भाषासूत्र : इंग्रजी शब्दांचे मराठीकरण

स्टेशनसाठी ‘अग्निरथविश्रामस्थान’ वा रुळांसाठी ‘लोहपट्टी’  हे प्रतिशब्द समाजाने कधीच स्वीकारले नाहीत.

भाषासूत्र : इंग्रजी शब्दांचे मराठीकरण
(संग्रहित छायाचित्र)

भानू काळे

इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या अनेक आधुनिक संकल्पना, प्रक्रिया किंवा वस्तू जेव्हा आपल्याकडे आल्या तेव्हा त्यांना मराठी प्रतिशब्द शोधायचा प्रयत्न केला गेला. सावरकरांसारख्या प्रतिभावंतांनी उत्तम प्रतिशब्द शोधलेदेखील. उदाहरणार्थ, नगरसेवक, महापौर, दिग्दर्शक, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण इत्यादी. अर्थात असे मराठी प्रतिशब्द प्रत्येक वेळी व्यवहार्य ठरले असे नाही. स्टेशनसाठी ‘अग्निरथविश्रामस्थान’ वा रुळांसाठी ‘लोहपट्टी’  हे प्रतिशब्द समाजाने कधीच स्वीकारले नाहीत.

एक किस्सा- मराठीचे एक अतिअभिमानी प्राध्यापक सर्व इंग्रजी शब्द कटाक्षाने टाळत. एकदा त्यांच्या मोटारीचा टायर पंक्चर झाला. त्याचवेळी शेजारून चाललेल्या एका शेतकऱ्याने चौकशी केली असता प्राध्यापक उत्तरले, ‘माझ्या स्वयंवाहिकेच्या वायुवाहक नलिकेचे छिद्रीकरण होऊन अंतर्गत वायूचे बहिर्गमन झाले आहे.’ गोंधळलेल्या शेतकऱ्याने ड्रायव्हरकडे चौकशी केल्यावर ‘काही नाही, टायर पंक्चर!’ असे तो म्हणाला. यावर तो शेतकरी प्राध्यापकांकडे वळून म्हणतो, ‘साहेब, असं शुद्ध मराठी येत नाही का तुम्हाला?’ कधी कधी ते इंग्रजी शब्द आपण जसेच्या तसे किंवा अगदी किरकोळ बदल करून मराठीत समाविष्ट केले. पोस्टर, कॅमेरा, फर्निचर, रजिस्टर, फाइल, टेप, पोस्टमन, मनीऑर्डर, पोस्टकार्ड, पोस्ट मास्टर, पाकीट, तिकीट, स्कूटर, टायर, ब्रेक, कार, गॅरेज, बेसिन, पाइप, प्लेट, स्टँड, सिग्नल, कंपनी, सोफासेट, कप्तान इत्यादी.

कधी-कधी इंग्रजी शब्दांचा शब्दश: अनुवादच केला गेला आणि मग तेच नवे शब्द मराठीत रूढ झाले. उदाहरणार्थ, ‘गोल्डन चान्स’ आपल्याकडे ‘सुवर्णसंधी’ झाला किंवा ‘गोल्ड बॉन्ड’ हे सुवर्णरोखे झाले. ‘ब्लॅक मनी’ला आपण ‘काळा पैसा’ म्हणू लागलो. ‘रेकॉर्ड ब्रेक’चे ‘उच्चांक मोडणे’ झाले. ‘व्हाईट पेपर’ हा सरकारी अहवाल आपल्याकडे ‘श्वेतपत्रिका’ म्हणून रूढ झाला. सत्य सामान्यत: कुठल्याही एका टोकाला नसते, दोन परस्परविरोधी टोकांच्या मध्यावर कुठेतरी ते असते. तो मध्य गाठून आपले विचार संतुलित ठेवावेत, हा ‘ब्रिटिश जंटलमन’चा एक पारंपरिक आदर्श. त्याला त्यांनी ‘गोल्डन मीन’ म्हटले. आपण त्याची पार्श्वभूमी फारशी विचारात न घेता त्यासाठी ‘सुवर्णमध्य’ हा शब्द तेवढा शोधला. अर्थात अशा शाब्दिक अनुवादातूनही भाषा समृद्ध होतच असते.

bhanukale@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कुतूहल : हिमनद्या वाचवू या!
फोटो गॅलरी