scorecardresearch

कुतूहल : अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय!

डॉ. सय्यद जहूर कासीम यांनी ९ जानेवारी १९८२ रोजी अंटार्क्टिकाच्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादित जमिनीवर भारताचा तिरंगा सर्वप्रथम फडकवला.

kutuhal sayyed jahur kasim
डॉ. सय्यद जहूर कासीम

डॉ. नंदिनी वि. देशमुख

डॉ. सय्यद जहूर कासीम यांनी ९ जानेवारी १९८२ रोजी अंटार्क्टिकाच्या पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादित जमिनीवर भारताचा तिरंगा सर्वप्रथम फडकवला. अंटार्क्टिका खंडाच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ १४ जणांची पहिली भारतीय अंटार्टिक मोहीम राबविण्यात आली. भारतासाठी ही खूप अभिमानाची बाब होती, कारण तोपर्यंत अंटार्क्टिकाला जाणे ही विकसित आणि श्रीमंत देशांची मक्तेदारी होती. भारत अंटार्क्टिकावर पोहोचणारा तेरावा देश होता. त्या काळात दीड कोटी रुपयांचा खर्च आलेली ही शोधमोहीम भौगोलिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरली. शिवाय ध्रुवीय विज्ञानाचे नवे दालन भारतीय शास्त्रज्ञांसमोर उघडले गेले. त्यातून ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध लिहिले गेले आणि अनेकांनी याविषयावर पीएच.डी. संशोधन केले. याखेरीज भारताच्या संरक्षण दलांना अतिथंड प्रदेशात वावरताना कोणते उपाय करता येतील, हे अधिक स्पष्ट झाले. या कृतीमुळे संपूर्ण जगात भारताच्या क्षमतांची दखल घेतली गेली. हिंदी महासागरात आपले नौसैनिक अधिक कार्यरत झाले. ही मोहीम भारतासाठी सागरी संशोधनाचे एक नवे पर्व ठरली आणि याचे शिल्पकार होते डॉ. कासीम.

कौसंबी या अलाहाबादजवळच्या राजघराण्यात १९२६ मध्ये जन्मलेल्या डॉ. कासीम यांचे नाव भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून मानाने घेतले जाते. अंटार्क्टिकाप्रमाणेच १९८१ ते १९८८ या दरम्यान इतर निरनिराळय़ा सात समुद्री शोध मोहिमांचे नेतृत्व करणारे डॉ. कासीम भारत सरकारच्या नियोजन मंडळाचे सदस्य (१९९१ ते १९९६), जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू (१९८९ ते १९९१) आणि अनेक संस्थांतील मानद प्राध्यापक होते.

अलिगड विद्यापीठातून प्राणिशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी ब्रिटनच्या नॉर्थ वेल्स परगण्यातील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पीएच.डी. आणि डी.एस.सी. मिळवली. केंद्रीय समुद्रीय मत्स्यकीय अनुसंधान संस्थेच्या निर्देशक पदावर १९७१ ते १९७४ या कालखंडात ते नियुक्त झाले. यांच्या कार्यकौशल्यामुळे त्यांना ‘लाल बहाद्दूर शास्त्री पुरस्कार’ (१९७८), ब्रिटनचा ‘ओशनोलॉजी इंटरनॅशनल लाइफटाइम पुरस्कार’ (१९९९) आणि  ‘इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेस लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार’ (२००८) इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पद्मश्री (१९७४) आणि पद्मभूषण (१९८२) या दोन्ही नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले जाणारे ते एकमेव सागरी संशोधक होते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या