२५ मार्च १९३३ रोजी जन्मलेल्या वसंत गोवारीकर यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातच झाले. बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. ब्रिटनच्या अ‍ॅटोमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये ते कार्यरत होते. डॉ. विक्रम साराभाई यांच्या विनंतीवरून तेथील स्थिरस्थावर कारकीर्द सोडून ते भारतात परतले आणि इस्रो  येथे प्रोपेलेंट इंजिनीअर म्हणून रुजू झाले. पायाभूत सुविधांचा अभाव असतानाही डॉ. गोवारीकरांच्या गटाने अवकाशयानासाठी एचटीपीबी हे घन इंधन तयार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन १९७९मध्ये त्यांची विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या कारकीर्दीत एसएलव्ही-३ प्रकल्प सुरू झाला. त्याद्वारे अग्निबाणाच्या साहाय्याने, भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला गेला. 

१९८६-१९९१ या काळात ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. या दरम्यान त्यांनी जे काही योगदान दिले त्यामध्ये, दर वर्षी ‘२८ फेब्रुवारी’ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करणे, शालेय विद्यार्थ्यांकरिता ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषद’ हा स्पर्धात्मक उपक्रम, नॅशनल काउंन्र्सिंलग फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन्स या माध्यमातून शासकीय विभाग, आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि स्वयंसेवी संस्था यांना एकत्र आणून विज्ञान प्रसाराची चळवळ पसरवणे, या उपक्रमांचा समावेश आहे.

सन १९८८मध्ये डॉ. गोवारीकरांच्या मार्गदर्शनाखाली १६ निकषांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांच्या गटाने मान्सूनचा अंदाज वर्तवणारे प्रारूप तयार केले. सखोल अभ्यासानंतर ‘भारताची लोकसंख्या स्थिरावेल’ हा त्यांनी मांडलेला निष्कर्ष कालांतराने खरा ठरला.

१९९५-९८ या काळात डॉ. गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते तर १९९१-९३ या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. १९९३-९५ या काळात शेतीस लागणाऱ्या विविध खतांविषयीच्या एका प्रकल्पावर भारत सरकारने डॉ. गोवारीकर यांची सदस्यीय समिती नेमली होती. २००५ साली या सर्व विविध खतांचा विश्वकोश इतर चार सहकाऱ्यांच्या  मदतीने त्यांनी पूर्ण केला.

सन १९९४ ते २००० या काळात गोवारीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. त्यांची ‘पॉलिमर सायन्स’, ‘आय प्रेडिक्ट’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘द  अ‍ॅस्ट्रॉनिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे २००४ साली अग्निबाणाच्या इंधनाबद्द्लच्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी त्यांना ‘आर्यभट्ट’ हा पुरस्कार देण्यात आला. अनेक संस्थांच्या सुवर्णपदकांसह, भारत सरकारने त्यांना पद्माश्री तसेच पद्माभूषण देऊन सन्मानित केले. २ जानेवारी २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. ते म्हणत, ‘‘एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी या देशाचा कारभार आपले वैज्ञानिक चालवतील’’. 

– अनघा वक्टे  मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vasant gowarikar college education kolhapur phd completed akp
First published on: 28-01-2022 at 00:09 IST