जे आले ते रमले.. : गोव्यातील पहिला छापखाना

गोन्सालविसने पुढे १५७८, १५७९ साली तमिळ भाषा आणि तमिळ लिपीत चार पुस्तकांची छपाई केली.

 

सोळाव्या शतकाच्या अखेरीत भारतात आलेल्या जेसुइट, फ्रांसिस्कन, स्कॉटिश, बाप्टिस्ट वगैरे मिशनऱ्यांनी मराठी, मल्याळम वगैरे भाषांचा अभ्यास करून त्या भाषांत आपली प्रवचने दिली आणि ग्रंथनिर्मितीही केली. हे ख्रिस्ती वाङ्मय आणि ख्रिस्ती धर्माचा पुढे झपाटय़ाने प्रसार झाला, याचे कारण गोव्यात झालेली छापखान्याची स्थापना हे आहे. जेसुइट ख्रिस्ती मिशनरींनी इ.स. १५५६मध्ये गोव्यातला आणि बहुधा भारतीय द्वीपकल्पातला पहिला छापखाना सुरू केला.

मार्च १५५६ मध्ये काही जेसुइट मिशनरी पोर्तुगालहून गोव्यास येण्यासाठी निघाले. लिस्बन मधला एक मुद्रक जुवांव द बुस्तामांती आपल्या छपाई यंत्रसामग्रीसह याच जहाजातून त्या मिशनऱ्यांसोबत गोव्यात आला. त्याने आपल्या छपाई यंत्रासोबत रोमन लिपीतले छपाईचे खिळे म्हणजे टाइपही आणले. सप्टेंबर १५५६ मध्ये या छापखान्यात छपाईला सुरुवात झाल्यावर १५५७ साली सेंट झेवियरने लिहिलेले ‘डॉक्ट्रीना ख्रिस्टम’ हे पोर्तुगीज भाषेतले पुस्तक आणि चर्चच्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांचे निबंध प्रथम छापण्यात आले.

बुस्तामांती नंतर जुवांव गोन्सालविस याने मल्याळम लिपीचे खिळे तयार करून १५७७ साली प्रश्नोत्तर स्वरूपात एका पुस्तिकेची छपाई केली. देशी भाषेत आणि देशी लिपीत भारतात छपाई करण्यात आलेले हे पहिले पुस्तक. गोन्सालविसने पुढे १५७८, १५७९ साली तमिळ भाषा आणि तमिळ लिपीत चार पुस्तकांची छपाई केली. गोव्याचा छापखाना व्यवस्थितपणे चालू होऊन देशी भाषांमध्ये पुस्तकांची छपाई सुरू झाल्यावर लवकरच रायतूर येथेही मिशनऱ्यांनी एक छापखाना सुरू केला. रायतूरच्या या छापखान्यात फादर स्टिफन्सचे ‘ख्रिस्तपुराण’ १६१६ साली, कोकणी भाषेतले स्टिफन्सचे ‘दौत्रिना क्रिस्तां’ १६२२साली आणि स्टिफन्सचे कानारी व्याकरण १६४० साली छापण्यात आले.

पुढे डॅनिश मिशनरी विल्यम कॅरे यांनी  कलकत्त्याजवळच्या श्रीरामपूर येथे १७७८ मध्ये छापखाना सुरू करून बंगाली भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक आणि १८०१ मध्ये बायबल मधील नवा करार बंगाली भाषेत आणि बंगाली लिपीत छापले. यासाठी कॅरेने स्वतच पंचानन आणि मनोहर या बंगाली कारागिरांच्या मदतीने बंगाली लिपीचे खिळे तयार केले होते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First printing press in goa

ताज्या बातम्या