कुतूहल: मत्स्यशेती

महाराष्ट्र राज्याला तळी, तलाव, जलाशयांचे सुमारे तीन लाख हेक्टर जलक्षेत्र आणि सुमारे वीस हजार किमी लांबीचा नदीभाग लाभला

महाराष्ट्र राज्याला तळी, तलाव, जलाशयांचे सुमारे तीन लाख हेक्टर जलक्षेत्र आणि सुमारे वीस हजार किमी लांबीचा नदीभाग लाभला आहे. या स्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी सुमारे साठ कोटी मत्स्य बोटुकलींची आवश्यकता आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे मत्स्य व्यवसाय हा शेतीला पूरक असा जोडधंदा होऊ शकतो. मत्स्य व्यवसायाला शारीरिक श्रमासोबत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्यात खात्रीने यश मिळू शकते.   
मत्स्य व्यवसायात मत्स्यशेतीस अत्यंत महत्त्व आहे. मासोळीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून, मत्स्यतळ्यात नियोजनपूर्वक मत्स्यबीज सोडून योग्य त्या प्रमाणात अन्न व खतांचा वापर करून मत्स्योत्पादन करणे यास मत्स्यशेती असे म्हटले जाते.
 मत्स्य व्यवसायातून देशास सकस अन्न व रोजगार यासोबतच मोठय़ा प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या नसíगक संपत्तीचे सुयोग्य नियोजन करून मत्स्यशेती केल्यास मत्स्योत्पादनात वाढ होऊन नीलक्रांती घडू शकते आणि आíथक उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.  
गोडय़ा व खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती फरक: गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेतीसाठी पाण्याची व्यवस्था नदी, नाले, ओढे, तलाव अशा गोडय़ा पाण्याच्या स्रोतातून केली जाते. खाऱ्या व निमखाऱ्या मत्स्यशेतीसाठी समुद्र, खाडी, बॅकवॉटर असे क्षारयुक्त पाण्याचे स्रोत असतात. गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेतीसाठी इंडियन मेजर कार्प म्हणजेच रोहू, कटला, मृगल यांचे संवर्धन करता येते. तसेच मागूर, मरळ, पंगस, गोडय़ा पाण्यातील िझगे यांचेही संवर्धन करता येते. खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी जिताडा, बोई, मिल्क फिश, टायगर कोळंबी, व्हेनमाई कोळंबी यांचे संवर्धन करता येते.
गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेतीसाठी जागेची निवड: मत्स्यशेतीसाठी तळ्याची जागा निवडणे खूप महत्त्वाचे असते. मत्स्य संवर्धनासाठी ही जागा किती योग्य आहे, जमिनीची संरचना कशी आहे यांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर माती परीक्षण, पाण्याची उपलब्धता, दळणवळणाची सोय व इतर पूरक बाबींचा विचारही केला जातो.
वॉर अँड पीस: नाकाचा आजार – वास न येणे
चार-सहा महिन्यांनी एखादी गृहिणी किंवा तिचे पतीराज थोडी गोडशी तक्रार घेऊन येतात. ‘अलीकडे हिच्या नाकाला काय झाले आहे ते अजिबात कळत नाही. स्वयंपाकाकरिता, तळणाकरिता तेल तापविले तरी समजत नाही. ’ आपल्या शरीरात नाकाला विशेष महत्त्व आहे.‘नासा ही शिरसोद्वारम्’। असे शास्त्रवचन आहे!
 नाकाचे आरोग्य चांगले राहिले तर कान, नाक, घसा, डोळे, मेंदू, केस या अवयवांचे आरोग्य चांगले राहते. नाक हे शरीरातील आकाश या एका महाभूताचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यात सदैव पोकळी असायलाच हवी. बऱ्याच वेळा नाकाच्या दोन्ही किंवा डाव्या-उजव्या नाकपुडीत सूज, हाड किंवा मांसवृद्धी, वाकडेपणा, लाली, डाळिंबाच्या लाल चुटूक दाण्यासारखा मणी अशी विकृती असते. आपले नाक पंचज्ञानेंद्रिये, कर्मेद्रियांपैकी घ्राणेंद्रिय म्हणून महत्त्वाचे काम करत असते. नाकातील विविध अडथळ्यांमुळे प्राणवायूचे नाकातील संचरणात अडथळा येतो.
काहींना सर्दी, पडसे, खोकला, कफ, दमा, आवाज बसणे, राजयक्ष्मा अशा विकारांची बाधा होते. नाक हे जसे आकाश तत्त्वाचे स्थान आहे, तसेच त्याच्या हाडांच्या रचनेत पृथ्वीतत्त्वाचा सहभाग असतो. पृथ्वीचे वर्णन ‘गंधवती पृथ्वी’ असे शास्त्रकार करतात. आपल्या गळ्याच्या वरच्या, जत्रूध्र्व भागात हाडांच्या रचनेत काही बिघाड, अडथळा आला की साहजिकपणे पृथ्वीतत्त्वाचे गंध घेणे, समजणे, कळणे या कार्यात; प्राणवायूच्या संचरणातील अडथळ्यामुळे बिघाड होतो. वास येत नाही.
नाकाला विविध प्रकारचे वास कळावे याकरिता तीव्र नस्याची नितांत गरज असते. नस्यतेल, पाठदितेल, अणुतेल, महानारायणतेल अशांचे सकाळ-सायंकाळ कटाक्षाने नस्य करावे. वेरवंडगंधाचा दाट गरम लेप नाकावर लावावा. लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमागोळी, लवंगादिगुग्गुळ, अभ्रकमिश्रण, रजन्यादिवटी, नागरादिकषाय अशी औषधे दीर्घकाळ पोटात घ्यावी. थंड, आंबट, खारट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. सत्वर गुण मिळतो.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..     कल्पनाविलास आणि कट
माणूस जात साहसी आणि भित्री दोन्ही आहे. चाणाक्ष आणि बुद्दूही आहे. फार फार दिवसांपासून माणसाच्या मनाने असे घेतले आहे की, आपल्यापेक्षा काहीतरी जास्त पवित्र आहे. हे तत्त्व काही वाईट नाही. तेवढाच अहंकार कमी होतो; परंतु हे जे आहे ते शक्तिमान आहे, हानीकारक असू शकते ते रहस्यमय आहे आणि ते कायम गुपितच राहणार आहे, असा कल्पनाविलासही माणसांनी मांडला आहे. याला काहीतरी दिले तर हा आपल्याला परतावा करील, अशीही कल्पना आहे. मेधा गोडबोले माझा स्तंभ दररोज वाचतात. त्यांनी मला एकदा या देण्याबद्दल लिहिले. वाघ, सिंह, घोडा वगैरे गोष्टींचा बळी देत नाही देतात बोकडाचा (त्याचा बकरा केला हा वाक्यप्रयोग तिथून आला आहे). हे जे आहे ते अतिमानवी किंवा निसर्गातील आहे, अशीही एक कल्पना आहे. मग ते फारच दूर होईल म्हणून याचा मुलगा, याचा दूत, याचा अवतार अशाही कल्पना रूढ आहेत. मग जवळीक होते. ही जी वरची तीन रूपे आहेत, त्यांना वारही दिले आहेत. काहींचा रविवार असतो. काहींचा शुक्रवार ज्यू लोकांचाही वार असतो. आपल्यात तर काही विचारू नका. ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणतात.
कोनाडय़ात माझी मूर्ती। आणि हा वारीचा यात्री।।
एकादशीला होतो आमचा। पंचमीला नागाचा।।
चतुर्थी आली की गणपती। दुर्गामाईची चतुर्दशी।।
जणू काही गावाची नवरी। सर्वाच्या दारी।।
यातला आधीचा उपहास आणि त्यावर कळस म्हणून की काय वारांगनेची कुरूप प्रतिमा सगळेच धक्कादायक आहे. सगळ्याच धर्मांत बायकांवर सगळ्या नीतिनियमांचा भार आहे. देवासमोरच काय, इतरत्रही स्त्रीचे सौंदर्य कसे लपविता येईल आणि मग भोगता येईल हेच पुरुषप्रधान संस्कृतीने बघितले आहे. देवासमोर केस लपविण्याची टोपी घालायची किंवा डोक्यावरून पदर घ्यायची किंवा हिला प्रार्थनास्थळात आणू नको, असली नियमावली या निसर्गातील अतिमानवी रहस्यमय आणि आपल्यापेक्षा पवित्र गोष्टीला कशी भावते कोण जाणे? ते कायमच गुप्त राहणार असल्यामुळे त्याचेही भावही गुप्तच राहणार आहेत. म्हणूनच कार्ल मार्क्‍स म्हणाला, ‘माणसाने धर्म नावाची अफूची गोळी घेतली आहे.’ असे म्हणतात की धर्म ही गोष्ट केवळ तत्त्वज्ञानी किंवा धर्मगुरूवर सोपविण्यात काही हशील नाही. समाजाचे मन ज्यांना समजते, अशा समाजशास्त्रज्ञांकडून याची तपासणी करायला हवी. म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात, ‘लोका प्रति न वर्तावे’ आणि असे सुचवितात की, हळूहळू त्यांचे मन वळवावे. सर्वात मोठा अप्रत्यक्ष (?) अनाहूत (?) कट जर धर्मगुरूंनी केला असेल तर तो म्हणजे भीती दाखवून सद्गुणांची आणि धर्माची मोट बांधण्याचा. त्याबद्दल लवकरच.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत: १३ सप्टेंबर
१८९३ > प्रार्थना समाजाचे एक संस्थापक, समाजसुधारक लेखक मामा (नारायण महादेव) परमानंद यांचे निधन. ‘पितृबोध (तरुणांस उपदेश)’ हे  त्यांचे पुस्तक गाजले.
१९०७ > शिक्षणविषयक पुस्तकांचे लेखक लक्ष्मण नीळकंठ छापेकर यांचे निधन. साने गुरुजींवरील ‘स्मृतिसुगंध’ हे पुस्तक (यात गुरुजींची मुलाखतही आहे), ‘शिक्षण आणि जीवन’, ‘जीवनविकास’, ‘अभिनव संस्कार’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९३२ > ‘गानप्रभा’ प्रभा अत्रे यांचा जन्म. त्यांनी संगीतात केलेल्या कार्याशिवाय, ‘स्वरमयी’, ‘स्वराली’, ‘स्वरांगिनी’, ‘अंत:स्वर’ आदी पुस्तके लिहिली आहेत.
१९७३ > छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सरंजामशाहीच्या विरोधी असून ती शेतकरी क्रांती होती, असे प्रतिपादन करणाऱ्या ‘धर्म आणि क्रांती’ या पुस्तकासह महत्त्वाच्या राजकीय इतिहासपर पुस्तकांचे लेखक लालजी मोरेश्वर पेंडसे यांचे निधन. ‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा संयुक्त महाराष्ट्र लढय़चा इतिहास, ‘नवमतवाद’, ‘रशियाचा प्रभातकाळ’ (महर्षी अरविंद बाबू यांच्या पुस्तकाचा अनुवाद), ‘साहित्य आणि समाजजीवन’, ‘गिरणी कामगारांचा एक तेजाचा लढा’, ‘राष्ट्रद्रष्टे विवेकानंद’, ‘मध्यरात्रीचे सूर्यदर्शन’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली होती.
संजय वझरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Curiosity fishery farming in india