scorecardresearch

कुतूहल: उष्ण पाण्याचे झरे!

पाण्याचे अनेक गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. तसे पाण्याचे सर्वच गुणधर्म महत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे, या पृथ्वीतलावरील जीवनासाठी गरजेचे!

कुतूहल: उष्ण पाण्याचे झरे!

पाण्याचे अनेक गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. तसे पाण्याचे सर्वच गुणधर्म महत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे, या पृथ्वीतलावरील जीवनासाठी गरजेचे! त्यातल्या दोन महत्त्वाच्या गुणधर्माविषयी जाणून घेऊ या. पहिला म्हणजे पाण्यामध्ये अनेक रसायने किंवा सोप्या भाषेत पदार्थ; सहजी विरघळतात. दुसरा गुणधर्म म्हणजे पाण्याची उष्णता धारण करण्याची क्षमता खूप जास्त आहे. म्हणजेच पाणी बरीच उष्णता शोषून घेते आणि शोषलेली उष्णता सहजासहजी बाहेर सोडत नाही. पाण्याला गरम आणि थंड व्हायला वेळ लागतो. विविध पदार्थ सामावून घेण्याची पाण्याची क्षमता, तापमानाबरोबर वाढते. म्हणजे गरम पाण्यात बरेच पदार्थ अधिक सहजी विरघळतात.

हे दोन गुणधर्म परिणामकारकरीत्या एकत्र आल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला निसर्गात अनुभवायला मिळते, ते उष्ण पाण्याच्या झऱ्यांच्या रूपात! निसर्गत: गरम झालेल्या पाण्याच्या झऱ्यांविषयी, आपण ऐकले असे किंवा असे झरे पाहिलेही असतील. उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान करावे, म्हणजे त्वचेचे अनेक विकार, रोग बरे होतात, असेही कोणी म्हटल्याचे आपण ऐकले असेल.

पण हे गरम पाण्याचे झरे कुठे आणि का तयार होतात? अनेक विकार बरे करण्याची काही विशिष्ट शक्ती या पाण्यात असते का? उष्ण झऱ्यांच्या पाण्याचे स्नान आरोग्याला चांगले की अपायकारक? आणि जे काही असेल त्यामागचे नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा किंवा कमीत कमी त्या दृष्टीने काही माहिती घेण्याचा प्रयत्न आपण येत्या काही भागांत करणार आहोत.

मुळात आपण पाहिले की, पाणी उष्णता शोषून घेते. आपल्याला हेदेखील माहीत आहे की पृथ्वीच्या पोटात, मोठाल्या खडकांखाली तप्त लाव्हारस आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी मातीत झिरपत खोल खडकांखाली जाते. तिथे आजूबाजूला असलेल्या लाव्हामुळे तापलेल्या खडकांमधली उष्णता, हे पाणी शोषून घेते आणि गरम होते. गरम झालेले पाणी हलके होते आणि म्हणून साहजिकच परत खडकांतून वरती येते; ज्याला आपण उष्ण पाण्याचा झरा म्हणतो. अर्थात पृथ्वीच्या पाठीवर कुठल्या भागात, किती खोलीवर, किती तापमानाचा लाव्हा आहे, खडकांना कशा आणि किती भेगा आहेत, त्या भागात किती पाऊस पडतो; या आणि अशा अनेक इतर गोष्टींवर अवलंबून, गरम पाण्याचा झरा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाखल होतो. म्हणूनच काही ठरावीक ठिकाणीच उष्ण पाण्याचे झरे आढळतात. उष्ण पाण्याच्या झऱ्यांच्या निर्मितीमागे, निव्वळ भौगोलिक कारणेच असतात.

डॉ. मानसी राजाध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 01:01 IST

संबंधित बातम्या