– फ्रेडी डिकोस्टा

एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर ते ‘नाही’ असं आहे, कारण मुळात माती जिवंत म्हणजे क्रियाशील असते. म्हणूनच ती पर्यावरणाचा एक अतिशय आवश्यक घटक आहे; तर धूळ ही मृत किंवा निष्क्रिय असते, पर्यावरणाचा आवश्यक घटक नसते; किंबहुना ती हवा, पाणी आणि जमिनीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरते.

धूळ आणि मातीमध्ये फरक असला तरी त्यांचा एकमेकांशी संबंधही आहे. धूळ तयार होण्यासाठी लागणार्‍या अनेक घटकांपैकी माती हा एक महत्त्वाचा घटक असतो, पण धुळीपासून माती तयार होत नाही. माती तयार होण्यात निसर्गातल्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. सूर्यप्रकाश, वारा आणि पाणी यांच्या मार्‍याने आणि आपल्यासारख्या सजीवांच्या काही क्रियांमुळे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या दगडांचं घर्षण होऊन झीज होते. यातून निर्माण होणार्‍या बारीक कणांना माती म्हणतात.

दिवसा सूर्यप्रकाशामुळे दगड गरम होऊन प्रसरण पावतात आणि रात्रीच्या वेळी हे दगड थंड होऊन आकुंचन पावतात. त्यामुळे या दगडांना तडे जाऊन ते फुटतात. पाऊस, बर्फ आणि वार्‍याचा खडकांवर आघात झाल्यामुळे दगडांचे कण सुटे होऊन त्यांची झीज होते. याशिवाय खडकांच्या फटीमध्ये जी झाडं वाढतात, त्यांच्या मुळांमुळे खडक फुटून त्यांचं मातीमध्ये रूपांतर होतं. शिवाय नद्या वाहून आणत असलेला गाळ, अनेक प्रकारचे जिवाणू, बुरशी आणि छोटे छोटे कीटक यांच्या दैनंदिन क्रिया, उत्सर्जित पदार्थ आणि पिकून खाली पडलेल्या पानांचं गांडूळ, कीटक किंवा काही जिवाणूंमुळे होणारं विघटन, हे सारे घटक माती तयार होण्यास हातभार लावतात. शिवाय मातीच्या कणांमध्ये असलेल्या पोकळीत अडकलेलं पाणी आणि हवा, मातीला क्रियाशील ठेवण्यास मदत करते. मातीमध्ये अनेक खनिजांचे कणही सामावलेले असतात, जे मातीत वनस्पती वाढण्यास मदत करतात.

या उलट धूळ म्हणजे अतिशय लहान आणि कोरडे कण, जे वार्‍यावर विराजमान होऊन, हवेत अगदी सहज विखुरले जातात. धुळीमध्ये जोराच्या वार्‍यावर पसरले गेलेले काही मातीचे कण, परागकण, राख किंवा काही ठिकाणी ज्वलनामुळे तयार होणारे बारीकसे कार्बनचे कण अंतर्भूत असतात. याशिवाय त्यात काही वस्त्रांचे बारीक तंतू, सजीवांची विष्ठा किंवा त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणार्‍या काही रसायनांचे सूक्ष्म कण असू शकतात. घरातल्या धुळीमध्ये, कधी माणसांचे, पाळीव प्राण्यांचे केस आणि बाह्यत्वचेचे पडलेले सूक्ष्म कण यांचाही समावेश असतो.

धूळ ही बरीचशी मातीपासून तयार झाली असली तरी, जेव्हा क्रियाशील असलेली माती काही कारणामुळे निष्क्रिय होते तेव्हा तिचं नकोसं वाटणारं रूप म्हणजेच धूळ.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org