एडविन ल्युटेन्स हे विसाव्या शतकातले एक प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुकार होते. परंपरागत आणि आधुनिक वास्तुशैलीचे अप्रतिम मिश्रण करून वास्तुसंरचना करण्यात त्यांचा हातखंडा होता. इंग्लंड आणि फ्रान्समध्ये त्यांनी केलेल्या वैशिष्टय़पूर्ण वास्तुरचनांमुळे ते विख्यात झाले. परंतु त्याहूनही ते अधिक ओळखले जातात ते त्यांनी केलेल्या भारताची राजधानी नवी दिल्लीच्या नगर रचनेमुळे.
एडविन लँडसीअर ल्युटेन्स यांचा जन्म लंडनमधील केनग्टिंनचा. वडील कॅप्टन चार्ल्स हेन्री ल्युटेन्स हे मूळचे आयरिश आणि चित्रकार. एडविन हे त्यांच्या तेरा अपत्यांपकी दहावे. प्राथमिक शिक्षण संपल्यावर एडविन यांनी १८८५ ते १८८७ या काळात केनग्टिंन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधून वास्तुकलेचा (आर्किटेक्ट) पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. १८८८ मध्ये त्यांनी स्वत:चा आर्किटेक्टचा व्यवसाय सुरू केला.
एडविनची सुरुवातीची वास्तुशैली प्रचलित कलात्मक पद्धतीची होती. पण पुढे जॅकील हे उद्यानतज्ज्ञ अभिकल्पक यांच्या साथीने त्यांनी व्यवसाय सुरू केल्यावर त्यांच्या शैलीत परंपरागत पद्धतीचा समावेश झाला. त्यांच्या सुरुवातीच्या वास्तुरचनांमध्ये सेंट जूड हॅम्पस्टेड गार्डन सबर्ब, कॅसल ड्रोगो, ब्रिटॉनिक हाऊस टॅव्हीस्टॉक स्क्वेअर लंडन, मेल्स येथील वॉर मेमोरियल, लंडनचे टॉवर हिल मेमोरियल, ट्रिनिटी स्क्वेअर, साऊथ बकिंगहॅमशायरमधील नॅशडॉम, हॅम्प्टन ब्रीज या विशेष नावाजल्या गेलेल्या वास्तूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लंडनमधील अनेक वाणिज्य संकुले, वॉशिंग्टन डीसीमधील ब्रिटिश दूतावास ही एडविनची वैशिष्टय़पूर्ण वास्तुरचना असलेली कामे विख्यात आहेत. लिव्हरपूल येथील एका रोमन कॅथलिक कॅथ्रेडलच्या त्यांच्या अभिकल्पिकी कामामुळे एडविन ल्युटेन्सचे नाव साऱ्या युरोपात श्रेष्ठ वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध झाले. या काळात त्यांची नव्याने स्थापन झालेल्या रॉयल फाइन आर्ट कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. परंतु पुढे ब्रिटिशांनी भारताची नवी राजधानी म्हणून दिल्ली शहराची घोषणा केली. दिल्लीची नगररचना आणि काही प्रासाद निर्मितीमुळे एडविन यांची प्रसिद्धी जागतिक पातळीवरील आर्किटेक्ट म्हणून झाली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
