रश्मी सहस्रबुद्धे
शहरात बर्याच इमारतींच्या गच्चीवरील टाक्यांमध्ये पाण्याचा साठा करून ते घराघरांत पुरवलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला मिळणारं पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी भरून ठेवावं असं आपल्याला वाटतं. मग ते आपण कशात भरून ठेवावं? रोज वापरायचं पाणी आपण मोठ्या पिंपात किंवा छोट्या टाकीत भरून ठेवतो. पण पिण्यासाठी वापर करताना ते स्वच्छ राहील अशा दृष्टीने साठवणीच्या भांड्यांची निवड करायला हवी.
यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे मातीचा माठ! यात नैसर्गिकरीत्या पाणी थंड राहतं आणि पाण्याची चवही चांगली राहते. उन्हाळ्यामध्ये तर हाच सर्वोत्तम पर्याय आहे. याचबरोबर स्टीलचं पिंप हाही योग्य आणि खात्रीचा उपाय आहे. ३०४ श्रेणीचं स्टील किंवा १८-८ प्रकारचं स्टील असल्यास रोजच्या वापरासाठी योग्य! हे गंजत नाही आणि स्वच्छ करायला सोपं असतं. त्यामुळे हल्ली प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्या इतकंच नव्हे तर स्टीलचे माठ, पिंप असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कधी कधी तांब्याचं भांडंही वापरलं जातं. पण या भांड्यांची स्वच्छता ठेवणं हे जिकिरीचं काम आहे. नाहीतर लवकरच त्यावर काळपट हिरवट रासायनिक थर जमा होतो आणि तो शरीराला हानीकारक ठरतो.
काचेची बाटली फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी सर्वांत उत्तम असली तरी फार जपून वापरावी लागते. नाहीतर ती फुटण्याची शक्यता जास्त. काचेवर कशाचाही परिणाम होत नाही. म्हणजेच आम्ल, अल्कली किंवा कोणत्याही प्रकारचे क्षार काचेवर रासायनिक परिणाम करत नाहीत.
हल्ली वापरात असणार्या प्लास्टिकच्या बाटल्या मात्र शक्यतो टाळाव्यात. उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे उष्णतेने बाहेर पडणारे प्लास्टिकचे कण पाण्यात मिसळतात आणि पोटात जातात. पोटाच्या विकारांना हे आमंत्रणच आहे. बीपीएमुक्त प्लास्टिक आणि फूड ग्रेड प्लास्टिक सुरक्षित आहे. पण प्रत्येक वेळी या प्रकारचं प्लास्टिक वापरल्याची खात्री करणं गरजेचं आहे.
तसंच पिण्यासाठी साठवायचं पाणी हे कधीही ॲल्युमिनियमच्या किंवा गॅल्व्हनाइज्ड पिंपात साठवू नये. कारण त्यातील धातू हळूहळू पाण्यात विरघळतो आणि रोग निर्माण करतो. काही घरांमध्ये पाणी भरताना कालचं पाणी शिळं झालंय म्हणून ओतून टाकलं जातं. हा तर एक प्रकारे पाण्याचा अपव्यय आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर नीट झाकून ठेवलेलं पाणी कधीच शिळं होत नाही. पिण्याचं गोडं पाणी कमी होत चाललं आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणं योग्य आहे. थोडक्यात पिण्याचं पाणी ठरावीक दर्जाच्या स्टीलच्या भांड्यात किंवा मातीच्या माठात साठवावं!
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
