नवदेशांचा उदयास्त – चेक प्रजासत्ताक

मोठय़ा संख्येने अधार्मिक लोक असलेल्या युरोपातील देशांमध्ये चेक प्रजासत्ताकाची गणना होते.

१४१० मध्ये प्राग येथे बसवण्यात आलेले खगोलशास्त्रीय घडय़ाळ. हे सगळ्यात जुने असे जगातले तिसरे घडय़ाळ आहे.

१ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकिया राज्यसंघाची फाळणी होऊन त्यातून चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन स्वतंत्र देश उदयाला आले. चेक प्रजासत्ताकातील ९५ टक्के लोक चेकवंशीय तर उर्वरित लोकांमध्ये स्लोव्हॅक, जर्मन, पोलिशवंशीय आहेत. मोठय़ा संख्येने अधार्मिक लोक असलेल्या युरोपातील देशांमध्ये चेक प्रजासत्ताकाची गणना होते. एक कोटी दोन लाख लोकसंख्येच्या या देशात ३५ टक्क्यांहून अधिक लोकांनी कोणताही धर्म मानत नसल्याचे नोंदविले तर ४५ टक्क्यांहून अधिकांनी आपल्याला धर्मच नसल्याचे कळविले. या देशात ख्रिश्चन धर्मीय लोक १६ टक्के तर मुस्लीम अगदीच नगण्य आहेत. अर्धशतकभर या प्रदेशावर असलेल्या निधर्मी कम्युनिस्ट सत्ताधाऱ्यांच्या प्रभावामुळे बहुधा अशा प्रकारची अधार्मिकता येथे रुजली असावी.

पश्चिमेकडील बोहेमिया, पूर्वेकडील मोराविया आणि इशान्येचा सिलेशिया अशा तीन प्रदेशांचा मिळून हा प्रजासत्ताक देश बनला आहे. या तिघांची १४ व्या शतकात इथे बोहेमियाची राजवट स्थापन झाली. पुढे बोहेमिया अ‍ॅस्ट्रो-हंगेरी साम्राज्यात आले. या साम्राज्याच्या विघटनानंतर बोहेमिया आणि स्लोव्हाक प्रदेशाचा एकत्रित चेकोस्लोव्हाकिया झाला. १९९३ मध्ये चेकोस्लोव्हाकियाच्या फाळणीनंतर चेक किंवा झेक प्रजासत्ताक निर्माण झाले. हा प्रदेश अ‍ॅस्ट्रो-हंगेरी साम्राज्याचा भाग असतानाच येथे विविध औद्योगिक प्रकल्प, विशेषत: संरक्षणविषयक कारखाने सुरू झाले. पुढे विशेषत: बोहेमिया आणि मोरावियात विविध उद्योगांना चालना मिळून चेक अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी राहिली आहे. चेक प्रजासत्ताकाच्या अर्थव्यवस्थेला सध्या प्रबळ बनविणाऱ्या उद्योगगृहांमध्ये १८९४ साली सुरू झालेली बाटा शू कंपनी, स्कोडा ऑटो, टाटा ही अवजड ट्रक उत्पादन करणारी कंपनी, जावा मोटो हे मोटारसायकल उत्पादक, मोराविया स्टील वगैरे अनेक उद्योगगृहे आहेत. त्यांच्या आवश्यकतेहून अधिक ३० टक्के विद्युत निर्मिती येथे होत असल्याने उर्वरित वीज दुसऱ्या देशांना निर्यात होते. प्राग हे प्रजासत्ताक चेकचे राजधानीचे शहर हे देशातील मोठे औद्योगिक शहर आहे. औद्योगिकीकरणामुळे समृद्ध झालेला हा देश जगातील सर्वाधिक सुरक्षित, समृद्ध, स्थिर राजकीय परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत     ११ व्या क्रमांकावर आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Czech republic information zws

ताज्या बातम्या