scorecardresearch

भाषासूत्र :  वाक्प्रचार : स्थळ स्वयंपाकघर

पापड वाकडा होणे- हा वाक्प्रचारही स्वयंपाकघरातील दृश्य डोळय़ासमोर उभे करणारा आहे.

Bhasha sutra
(संग्रहित छायाचित्र)

– डॉ. नीलिमा गुंडी.

जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करणारे वाक्प्रचार स्वयंपाकघरातील वस्तू आणि पदार्थाच्या पाककृती यांना कसे दूर ठेवतील? दैनंदिन जीवनाशी वाक्प्रचार कसे सलगी करतात, ते या निमित्ताने नेमके लक्षात येते.

कणीक तिंबणे, याचा शब्दश: अर्थ आहे, पोळी करण्यासाठी भिजवलेली कणीक खूप मळून मऊ करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ एखाद्यास खूप मारझोड करणे, मारून वठणीवर आणणे, असा होतो.

पापड वाकडा होणे- हा वाक्प्रचारही स्वयंपाकघरातील दृश्य डोळय़ासमोर उभे करणारा आहे. पापड तळल्यावर आच लागल्यामुळे वाकडा होतो. ही प्रक्रिया यामागे गृहीत आहे. त्यामुळे पापड वाकडा होणे म्हणजे क्षुल्लक कारणावरून रुसणे.

बोळय़ाने दूध पिणे- हा वाक्प्रचार समजून घ्यायला हवा. एखाद्या लहान बाळाला आईचे दूध ओढून घेता येत नसेल, तर दुधात बोळा भिजवून त्याच्या तोंडात थेंब थेंब दूध घालावे लागते. याचा अर्थ ‘बालबुद्धीचा असणे’ असा लक्षणेने होतो. ‘तुमची कारस्थाने न कळायला आम्ही काही बोळय़ाने दूध पीत नाही !’ असे वाक्य भांडणात कधीतरी कानी पडलेले असते.

नारळ हाती देणे म्हणजे निरोप देणे, हाकलणे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे; एखाद्याचा सन्मान करण्यात येतो, तेव्हा त्याला शाल आणि श्रीफळ देतात. तेव्हा नारळाला ‘श्रीफळ’ (कारण देवाच्या प्रसादासाठी नारळ वापरतात!) म्हणून गौरवले जाते. मात्र जेव्हा एखाद्याला कामावरून काढून टाकायचे असते, तेव्हा नारळासाठी अशा अलंकारिक शब्दाची गरज नसते. तेथे रोखठोक मामला असतो! हा भाषेतला सूक्ष्म बारकावा लक्षात घेण्याजोगा आहे.

विरजण घालणे हा वाक्प्रचार दुधाला विरजण लावून दही करण्याच्या प्रक्रियेची आठवण करून देतो. त्याचा लक्ष्यार्थ आहे, अडथळा आणणे. उदा. पावसात भिजण्याचा छोटय़ांच्या उत्साहावर नसती कारणे देत विरजण घालण्यात मोठय़ांना काय आनंद मिळतो, कोण जाणे!

याव्यतिरिक्त नाकाला मिरची झोंबणे (बोलणे वर्मी लागणे), चमचेगिरी करणे (ढवळाढवळ करणे), डाळ न शिजणे (निरुपाय होणे) असे वाक्प्रचारही स्वयंपाकघरात जणू ‘शिजले’ आहेत!

nmgundi@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-08-2022 at 05:08 IST