शास्त्रीयदृष्टय़ा, एका जातीच्या वळूचे वीर्य दुसऱ्या जातीच्या गाईंसाठी वापरून जे वासरू निर्माण होते, त्याला संकरित जनावर म्हणतात. संकरित गाईंमध्ये दुग्धोत्पादनासाठी आवश्यक असलेले गुण जास्त दूध देणाऱ्या विदेशी जातींमधून घेतले जातात. आपल्या देशी गाईंमध्ये जास्त उष्णता सहन करण्याची ताकद, अधिक रोगप्रतिकारक शक्ती, तसेच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता आहे. विदेशी जातींमध्ये हे गुणधर्म कमी प्रमाणात आढळतात. यामुळे शुद्ध विदेशी गाई सरसकट पाळण्यापेक्षा संकरित जनावरे पाळणे फायदेशीर ठरते.
देशी आणि विदेशी जातींचा संकर करून निर्माण झालेल्या संकरित गाईंत तिन्ही जातींचे चांगले गुणधर्म एकत्र येतात. महाराष्ट्राचे बहुतांशी शेतकरी चांगली आनुवंशिक क्षमता असलेल्या गाई त्यांच्या गोठय़ामध्ये ठेवत आहेत. जास्त दूध देणाऱ्या गाईंपासून उच्च गुणवत्तेच्या कालवडी किंवा पदाशीचे वळू मिळवणे, आज गरजेचे आहे. यासाठी ‘भृण प्रत्यारोपण’ शास्त्र आता उपलब्ध आहे.
भृण प्रत्यारोपणामध्ये, जन्मणाऱ्या वासरात जन्मदात्या मातेचे गुण नसतात तर १०० टक्के गुण मूळ मात्यापित्याचे असतात. त्यामुळे आपल्याला उच्च गुणवत्तेची वासरे मिळतात. भृण प्रत्यारोपणासाठी निवड होणाऱ्या गायीला एका ठरावीक दिवशी माजावर आणतात. त्यासाठी एफ.एस.एच. हे संप्रेरक द्यावे लागते. त्यामुळे माजाच्या काळात एक बीज विमोचन होण्याऐवजी अनेक स्त्रीबीजे पक्व होऊन त्यांचे विमोचन होते व एकाऐवजी अनेक बीजे गर्भाशयात उतरतात. विदेशी गायीमध्ये अशी ६-८ बीजे मिळतात. ही बीजे सिद्ध वळूच्या वीर्यमात्रेपासून कृत्रीम रेतनाद्वारे फलित केली जातात. स्त्रीबीजे फलित झाल्यानंतर ६-७ व्या दिवशी गर्भाशयाबाहेर काढली जातात.
भृण प्रत्यारोपणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी तंत्रज्ञ, योग्य पदासक्षम गायी असणे अतिशय गरजेचे आहे. भृण देणाऱ्या (डोनर) गायीमध्ये बीजे फलित झाल्यानंतर ७ व्या दिवशी गर्भाशयाबाहेर काढलेली असतात. असा भृण ज्या गायीमध्ये रोपण करायचा आहे, त्या गायीमध्ये पक्का माज दिसल्यापासून ७व्या दिवशी भृण प्रत्यारोपण करावे. गर्भाशय व बीजवाहक नलिका जेथे जोडलेली आहे, तेथे भृण प्रत्यारोपण करावे अन्यथा गर्भधारणेचे प्रमाण फार कमी होते
वॉर अँड पीस पार्किन्सन्स – कंपवात : ‘टफ’ आजार! भाग झ्र्१
माझे चालू वय ८१ आहे. गेल्या दोन वर्षांपासून माझा प्रथम डावा हात व मग उजवा हात किंचित कापू लागला. बशीने चहा पिताना क्वचित हात कापतो. मित्रमंडळी प्रेमाने विचारतात ‘दादा तुम्हाला पार्किन्सन्स झालाय का हो?’ या मित्रांना दिलासा देऊन मी ठामपणे सांगतो की ‘नुसता हात कापणे म्हणजे पार्किंन्सन्स नव्हे.’ माझा कंपवात हे म्हातारपणाचे एक न टाळता येण्यासारखे लक्षण आहे.
पार्किन्सन्स याला सामान्य माणसाच्या भाषेत कंपवात म्हणतात हे खरे असले तरी, त्याचे लक्षण आपल्या शरीराच्या ‘अनियंत्रितपणे’ होणाऱ्या हालचाली! मला समजायला लागल्यापासून मी संघ शाखेत जायला लागलो. नंतर शाळा, कॉमर्स कॉलेज, भारतीय विमानदल, आयुर्वेदीय शिक्षणक्रम, पंचकर्म रुग्णालय, औषधी वनस्पतींची आवड व अनेकानेक सेवाकार्यामुळे माझा मित्र परिवार प्रचंड, महाप्रचंड आहे. भारत सरकारचे महाराष्ट्रातील एक काळचे ‘कॉन्झरवेटर ऑफ फॉरेस्ट’ या मोठय़ा पदावर असणारे श्री. एम. डी. जोशी हे माझे सुरुवातीपासूनचे रुग्णमित्र होते. चित्रशाळा प्रेस चौक, सदाशिव पेठ येथे माझे काष्ठौषधीच्या दुकानासमोर जोशी साहेब राहायचे. आपल्या अ. भा. प्रवासामध्ये विविध वनस्पतींचे ताजे ताजे नमुने आणून मला दाखवायचे. माझे ज्ञानात नित्य भर टाकायचे. एक दिवस ते माझ्याकडे पार्किन्सन्स यामुळे त्रस्त झालेले सहकुटुंब आले. सौ. जोशींनी डोळ्यात पाणी आणून सांगितले की ‘यांना बरे करा हो’, यांना कमी धावपळ करायला सांगा, ते ऐकत नाहीत.’ या तीन वाक्यातच मी पार्किन्सन्स हा विकार पहिल्यांदाच शिकलो.
एमडीसाहेबांना बरे करायचेच म्हणून मी त्या काळात मेंदूचे शारीर व विविध लक्षणे, आजारांचा अभ्यास केला. ‘सबस्टॅन्शिया नायग्रा,’ डोपा औषधांचे विविध प्रकार व त्यांचे साईड इफेक्ट्स यांचा मागोवा घेतला. डीप ब्रेन स्टिम्युलेशनकरिता आयुर्वेदीय औषधांचे सखोल संशोधन केले. त्यामुळे पार्किन्सन्सवर फक्त आयुर्वेदीय औषधांनी नियंत्रण आणता येते हा विश्वास मला आला.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. पशु-पक्ष्यांची ज्ञानेश्वरी ५
शेवटी माणूस हाही प्राणीच. दुसऱ्या अध्यायात त्याचे वर्णन करताना
शरीर तर एकच। पण वयाप्रमाणे भेद। होतात अनेक।।
अशी सुरुवात करून ‘एथ कौमारत्व दिसे। मग तारुण्यी ते भ्रंशे। परि देहचि न नाशे। एकेकासवे।।’ (कौमार्यात आणि तरुणाईतल्या बदलात देह मात्र राहतो, )असे सांगून झाल्यावर एक गुगली टाकली जाते. त्यात देह जेव्हा नाशतात तेव्हा चैतन्य किंवा आत्मा मात्र जात नाही, असे सिद्ध केले जाते. उदाहरण देहाचे आणि निर्णय आत्म्याचा. एकंदर दुसरा अध्याय जरा भारीच. तशी कबुली पुढे श्रीकृष्ण देणारच आहे. या अध्यायात खुद्द गीता एका प्राण्याबद्दल सांगते. ती म्हणते मनाला लवचवणाऱ्या गोष्टीपासून कासवासारखे हातपाय आखडून घ्यावेत. तेव्हा ज्ञानेश्वर काहीच बोलत नाहीत, पण पुढे त्यात भर घालतात आणि म्हणतात कासव प्रसन्न असले की हातपाय पसरते, पण प्रलोभनासमोर हुकमाने ते आत घेते. त्याप्रमाणे इंद्रियांवर वचक ठेव. आधी म्हटल्याप्रमाणे दुसरा अध्याय भारी असला तरी ज्ञानेश्वर आपल्याला प्राणिसंग्रहालयात नेतातच. हे जग खोटे असे सांगताना ते स्वप्नातल्या हत्तीसारखे आहे, असे सांगतात. एवढा भलामोठा प्राणी तोही स्वप्नातला म्हणजे किती खोटा असेल ते बघा आणि खोटे खरे ओळखण्यासाठी राजहंसाला परत आमंत्रण पाठवतात. हा स्वप्नातल्या आभासातला भद्रजाती (म्हणजे हत्ती) नाहीसा करायचा असेल तर नीरक्षीरविवेक करायला सांगतात. हल्ली आरोप झालेले राजकारणी दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा, असे म्हणतात त्यातलाच हा प्रकार. राजहंस असे करतो, अशी कल्पना आहे. दुसऱ्या अध्यायात कावळ्याच्या ऐवजी गिधाडे घिरटय़ा घालतात. युद्धातून पळणाऱ्यांचा घात होतो, युद्धभूमीवर पडून राहिलेल्या प्रेतांना जशी गिधाडे फाडतात तशी स्थिती जिवंतपणी पळपुटय़ांची होते, असे प्रक्षोभक विधान ज्ञानेश्वर ‘उपाख्य’ माऊलीने केले आहे. ओवी म्हणते
ना तरी रणी शव सांडिजे। ते चौमेरी गिधी विदारिजे।
तैसे स्वधर्महीन अभिभविजे। महा दोषी।।
चौमेरी म्हणजे चहुबाजूने ‘अभिभविजे महादोषी’ म्हणजे मोठय़ा दोषांनी ग्रस्त होतो. मध्ये मध्ये अर्जुनाला चुचकारण्यासाठी अरे तू तर सिंह तू गर्जना केलीस की, हत्तींना प्रलयकाल आठवतो (हे हत्ती म्हणजे कौरव) अशी ओवी येते (‘जैसे सिंहाचिया हांका। युगांतु होय मदमुखा।। ’मदमुखा म्हणजे हत्ती) किंवा सापांना गरुडाचा धाक असतो तसा या कौरवांना तुझा धाक आहे, असे सांगितले जाते. ‘ना तरी सर्प गरुडाते(भिये)’ मागे म्हटले तसे कोणीतरी अॅनिमल प्लॅनेटच्या धर्तीवर अशी ज्ञानेश्वरीवर एक पशु-पक्षी मालिका काढली पाहिजे. नक्की चालेल, लोक असल्या गोष्टींसाठी त्यांच्या नकळत आसुसलेले आहेत.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत २९ जुलै
१९२२ > वक्तृत्वाच्या, वाणीच्या जोरावर महाराष्ट्रभर, तसेच जेथे जेथे मराठी भाषा बोलली जाते तेथे सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची महती पोहोचवणारे शिवशाहीर व लेखक बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म. ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘जाणता राजा’ हे त्यांनी लिहिलेले महानाटय़ गाजले. मुजऱ्याचे मानकरी, पुरांदार्ची नोबत, पुरन्दरचा सरकारवाडा, शनवारवाडय़ातील शमादान, दख्खनची दौलत ही त्यांची पुस्तके म्हणजे ऐतिहसिक कथासंग्रह.
१९२५ > ‘हसरी ग्यालरी’ हे हास्यचित्रांचे स्वतंत्र पुस्तक साकार करून नर्मविनोदाची नवी रेषा-भाषा घडविणारे ज्येष्ठ चित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा जन्म. चिमुकली ग्यालरी, मिश्किल ग्यालरी या संग्रहांसह मुलांसाठी दोन खास पुस्तके त्यांनी ‘लिहिली.’ त्यांचे ‘रेषाटन’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. कित्येक मासिके व पुस्तकांची मुखपृष्ठे आतील चित्रे करणाऱ्या फडणीस यांनी काही काळ बालभारतीसाठी गणित विषयाच्या पुस्तकांना (इ . १ ते ४ ) चित्रांचे नवे परिमाण दिले, हे उल्लेखनीय आहे.
संजय वझरेकर