विमान प्रवास करताना, घाटातून गाडी चालवताना किंवा सर्दी झाल्यावर ‘कानाला दडे बसणे’ हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला असेल. कानाला दडे का बसतात हे समजण्यासाठी कानाची रचना समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या कानाचे मुख्य तीन भाग असतात- बाह्यकर्ण म्हणजे बाहेरचा कान, मध्यकर्ण म्हणजे मधला कान आणि अंत:कर्ण म्हणजे आतला कान. बाहेरचा कान आणि मधला कान यांच्यामध्ये कानाचा पडदा असतो. या मध्यकर्णाला थेट आपल्या घशाच्या मागच्या भागाशी जोडणारी एक बारीक नळी असते, तिला ‘युस्टेशियन ट्यूब’ किंवा ‘कर्णकंठ नलिका’ म्हणतात. या नळीचं मुख्य काम म्हणजे कानाच्या पडद्याच्या दोन्ही बाजूंना म्हणजे बाहेर आणि आत, हवेचा दाब समान ठेवणं. सामान्यत: ही नळी बंद असते. पण जेव्हा आपण काही गिळतो, जांभई देतो किंवा चघळतो, तेव्हा ती क्षणभरासाठी उघडते आणि हवेचा दाब संतुलित करते.
जेव्हा तुम्ही विमानातून उड्डाण करता किंवा वेगाने उंच घाटात जाता, तेव्हा उंचीवर हवा विरळ झाल्यामुळे बाहेरील हवेचा दाब वेगाने कमी होतो, मात्र मध्यकर्णातला म्हणजे कानाच्या पडद्याच्या आतल्या बाजूचा दाब लगेच बदलत नाही. तिथं जुन्या दाबाची हवा अडकून राहते. बाहेर कमी दाब आणि आत जास्त दाब, यामुळे कानाचा पडदा बाहेरच्या बाजूला फुगतो किंवा ताणला जातो. परिणामी तो आवाजाच्या लहरींनुसार व्यवस्थित कंपन करू शकत नाही. यामुळे आपल्याला आवाज दबल्यासारखा ऐकू येतो. यालाच आपण ‘कानाला दडे बसणे’ म्हणतो.
कानाला दडे बसण्याची मुख्य कारणं म्हणजे विमान प्रवास, डोंगराळ भागात प्रवास करणं किंवा वेगाने चालणार्या लिफ्टमधून खाली-वर जाणं. जेव्हा सर्दी होते किंवा घशाला जंतुसंसर्ग होतो, तेव्हा युस्टेशियन ट्यूबला सूज येते किंवा ती कफाने भरून जाते. यामुळे ती उघडून हवेचा दाब संतुलित करू शकत नाही आणि दडे बसतात. पाण्याखाली खोलवर गेल्यावर पाण्याचा दाब वाढतो, ज्यामुळे कानाचा पडदा आतल्या बाजूला ढकलला जातो आणि दडे बसतात. बाह्यकर्णात मळ साचल्यामुळेही आवाजाच्या लहरी आत जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि कान जड वाटू लागतो. दडे काढणं म्हणजे युस्टेशियन ट्यूब उघडून कानाच्या आतला आणि बाहेरचा दाब समान करणं. यासाठी वारंवार थुंकी गिळल्यानं किंवा मोठी जांभई दिल्यानं घशातील स्नायू युस्टेशियन ट्यूब उघडतात. दडे काढण्यासाठी नाकपुड्या हाताने घट्ट बंद करा, तोंड बंद ठेवा आणि हळूवारपणे नाकावाटे हवा बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा. मात्र हे खूप जोरात केल्यास कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते हे लक्षात ठेवा.
– हेमंत साने मराठी विज्ञान परिषद
