मानववंशाच्या टिकण्यासाठी मधमाशीचे असणारे असाधारण महत्त्व आपण जाणून आहोतच. परागीभवन करणारे हे कीटक नष्ट झाले तर कृषीव्यवसायदेखील आटोपता घ्यावा लागेल, या जागरूकतेचा प्रसार करणे फार मोलाचे कार्य आहे. अशा या कीटकांवर सखोल संशोधन करणारे डॉ. कमलाकर कृष्ण क्षीरसागर या पुणे येथे स्थित असणाऱ्या कीटकशास्त्रज्ञांचा परिचय करून घेतल्याशिवाय मधमाश्यांचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.

‘भारतीय मधमाश्यांचा तौलनिक अभ्यास’ या विषयात विद्यावाचस्पती असणारे डॉ. क्षीरसागर सुरुवातीच्या काळात ‘कृषी वनस्पती संरक्षण अधिकारी’ म्हणून बिहार येथील धनबाद येथे कार्यरत होते. नंतर सोलापूरच्या महाविद्यालयात त्यांनी जीवशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून जबाबदारी निभावली. तद्नंतर पाचगणीच्या ‘रेशीम संशोधन प्रयोगशाळेत संशोधन अधिकारी’ म्हणून काम केल्यावर, कालांतराने  ‘केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र’ येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध करणाऱ्या डॉ. क्षीरसागर यांची लेखनसंपदा अफाट आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या प्रयोगशाळांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. जंगली आणि पाळीव रेशीम कीटकांचा जनुकीय अभ्यासदेखील त्यांनी केला आहे. केवळ कीटकशास्त्रच नव्हे तर त्यांनी भारतीय संस्कृती, पुण्याचा इतिहास, अशा विविध विषयातदेखील भरारी मारली आहे. 

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
Jalgaon District, Electrical Inspector, Accepting Bribe, Caught, License Renewal,
जळगाव जिल्ह्यात लाचखोर विद्युत निरीक्षक जाळ्यात
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..

कृषीविषयक लेखन, मधमाश्या पालनाच्या अभ्यासावर पुस्तके, रेशीम कीटकांची माहिती, विविध कृषी शास्त्रज्ञांचे कार्य अशा विषयात त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भारती, वनराई, अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन, सृष्टीज्ञान अशा विविध संस्थांशी त्यांचे विशेष नाते आहे. भारताच्या वीस राज्यांत कार्यरत असलेल्या विज्ञान भारतीचा संस्थापक म्हणून त्यांनी खूप मोठी मोलाची भूमिका पार पाडली आहे. देशव्यापी काम करणाऱ्या या शास्त्रज्ञांनी विज्ञान भारती व स्वरूपवर्धिनी या संस्थांमार्फत विद्यार्थी व नागरिकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रत्यक्ष सहभागदेखील घेतला आहे. ग्रामीण भागात विज्ञान प्रसाराचे काम, भारतीय वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रामुख्याने प्रसार व प्रचार करणे याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे. त्यांच्या विज्ञान कथांना आणि चार पुस्तकांना पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय वसंतराव नाईक प्रतिष्ठानने २०१४ मध्ये त्यांना उत्कृष्ट कृषी साहित्याचा पुरस्कार दिला आहे.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org