महाराष्ट्र आणि तेलंगण यांच्या सीमेवर, गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यालगत, पोचमपल्ली नावाचे अगदी छोटेसे गाव आहे. ते गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात येते. ज्युरासिक कालखंडाच्या आरंभीच्या काळात (२० कोटी वर्षांपूर्वीपासून ते १९ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) निर्माण झालेल्या एका खडकाचा थर या भागात आढळतो. कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या (इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटच्या) भूविज्ञान विभागातील वैज्ञानिकांनी १९५८ पासून येथील भूप्रदेशाचे सर्वेक्षण सुरू केले होते. त्याच वर्षी पोचमपल्ली गावाच्या जवळ खडकाच्या थरात डायनोसॉरवर्गीय प्राण्यांच्या अस्थी सापडतात हे त्यांच्या लक्षात आले. आणखी काही अस्थी मिळतात का ते पाहण्यासाठी तिथे उत्खनन करावे असे ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकात गाडल्या गेलेल्या अतिपुरातन अस्थी खडकापासून वेगळय़ा काढणे मोठे जिकिरीचे काम असते. कामगारांना अस्थींचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्याकडून हलक्या हाताने उत्खनन करवून घ्यावे लागते. काळजी घेत काम करावयाचे असल्याने उत्खनन मंद गतीने चालते. पोचमपल्लीजवळचे उत्खनन पूर्ण व्हायलाही तीन वर्षे लागली.

या उत्खननातून ३०० पेक्षा जास्त हाडे उपलब्ध झाली. या हाडांचा अभ्यास एका टप्प्यावर पोचला, तेव्हा गोळा झालेली हाडे डायनोसॉरच्या एकाच प्रजातीच्या चार प्राण्यांची आहेत, असे दिसून आले. हाडांच्या मदतीने त्या डायनोसॉरच्या सांगाडय़ाची पुनर्बाधणी करण्यात आली. सांगाडय़ावरून त्याचे कल्पनाचित्रही तयार करण्यात आले आहे. त्याची मान आणि शेपटी लांब होती. डायनोसॉरच्या काही प्रजातींमध्ये पुढचे दोन पाय छोटे असल्याने ते मागचे दोनच पाय वापरून चालत असत. पण पोचमपल्लीजवळच्या डायनोसॉरचे चारही पाय सुदृढ होते. त्याच्या पुढच्या आणि मागच्या पायांच्या उंचीत फारशी तफावत नव्हती. म्हणजेच तो चारही पाय वापरून चालत असे, असा निष्कर्ष आपण काढू शकतो.

बंगालीमध्ये ‘बडा पा’ म्हणजे मोठा पाय, तर ग्रीक भाषेत ‘सॉरस’ म्हणजे सरडा. त्यावरून कोलकात्याच्या वैज्ञानिकांच्या गटाने पोचमपल्लीच्या या डायनोसॉरच्या प्रजातीचे नाव ‘मोठय़ा पायाचा सरडा’ या अर्थाने बरापासॉरस असे ठेवले. तर या हाडांचा शोध लागला त्या सुमाराला, म्हणजे १९६१ मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जन्मशताब्दी होती, या योगायोगामुळे या डायनोसॉरच्या प्रजातीच्या नावात रवींद्रनाथांच्या सन्मानार्थ ‘टागोरी’ असा शब्द जोडण्यात आला. बरापासॉरस टागोरीची गणना अजस्र डायनोसॉरमध्ये करावी लागेल. त्याची लांबी १५ मीटरच्या घरात होती, तर वजन सात टन होते.

डॉ. कांतिमती कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinosaurs in maharashtra zws
First published on: 06-07-2022 at 02:38 IST