लहानपणी आपण सगळ्यांनी हे बडबडगीत नक्की ऐकलं असेल, ‘पंखा फिरतो वर छतावर, गोल गोल विजेच्या जोरावर, झोपेतही वारा देतो मंद, रात्री थंडावा, दिवसा आनंद!’ असा हा पंखा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

विद्युत पंख्याचे मुख्य तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे विद्युत मोटर. हा पंख्याचा असा मुख्य भाग आहे जो विद्युत ऊर्जेचे रूपांतर पंखा फिरवणार्‍या यांत्रिक ऊर्जेत करतो. या भागामुळेच आपण बटन दाबल्यावर पंखा सुरू होतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पाती आणि तिसरा घटक म्हणजे कॅपॅसिटर. मोटरमुळे फिरणारी पाती हवा ढकलण्याचं काम करतात तर कॅपॅसिटर मोटर सुरू करण्यास मदत करतो.

आता पंखा हवा कशी फिरवतो ते बघू या. पंख्याची पाती मोटरने गोल फिरवली जातात. पाती फिरताना हवा पुढे ढकलली जाते आणि त्यामुळे पात्याच्या वरच्या बाजूला हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. परिणामी खोलीतील हवा पंख्याकडे खेचली जाते आणि जोराने खाली ढकलली जाते. या प्रक्रियेमुळे हवा खोलीत सतत फिरत राहते. गरम हवा वरच्या भागात जमा होत नाही तर सर्वत्र एकसारखी पसरली जाते.

आता पंख्यामुळे थंड वाटण्याचं वैज्ञानिक तत्त्व समजून घेऊ या. पंखा थेट हवा थंड करत नाही पण शरीरावरून गरम आणि ओलसर हवा दूर करतो. यामुळे आपल्या अंगावरचा घाम लवकर सुकतो. यालाच सोप्या भाषेत ‘बाष्पीभवन’ म्हणतात.

पंख्यामुळे हवेचा वेग वाढतो. त्यामुळे शरीरावरील घामाचं बाष्पीभवन जलद होतं आणि शरीरावरच्या घामरूपी पाण्याचं बाष्पीभवन करण्यासाठी लागणारी उष्णतेच्या रूपातली ऊर्जा ही शरीरातल्या त्वचेच्या पेशींमधून घेतली जाते. त्यामुळे पंखा खोलीचं तापमान प्रत्यक्षात कमी करत नाही. परंतु आपल्याला मात्र त्वचेच्या पेशींमधली उष्णता ऊर्जा कमी झाल्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. हा थंडावा पूर्णपणे नैसर्गिक असतो. अगदी असाच थंडावा आपल्याला कडक उन्हाळ्यात वाळ्याच्या पडद्यामुळे मिळतो. बाहेरच्या कडक उन्हामुळे वाळ्याच्या पडद्यातील पाण्याचं बाष्पीभवन होतं व खोलीमध्ये नैसर्गिक थंडावा तयार होतो.

आता पंखा लावल्यावर आपल्याला थंड का वाटतं हे तुम्हाला कळलं असेल पण आपल्या आजूबाजूची हवा थंड का होत नाही, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पंखा खोलीतील हवा फक्त फिरवत राहतो. तो वातानुकूलित यंत्रासारखी बाष्पीभवन आणि संकोचन चक्राद्वारे खोलीतील उष्णता प्रत्यक्ष बाहेर काढून हवेचं तापमान कमी करून हवा थंड करत नाही. म्हणूनच पंख्यामुळे आपल्याला थंड वाटतं पण आजूबाजूची हवा मात्र थंड होत नाही. 

नीलम प्रभू

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org