कुतूहल – मत्स्य व्यवसायातून रोजगार -२

मत्स्यखाद्य निर्मिती: मत्स्य संवर्धनात सर्वात खर्चीक परंतु खूप महत्त्वाची बाब असते मत्स्य खाद्य. माशांची वाढ जोमाने होण्यासाठी सकस व माशांना सहज पचतील असे प्रथिने,

६. मत्स्यखाद्य निर्मिती: मत्स्य संवर्धनात सर्वात खर्चीक परंतु खूप महत्त्वाची बाब असते मत्स्य खाद्य. माशांची वाढ जोमाने होण्यासाठी सकस व माशांना सहज पचतील असे प्रथिने, कबरेदके, जीवनसत्त्व यांनी युक्त असलेले खाद्य बनवून विकल्यास ते रोजगाराचे चांगले साधन ठरू शकते.
७. मॉलमध्ये मासे विक्री: भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक मॉल्स उभे राहिलेले आहेत. तिथे दैनंदिन आवश्यक वस्तूंबरोबरच विविध मासे व मत्स्य पदार्थ विकले जातात. या ठिकाणी भाडेतत्त्वावर मत्स्य विक्री विभाग चालवायला घेता येऊ शकतो.
८. शैक्षणिक संस्थांना मासेपुरवठा: ज्या शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मत्स्य विज्ञान हा विषय असतो, त्यांना गोडय़ा, खाऱ्या व निमखाऱ्या पाण्यातील मासे पुरवणे हादेखील एक स्वयंरोजगार निर्माण करणारा व्यवसाय ठरू शकतो.
९. पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन: पिंजराबांधणी हे तळे खोदण्यापेक्षा कमी खर्चीक आहे. पिंजरा तलावात किंवा धरणांमध्ये ठेवला जातो. या पद्धतीत मासे चांगले वाढल्याचे दिसून आले आहे. पिंजऱ्यात माशांची उत्पादन क्षमता १० ते २० पटींनी वाढते.
१०. मासे विक्री केंद्र: महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोंबडय़ांचे मांस विक्री केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये जिवंत कोंबडय़ा ठेवलेल्या असतात. ग्राहकाला पसंत पडेल अशी कोंबडी निवडून त्याचे मांस तो खरेदी करतो. अशाच प्रकारची मासे विक्री केंद्रेसुद्धा उघडता येऊ शकतात. ग्राहक आपल्या पसंतीनुसार माशाची निवड करू शकतो. या माशाचे मांस त्याला उपलब्ध करून देता येईल. हे मासे ताजे असल्याने त्यांना किंमतही चांगली मिळू शकते.
पीडिताला पडिताचा आधार असा हा मत्स्य व्यवसाय बऱ्याच छोटय़ा-मोठय़ा उद्योगांच्या वाढीसाठी चालना देऊ शकतो. या व्यवसायातून मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळू शकते. स्वस्त व पौष्टिक अन्नाचा पुरवठा होऊ शकतो. तसेच उत्पन्न व नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात.  

जे देखे रवी..  – धर्माचे काही खरे नाही, हेच खरे.
धृपासून आलेल्या ‘धर्म’ या शब्दात धरून ठेवतो, असा अर्थ आहे.Religion या शब्दाची एक व्युत्पत्ती Religere ( to Bind ) या शब्दांपासून दिली आहे, पण इतिहास काही तरी भलतेच दाखवतो.
पहिल्यांदा ज्यू होते, त्यांचे पुजारी मस्तवाल झाले म्हणून येशू अवतरला. त्यांचे नाव सांगत रोममध्ये जे पुजारी स्थानापन्न झाले त्यांनीही मग हल्लकल्लोळ माजवला. म्हणून मार्टिन ल्यूथरने बंड पुकारले. त्याचे अनुयायी फारच उदारमतवादी झाले म्हणून Calvin   नावाच्या धर्मगुरूने परत लगाम खेचले. मध्य आशियात त्याआधीच इस्लामचा जन्म झाला होता. त्यांचा स्वधर्मावर एवढा विश्वास की, सर्वत्र धर्मप्रसारण सुरू झाले ते युरोपमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना ख्रिश्चन भेटले आणि भिडले. असे सांगतात की, स्पेनमध्ये एकाच जागी पहिल्यांदा चर्च ते पाडून मशीद आणि परत चर्च असे तीन शतकांत घडले. जुने आमच्या देवाच्या मुलाला मारणारे ज्यू हे मूळ शत्रू आणि आता हे नवे शत्रू. हल्ली जे ज्यू आणि ख्रिश्चन मुसलमानांचे शत्रू झाले आहेत.
आमचे भांडण सर्व प्रकारच्या कर्मठांशी आहे, अशी घोषणा देत असतीलही; परंतु सगळे जग समजून आहे. ज्यूंना हिटलरने लाखोंच्या संख्येने यमसदनाला पाठविले होते तेव्हा पोप महाशय गप्प बसले होते. मनात म्हणाले, ‘आयती ब्याद जाती आहे कशाला मधे पडा.’ ९/११ च्या न्यूयॉर्कवरच्या हल्ल्यानंतर अतिरेक्यांवर मोहीम काढली त्याचे नाव  Crusade   ठेवण्यात आले तेव्हा गहजब झाला तेव्हा धाकटय़ा बुशना एक म्हणाला, ‘‘अहो, आहे क्रुसेडच, पण उघड म्हणायचे नसते. पूर्वी क्रुसेड शब्दाला इतर धर्मीयांविरुद्धची धार होती, ती आता या सुसंस्कृत जगात उघडपणे दाखवायची नसते.’’ एकदा आसाममध्ये एका परिषदेला गेलो होतो. तिथल्या एका सहलीत एका अरण्यात एका वन्य आदिम देवीच्या देवळाजवळ बस थांबली. मी कुतूहल म्हणून आत गेलो. माझ्याबरोबरचा केरळी ख्रिश्चन, आखातात कोठल्या तरी सुलतानाच्या मर्जीने नोकरी करणारा आतच येईना, जणू विटाळ होईल. बरोबर एक ज्यूसुद्धा होता, तो उदारमतवादाचे प्रदर्शन करीत ज्यूविश प्रार्थना करू लागला.
आपण तर धर्माच्याही पलीकडले, जातिव्यवस्थेचे निर्माते. आजतागायत गांधीजींची चातुर्वण्र्याविषयी स्पष्ट भूमिका काय हे मला कळलेले नाही. बौद्ध धर्मातरानंतर जाती नष्ट झाल्या की पुष्ट झाल्या हे कळत नाही. परवा एक मैत्रीण भेटली- गुजराती, मध्यमवर्गाच्या ‘जय श्री कृष्ण’ म्हणणाऱ्या वैष्णवांच्या चाळीत राहणारी, म्हणाली, ‘‘आमची चाळ बदलली. तिथे आता जैन लोक घुसले आहेत!’’ वर्ण, वंश आणि धर्म हेच खरे भेदभावाचे मूळ आहे.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – व्हेरिकोज व्हेनस्-वाढता विकार
दिवसेंदिवस पन्नाशी-साठीपर्यंत पोचलेल्या स्त्रीपुरुषांना व्हेरिकोज व्हेनस या शिरागत वातविकाराची वाढती लागण दिसून येत आहे.  स्त्रियांमध्ये हा विकार मोठय़ा प्रमाणावर आढळतो. या विकाराचे ढोबळमानाने तीन प्रकारचे रुग्ण आढळतात. तीनही प्रकारच्या या रुग्णांमध्ये पायावर ठळकपणे दिसणाऱ्या हिरव्या निळ्या शिरा असतात. काहींच्या या शिरा घोटय़ापासून ते कंबरेपर्यंत थेट असतात. बहुसंख्य स्थूल महिलांना त्यांच्या मांडीवरील  हिरव्या निळ्या शिराजालाने हैराण केलेले असते.
या शिरा असणाऱ्या रुग्णांचे पाय खूप दुखतात; ही मंडळी जास्त काळ उभी राहू शकत नाही. थकवा लवकर येतो, हालचाल मंदावते. या विकाराची सुरुवात झाल्याबरोबर मूळ कारणाकडे लक्ष दिले तर हा विकार वाढत नाही. आपल्या सर्वाच्या शरीरात आपले अशुद्ध रक्त पायाच्या बोटापासून; उलटय़ा दिशेने मांडय़ा, कंबर अशा मार्गाने वर येत असते. असे अशुद्ध रक्त मार्गातील अडथळ्यामुळे साचत गेले की या हिरव्यानिळ्या शिरा उठून दिसतात. त्याकरिता रक्तप्रवाहाचा जोम, वेग वाढेल अशी औषधयोजना, पथ्यापथ्य कटाक्षाने करावे लागते. मा्झ्याकडे येणाऱ्या रुग्णांना तीन गोष्टींचा आग्रह करतो. वर पाय करून किंवा भिंतीला पाय लावून थोडा वेळ पडणे. कंटाळा येऊ नये म्हणून त्यावेळेस एखादे पुस्तक वा वर्तमानपत्र वाचणे. पायाच्या बोटांपासून ते कंबरेपर्यंत खालून वर महानारायणतेल किंवा चंदनबलातेलाचे अभ्यंग करावे. कटाक्षाने आंबट खारट पदार्थ टाळावे. शक्यतो अळणी जेवावे. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, लाक्षादि, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, आम्लपित्तवटी, रसायनचूर्ण दोन वेळा घ्यावे.
व्हेरिकोज व्हेनस या विकारात जखमा, पूं ही अधिक लक्षणे असल्यास त्रिफळा चूर्ण काढय़ाने जखमा धुवून; एलादितेल, शतधौत लावावे. मधुमेहग्रस्त रुग्ण असल्यास मधुमेहवटी घ्यावी. वरील पथ्यापथ्य व उपचारांनी व्हेरिकोज व्हेनस तीन महिन्यांनी बऱ्या होतात!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १२ सप्टेंबर
१९२६ > मराठी वाङ्मयाचा इतिहास मांडणाऱ्या ‘महाराष्ट्रसारस्वत’ या ग्रंथाचे कर्ते व दिवंगत कवींच्या हस्तलिखितांसाठी ‘महाराष्ट्रकवी’ हे मासिक चालविणारे संशोधक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन. त्यांनी ‘मराठी दप्तर संस्था’ सुरू केली होती.
१९९१ > स्त्रीमुक्तीचा उद्गार साहित्यातून मांडणाऱ्या विदुषी गीता जनार्दन साने यांचे निधन. ‘निखळलेली हिरकणी’, ‘वठलेला वृक्ष’, ‘लतिका’ या कादंबऱ्यांतून स्त्रीमुक्तीचा पुरस्कार त्यांनी केला, तर ‘आविष्कार’, ‘धुके आणि दहिवर’ या कादंबऱ्यांत राजकीय स्थितीचे चित्र रंगविले. ‘दीपस्तंभ’ ही समाजक्रांतीचे स्वप्न पाहणारी कादंबरी, चंबळच्या खोऱ्यात स्वत फिरून ‘चंबळची दस्युभूमी’ हे पुस्तक तसेच ‘भरतमुनीचे नाटय़शास्त्र’ या ग्रंथाचे मराठी भाषांतर अशी त्यांची कर्तृत्वकमान! ‘भारतीय स्त्रीजीवन’ हे त्यांचे पुस्तक  स्त्री-चिंतनात महत्त्वाचे आहे.
१९५६ > लेखक राजीव बापूराव नाईक यांचा जन्म. अखेरचे पर्व, आपसातल्या गोष्टी, साठेचं काय करायचं? अशी प्रायोगिक नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. गॅलिलिओ, मातीच्या गाडय़ाचं प्रकरण, गॅलिलिओ, ऐन वसंतात अध्र्या रात्री आदी रूपांतरित नाटकेही लिहिली. मराठी नाटकांची चिन्हमीमांसा करणारे ते पहिले समीक्षक आहेत.
– संजय वझरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fishing profession creat employment navneet navnit

ताज्या बातम्या