे. मिळाले तर फारच उत्तम आणि ज्याने आपल्याला सुख होते ते करावे (दुसरा गेला खड्डय़ात, असे त र नव्हे?). तोच निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून तीच नीती असायला हवी.
या नितिनियमांबद्दलच्या तत्त्वज्ञानाबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत        १६ सप्टेंबर
१९४२ > निसर्गकवी ना. धों. महानोर यांचा जन्म.  ‘प्रार्थना दयाघना’ ही दुष्काळावरील दीर्घकविता, ‘गांधारी’ ही कादंबरी आणि ‘गावातल्या गोष्टी’, ‘गपसप’ (कथासंग्रह) ‘अजिंठा’ दीर्घकाव्य आणि रानातल्या कविता, वही, पक्ष्यांचे लक्ष थवे, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी,  हे काव्यसंग्रह  सुपरिचित आहेत. खान्देशी ‘वही’चा बाज आणि ‘नाचणभिवरी’, ‘झिम्माड’, ‘अंग जरतार, ऐन हुरडय़ात’ यांसारख्या रसरशीत शब्दांचा साज, ही त्यांच्या कवितेची वैशिष्टय़े. महानोरांनी ‘यशवंतराव चव्हाण’, ‘शेती : आत्मनाश व संजीवन’, ‘शरद पवार आणि मी’ असे लेखनही केले आहे.
१९९४ > जयवंत दळवी यांचे निधन. सगेसोयरे हवेच असूनही नात्यांच्या चाकोरीत फिरणे नाकारल्यामुळे एकटी पडलेली, एकटेपणामुळे विक्षिप्तच वाटणारी आणि अशा वेगळिकीशी वाचकालाही नाते जोडायला लावणारी मराठीतील अनेक पात्रे दळवींच्या कादंबऱ्यांत आणि नाटकांत उरली आहेत. ‘ठणठणपाळ’च्या हातोडय़ाचा घाव मोरपिसासारखा झेलणारे साहित्यक्षेत्र दळवींच्या लोभस टीकादृष्टीची आठवण अजूनही काढते. विनोदी आणि गंभीरही लेखन सारख्याच ताकदीने करणाऱ्या दळवींची पुस्तके ४० हून अधिक आहेत.
संजय वझरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Curikosity fresh water fish conservation

ताज्या बातम्या