रश्मी सहस्रबुद्धे

अन्नाचा- त्यातही आवडीच्या पदार्थांचा- वास आला की, ‘जेवणाची वेळ झाली’ असं समजून शरीर अन्नपचन होण्याच्या क्रियेला म्हणजे शरीरात तशी रसायनं तयार करायला सुरुवात करतं. यालाच आपण ‘भूक लागणं’ म्हणतो. चविष्ट जेवणाचा वास, केकचा सुगंध… एवढंच कशाला, एखादी छानशी जाहिरात पाहूनही तोंडाला पाणी सुटतं तर कधी पोट भरलेलं असतानाही निव्वळ खमंग वासामुळे भूक लागल्याचा भास होऊन खाण्याची इच्छा बळावते.
अन्नाचा वास हा नाकातल्या छोट्या मज्जातंतूंमार्फत मेंदूतल्या हायपोथॅलॅमस आणि लिम्बिक सिस्टीमकडे जातो. या भागात भूक, आठवणी आणि भावना नियंत्रित केल्या जातात. त्यामुळेच मेंदूला वास आवडला की आठवणी जाग्या होऊन पोटाला आणि तोंडातल्या लाळग्रंथींना संदेश जातो, ‘लवकरच अन्न येणार आहे’! म्हणजेच वासाचा परिणाम नाक-मेंदू-पोट व लाळग्रंथी असा सुरू होतो. परिणामी तोंडाला पाणी म्हणजेच लाळ सुटते, पोटातून गुरगुरण्याचा आवाज येतो आणि पोटामध्ये पाचक आम्लाच्या निर्मितीला सुरुवात होते. म्हणजेच नाक, मेंदू, पोट यांचा एकत्रित प्रतिसाद मिळू लागतो.

थोडक्यात असं म्हणू की मेंदूच्या आणि लिम्बिक प्रणालीच्या संदेशामुळे एका बाजूला पचनास सुरुवात होतेसुद्धा आणि पर्यायाने भूक खवळते. आपल्या शरीराची ऊर्जेची गरज भागवणं हे तर भुकेचं काम आहेच. त्यामुळे ऊर्जा कमी झाली की भूक लागते आणि आपण अन्न सेवन करतो पण वर वर्णन केल्याप्रमाणे वासामुळे मेंदूमध्ये खाण्याची इच्छा उत्पन्न होणं, याला ‘भावनिक किंवा आनंददायी भूक’ म्हणता येईल.

मेंदूतलं डोपामाईन नावाचं विकरही याबाबत महत्वाची भूमिका बजावतं. या डोपामाईनमध्ये घ्रेलिन ९० आणि लेप्टीन विकरं असतात. यातील घ्रेलिन ९० चा प्रभाव जठर आणि चरबीच्या पेशी यांवर दिसतो, त्यामुळे आपली भूक भागली गेली असेल तर ‘तृप्ती देणारा’ परिणाम मिळतो. त्याच वेळेस लेप्टीन विकरामुळे आता अन्न घेण्याचं थांबवावं असाही संकेत दिला जातो. यालाच आपण ‘पोट भरलं’ म्हणतो. लेप्टीनचा प्रभाव कमी झाल्यासवा लेप्टीनच्या संकेतांना मेंदू योग्य प्रतिसाद देत नसल्यास, जास्त आहार घेतला जातो असाही अनुभव आपण घेतो. भोजनाची वेळ नसताना बटाटावड्याचा वास भूक निर्माण करून आपल्याला खाण्याच्या मोहाला बळी पाडतो.

आपल्याला असं म्हणता येईल की आपण तोंडानेच खातो असं नाही तर डोळे, नाक, मेंदू या सर्वांचा वापर करून अन्नग्रहण करतो. म्हणूनच जेवणाचं ताट हे रंगीबेरंगी आणि सुगंधित पदार्थांनी भरलेलं असेल तर ‘भूक वाढेल’ आणि चार घास जास्त जातील.

– मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org