फ्रिस्बी म्हणजे बशीसदृश एक प्लास्टिकची थाळी एकमेकांकडे फेकून ती पकडण्याचा खेळ अनेक लहान मुलं खेळतात. पण खेळताना फ्रिस्बीऐवजी घरातली साधी ताटली वापरली तर काय होईल? तीही फ्रिस्बीसारखी तरंगेल का? खरं तर फ्रिस्बीच्या तरंगण्यात आणि फिरण्यात तिच्या आकाराला फार महत्त्व आहे. फ्रिस्बीचा आकार आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकार, कडेने गोलाकार, खालून पोकळ व सपाट असतो.
फ्रिस्बी टाकताना तिच्या उडण्याच्या दिशेने तिरपी करून फिरवून टाकली की ती लांबपर्यंत जाते. फ्रिस्बी हातातून उडवल्यावर ती स्वत:च्या वजनाएवढी हवा थोडी खाली आणि थोडी पुढच्या दिशेने ढकलते. या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून फ्रिस्बी वर ढकलली जाते व तिरपी तरंगते.
स्थिर हवेत जेव्हा आपण फ्रिस्बी हवेत फेकतो, त्या वेळी हवेचे दोन प्रवाह तयार होतात. एक फ्रिस्बीच्या खालच्या बाजूला, जो फ्रिस्बी तिच्या वजनाइतकी हवा खालच्या बाजूला ढकलल्यामुळे होतो. दुसरा जरा गतिमान प्रवाह तिच्या वरच्या बाजूला तयार होतो.
जिथे गतिमानता असते तिथे दाब कमी पडतो, म्हणून फ्रिस्बीच्या वर असलेल्या हवेच्या प्रवाहात दाब कमी असून तिच्या खाली असलेल्या प्रवाहात दाब जास्त असतो. त्यामुळे फ्रिस्बी तरंगण्यास मदत होते.
फ्रिस्बीला तरंगण्यासाठी लागणारं खालच्या दिशेचं बल, हे खालच्या दिशेने प्रत्येक सेकंदाला हवा बाजूला सरकवणार्या बलाइतकं असतं. ज्यावेळी फ्रिस्बी तरंगत असते, त्यावेळी ती तिच्या उभ्या आसाभोवतीही फिरत असते. फ्रिस्बीच्या आसाभोवती फिरण्यामुळे तिचा एकदिशीय वेग स्थिर राहतो व त्यामुळे तिची पातळी एकसमान राहू शकते. जर फेकताना फ्रिस्बी फिरवली नाही तर ती तरंगत लांबवर न जाता लगेच खाली पडते. म्हणजेच फ्रिस्बी लांब अंतरापर्यंत तरंगत जाताना स्वत:च्या उभ्या आसाभोवती फिरत राहते.
आता आपण पाहू की साधी ताटली फ्रिस्बीप्रमाणेच उडवली तरीही ती हवेत का तरंगत नाही?
साध्या ताटलीला फ्रिस्बीप्रमाणे विशिष्ट आकार नसतो. वर्तुळाकार ताटलीची कडा गोलाकार नसते आणि तिचा खालचा भाग सपाट नसतो. त्यामुळे अशी ताटली हवेत फेकली की कमी दाबाचा प्रवाह ताटलीच्या वर व जास्त दाबाचा प्रवाह ताटलीखाली असे वेगवेगळ्या दाबाचे दोन हवेचे प्रवाह तयार होत नाहीत. त्यामुळे ताटली तरंगू शकत नाही. तसंच साध्या ताटलीचं वजन तिच्या उभ्या आसाभोवती एकसमानपणे विभागले नसल्यामुळे ताटली डुगडुगते आणि लगेच उलटी होऊन खाली पडते. म्हणूनच साधी ताटली घेऊन फ्रिस्बीचा खेळ खेळता येत नाही.
- डॉ. मुग्धा पत्की
मराठी विज्ञान परिषद
