१९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर युक्रेन हा एक स्वतंत्र देश बनून क्रीमिया हा त्याचा एक प्रांत बनला. क्रीमिया युक्रेनमध्ये गेला ही गोष्ट रशियन नेत्यांमध्ये खदखदत होती. पुढे मार्च २०१४ मध्ये रशियन अध्यक्ष पुतीन यांनी क्रीमियात सैन्य घुसवून ते ताब्यात घेतले आणि आंतरराष्ट्रीय विरोधाची पर्वा न करता क्रीमियाला रशियन राज्यसंघात समाविष्ट केले.

१९९१ मध्ये सोव्हिएत युनियन विसर्जित झाल्यावर २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेन एक स्वतंत्र, सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आला. सध्या येथे अर्ध अध्यक्षीय प्रणालीची एक सदनीय राजकीय व्यवस्था आहे. यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांना अधिकार आणि जबाबदाऱ्या विभागून दिल्या जातात. व्लादिमिर झेलेन्स्की हे युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि डेनिस श्मिहाल हे पंतप्रधान आहेत. यापूर्वी युक्रेन सोव्हिएत संघात समाविष्ट असताना १९८६ मध्ये तेथील चेर्नोबिल येथील अणुवीज केंद्राच्या एका अणुभट्टीत स्फोट होऊन आजूबाजूच्या शेकडो किलोमीटरच्या परिसरात मोठी आण्विक वाफांची गळती झाली. दूरवर पसरलेल्या आण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगाने ४००० जण बळी पडले. वाफेची गळती आणि त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नात ५६ कर्मचारी मृत्युमुखी पडले. चेर्नोबिल शहराचा पूर्ण परिसर कायमचा दूषित झाला आहे. या दुर्घटनेमुळे साडेतीन लाख लोक विस्थापित झाले. प्रजासत्ताक युक्रेन हा देश संयुक्त राष्टे आणि कौन्सिल ऑफ युरोप या संघटनांचा सदस्य आहे. सहा लाख चौ.कि.मीटर क्षेत्रफळ असलेल्या युक्रेनची लोकसंख्या सव्वाचार कोटींच्या घरात आहे. युक्रेनियन ही येथील राजभाषा प्रचलित असली तरी रशियन भाषाही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. येथील लोकवस्तीपैकी ७८ टक्के लोक युक्रेनियन वंशाचे तर १८ टक्के लोक रशियन वंशीय आहेत. येथील ८७ टक्के लोक ख्रिश्चन धर्मीय, ११ टक्के लोक कोणताही धर्म मानत नाहीत, तर मुस्लीम एक टक्का आहेत. जगातल्या मोठ्या धान्य निर्यातदारांपैकी युक्रेन हे एक असून त्यांनी औद्योगिक उत्पादनातही चांगली वाढ केली आहे. विविध प्रकारच्या वाहनांचे उत्पादन हा येथील प्रमुख उद्योग आहे. युक्रेनची अंतोनोव्ह विमाने आणि क्राझ ट्रक यांना युरोपीय संघात मोठी मागणी आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com