scorecardresearch

कुतूहल: सागवानाची शेती

सागवानाच्या शेतीसाठी ४० हेक्टर क्षेत्रात १७-१८ वष्रे एकतर्फी गुंतवणूक करण्यात मोठाच जुगार होता. पण स्वत:ची जिद्द, हिंमत व अथक प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे

सागवानाच्या शेतीसाठी ४० हेक्टर क्षेत्रात १७-१८ वष्रे एकतर्फी गुंतवणूक  करण्यात मोठाच जुगार होता. पण स्वत:ची जिद्द, हिंमत व अथक प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्य़ाच्या राळेगाव तालुक्यातील भांब गावातील प्रभाकरराव उत्तरवार सागवान शेतीत कमालीचे यशस्वी झाले. उत्तरवार हे १९५५ सालचे नागपूर विद्यापीठाचे कृषी पदवीधारक आहेत. सर्व शेती स्वबळावरच करायची असल्यामुळे कमी त्रासाच्या व देखरेखीच्या पर्यायी शेतीचा स्वीकार त्यांनी केला. कारण अमेरिकेतील मुलाकडे आणि मुंबईतील मुलाकडे वर्षांतून काही काळ घालवण्याची मुभा व मोकळीक त्यांना हवी होती. पण खासगी वनशेतीत आधी १८-२० वष्रे गुंतवणूक करताना त्यात मोठा धोका होता.
   सागवानाची लागवड १९९२ पासून प्रथम २० हेक्टरमध्ये सुरू केली. दुसऱ्या वर्षी परत २० हेक्टरमध्ये लागवड केली. सागवान रोपटय़ांशी स्पर्धा नको म्हणून इतर पिके घेणे बंद केले. सुरुवातीला त्यांनी रोपांना युरिया खत दिलं. स्फुरद व पालाश खत न देता उपलब्ध असलेल्या प्रमाणात शेणखत मात्र दर वर्षी दिले. सिंचनासाठी सुरुवातीला दोन विहिरी व नंतर चार टय़ूबवेल्सची निर्मिती केली. झाडांच्या बुंध्यापासून १.२० मीटर उंचीवरील भाग कमीतकमी ६० सेमी व्यासाचा असेल तर इमारती लाकूड म्हणून त्याची विक्री करता येते. सागवानाची लागवड झाल्यानंतर त्याची सातबाऱ्याच्या उताऱ्यामध्ये नोंद केल्यास झाड कापण्यास अडचण येत नाही. शासनाच्या परवानगीपासून झाडांची विक्री होईपर्यंत बरेच सोपस्कार करावे लागतात.
सर्वसाधारणपणे सरासरी रु. २३ हजार प्रति झाड याप्रमाणे ११ हजार झाडांची विक्री केली. या हिशेबानुसार त्यांना काही कोटींमध्ये किंमत मिळाली. विक्रीच्या सोपस्कारासाठी शासकीय परवानगीपासून झाडांची मापाई, कटाई, वाहतूक, देखरेख वगरेंसाठी जवळपास २० लाख रुपये खर्च झाला. अजून अंदाजे ३५ हजार ते ३६ हजार झाडे शिल्लक आहेत. त्यांच्या देखभालीसाठी खर्च होईलच. शिवाय मागणीप्रमाणे भाव कमी-जास्त होत राहील. तरीही पारंपरिक शेतीपेक्षा खचितच तोटय़ात राहणार नाही हे नक्की.

वॉर अँड पीस: हृद्रोग, मधुमेह, जुळय़ाचे दुखणे
जीवनशैली खूप वेगवान होत आहे. प्रत्येक जण धावपळीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे ताणतणाव वाढतो. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये अलीकडे आमूलाग्र बदल झाला आहे. एक काळ पाडवा, दसरा, दिवाळी, होळी या सणासुदीलाच गोडधोड, पक्वान्न्ो यांचा आस्वाद घेतला जाई. आता शहराच्या लहानमोठय़ा रस्त्यात, विविध हॉटेल, मिठाईवाले, बेकरी पदार्थ विकणारे दुकानदार यांची ‘मांदियाळी’ झाली आहे. समाजातील खूप मोठा तरुणवर्ग नित्य रात्रपाळी करतो. अनेक मंडळी चिंताग्रस्त होतात. आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडवून बसतात.
वीस वर्षांपूर्वी भारतात मधुमेही रुग्णांचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास होते. आता त्यात भयावह वाढ झालेली आहे. हृद्रोगी व्यक्तीचा रोग फक्त हृदयाशी संबंधित असला तर पुरेशी विश्रांती, उकडलेल्या भाज्या, मूत्रपिंडाच्या स्वास्थ्याकरिता औषधे घेऊन हृद्रोगाच्या धोक्यावर मात करता येते, पण रोगी व्यक्तीला मधुमेहविकाराची जोड असल्यास ‘आधीच मर्कट, तशातही मद्य प्याला’ असे घडते. हृद्रोग हा तुलनेने अल्प प्रमाणातील अनुवंशिक रोग आहे. मधुमेह हा खूप मोठय़ा प्रमामावर अनुवंशिक रोग आहे. या दोन्ही रोगांची दुक्कल संबंधित व्यक्तीला एकदा का चिकटली, की त्या व्यक्तीला अर्धागवात, मेंदूचे आजार, जबरदस्त हार्ट अटॅक हे रोग जवळपासच घुटमळत असतात. योग्य संधीची वाट पाहताच रुग्ण तणावग्रस्त, बेसावध असताना जबरदस्त फटका देऊ शकतात.
मधुमेही, हृद्रोगी रुग्ण मित्रांनो, आपल्या दैनंदिन कामात, उद्योगधंद्यात, नोकरीचाकरीत व्यत्यय न आणता पुढीलप्रमाणे सत्वर उपाय करा. नियमितपणे बेलाची दहा छोटी पाने, एक कप पाणी आटवून अर्धा कप काढा उरवून प्यावा. जेवण विभागून जेवावे. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, मधुमेहवटी, गोक्षुरादि, सुवर्णमाक्षिकादि, शृंग, रसायनचूर्ण नियमितपणे घ्यावे. परान्न कटाक्षाने टाळावे. शवासन, दीर्घश्वसन, प्राणायाम यांचा युक्तीने वापर करावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      भोग/ यज्ञ
माणसाला नेहमी काहीतरी हवे असते. त्या हव्यासाने टोक गाठले की हवस हा शब्द वापरला जातो. हवेसे वाटणे हव्यास आणि हवस याच्या पातळ्या कशा ठरवायच्या? सोळाव्या अध्यायात असुरी वृत्तीचे चित्रण आले आहे ते ज्ञानेश्वरांनी जळजळीत शब्दांत सांगितले आहे. त्यातला असुरी हा शब्द एका विशिष्ट वृत्तीच्या जनसमुदायाला लावण्याची प्रथा आहे. तो ज्ञानेश्वरांनी परंपरा म्हणून स्वीकारला आहे. दुरितांचे तिमिर जावो, खळांची व्यंकटी सांडो, असे आळवणारे ज्ञानेश्वर परंपरा आणि गीतेमुळे इथे पछाडले आहेत. ते नरकाचा उल्लेख करतात. पाप-पुण्याचे एक अतिशय कर्मठ रूप सांगतात. प्राण्यांना विंचवाचा जन्म देऊन घाणीत ढकलल्याचा दृष्टांत सांगतात. ब्राह्मण वा वेद शिरोधार्य मानतात. ईश्वराला कर्ता करतात, हा माझ्या दृष्टीने विपर्यासच. पण ते सगळे जर वगळले तर मात्र त्यांच्या ओव्या अचूक निशाण साधतात. एकदाच नरक शब्द वापरून मी काही रूपांतरित ओव्या खाली उतरवतो. नरक आणि पाप शब्दसुद्धा केवळ एक प्रतिमा म्हणूनच वापरले आहेत.
आपल्या बळाने। जे जे मिळेल ते भोगावे। नाही काही। आणखी वेगळे।। जर असेल अशक्त। आणि भोगणे झाले अशक्य। तर तेच केवळ। अवलक्षण।। शेळीचे चरणे। वाऱ्याचे धावणे। जसे आगीचे जाळणे। सरसकट।। स्वच्छंदी वागणे। सत्याशी वाकडे। वेडेवाकडे चालणे। त्यांचे।। पशू-पक्ष्यांच्या जाती। त्यांच्या संततीची नाही गणति। तसेच होऊ आम्ही। प्रसवू संतती।। इंद्र आणि उर्वशी। तसेच किडे कृमी। कामभावनाच खरी। सर्वत्र।। सगळे असतात कामी। म्हणूनच स्त्री-पुरुषाची जोडी। आणि द्वेष हाही। कामाचीच निर्मिती।। म्हणून काम बुद्धीच खरी। तीच जोपासावी। भोगणार काय मी। मरणाच्या द्वारी।। आषाढातले मेघांचे लोट। समुद्र लाटांचा ओघ। तशा यांच्या इच्छा।। त्यांच्या होतात काटेरी जाळ्या। गुदमरवतात जिवा। काजळाचा लेप। अंधाराला।। उन्मत्तपणा ओलांडतो किनारा। सर्वत्र पसरते उष्णता। क्रोधाचा। अग्नी पेटला।।रखरखीत उन्हाळा। तेल-तुपाच्या कोठाराला। अग्नी लागला। आणि शिवाय सुटला वारा। अहंकार बळावला। काम-क्रोधाने व्यापला। आणि उन्मत्तपणा। मग होते हिंसा।। असल्या लोकांमुळे। अंधारही काळवंडला। भय घेतले नरकाने। तापही पोळला।। पापांना आली किळस। घाणही मळली। शीण आणि आळसाला। भोवळ आली।। अशुभ झाले अशुभाला। विटाळही विटाळला। ही कथा सांगता सांगता। वाचा आली रडकुंडीला।। असा हा काम-क्रोधाचा लोभाचा पसरा। विझवतो विवेकाचा दिवा। या तीन खिळ्यांनी हाणलेला निकृष्ट जिवाचा उंबरा।। ही त्रिपुटी म्हणजे। चोरी चहाडी आणि शिंदळकी। ही निपटली तरच। नगर होईल सुखी।। ही असली माणसे। दिसतात करताना यज्ञ। ही असली विपरित कर्मे। भ्रमिष्ठपणाचे लक्षण।।
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १८ नोव्हेंबर
१८८२ > अण्णासाहेब किलरेस्करांच्या ‘संगीत सौभद्र’चा पहिला प्रयोग पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला. मूळ संहितेत ४९ पदे असलेल्या या नाटकाने नाटय़संगीताचाच नव्हे तर मराठी माणसाच्या सांस्कृतिक अभिरुचीचाही इतिहास घडवला. आजही या नाटकातील पांडुनृपति जनक जया, वद जाऊ कुणाला शरण, प्रिये पहा.., नाही मी बोलत, लग्नाला जातो मी, माझी मातुलकन्यका, राधाधरमधुमिलिंद जयजय, अरसिक किति हा शेला आदी किमान १५ पदे लोकप्रिय आहेत.
१९०१ > चित्रपटकार व्ही. शांताराम यांचा जन्म. ‘शांतारामा’ हे आत्मचरित्र त्यांच्या नावावर आहे.
२००६ > ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘देव माझा विठू सावळा’ या गीतांचे कवी हणमंत नरहर जोशी म्हणजेच ‘कवी सुधांशु’ यांचे निधन. आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. औदुंबर येथे ‘सदानंद साहित्य मंडळा’ची स्थापना तसेच १९३९ पासून ‘औदुंबर साहित्य संमेलना’ची सुरुवात त्यांनी केली व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविना हे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला होता.
संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2013 at 02:10 IST

संबंधित बातम्या