scorecardresearch

कुतूहल : प्रत्येक शाळेत वेधशाळा

कोणतीही संकल्पना ही कानांनी ऐकून, डोळय़ांनी पाहून समजते त्यापेक्षाही प्रत्यक्ष कृती किंवा सहभागातून अधिक चांगली समजते.

कुतूहल : प्रत्येक शाळेत वेधशाळा
प्रत्येक शाळेत वेधशाळा

विलास रबडे, मराठी विज्ञान परिषद

कोणतीही संकल्पना ही कानांनी ऐकून, डोळय़ांनी पाहून समजते त्यापेक्षाही प्रत्यक्ष कृती किंवा सहभागातून अधिक चांगली समजते. या मूलभूत तत्त्वावर आधारित हवामानासंबंधीचे प्राथमिक ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना दैनंदिन हवामानासंबंधीची माहिती मिळावी, त्यात होणारे दैनंदिन आणि नैमित्तिक बदल यांची निरीक्षणे व नोंदी करता याव्यात यासाठी ‘प्रत्येक शाळेत हवामान केंद्र’ ही योजना विज्ञान भारती, पुणेद्वारे राबविण्यात आली.

त्यासाठीचे हवामान सयंत्र पुण्यातील व्हीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी साईनाथन अय्यर याने तयार केले आहे. या हवामान केंद्रामुळे हवामानात वेळोवेळी होणारे तात्कालिक बदल, त्यांची कारणे याबाबतची माहिती शालेय विद्यार्थ्यांना त्यांनीच नियमितपणे केलेल्या निरीक्षण व नोंदींच्या साहाय्याने मिळते. त्यातून निष्कर्ष काढण्याची सवयही त्यांना लागते. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांनासुद्धा या माध्यमातून वादळे, हवामानात वेगाने होणारे बदल, पर्जन्य इत्यादीची माहिती मिळून नुकसान टाळता येऊ शकते. हे हवामान केंद्र स्वनियंत्रित व सौर ऊर्जेवर चालणारे आहे आणि त्याच्या संकेतस्थळावरून सर्व हवामानविषयक माहिती इंटरनेटद्वारे मोबाइल फोनवर जगात कुठूनही पाहता येईल. आजपावेतो अशी सात स्वयंचलित हवामान केंद्रे महाराष्ट्रात सुरू झाली आहेत.

‘प्रत्येक शाळेत वेधशाळा’ योजनेचा आरंभ १९ सप्टेंबर २०२१ रोजी कोकण किनारपट्टीवरील ग्राममंगल मुक्तशाळा, डहाणू या आदिवासी भागातील शाळेपासून झाला. येथे प्रामुख्याने स्वयंचलित आणि हाताने नोंदी घेणारे अशी दोन प्रकारची हवामान केंद्रे बसविण्यात आली आहेत. तापमान, आद्र्रता, वाऱ्याचा वेग, दिशा, पावसाची तीव्रता, एकंदर पडलेला पाऊस, वाऱ्याची सतत दिशा बदलणे, जाणवणारे तापमान यांचे सेन्सर या यंत्रात बसविलेले आहेत. साधारण दर दहा सेकंदांनी त्याची माहिती अद्ययावत होते. हाताने नोंदी घेणाऱ्या यंत्रामध्ये पर्जन्यमापक ठेवलेले आहे. सकाळी साडेआठ वाजता आणि संध्याकाळी साडेपाच वाजता या नोंदी विद्यार्थी घेणार आहेत. पूरपरिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

पुणे वेधशाळेचे माजी हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनीही या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले आहे. सर्व विद्यार्थी हवामानदूत व्हावेत यासाठी हवामानाच्या चळवळीची सुरुवात शाळेपासून होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी इंटरनेट हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे हवामानाची माहिती सर्वाना सहजरीत्या उपलब्ध होईल.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या