– डॉ. श्रीकांत कार्लेकर, मराठी विज्ञान परिषद

पृथ्वीवरचा एक विशिष्ट प्रकारचा प्रदेश आपल्यासाठी अगदी अपरिचित आहे. तो म्हणजे कायम गोठलेला प्रदेश. अशा प्रदेशाला चिर-अतिशीत भूमी (पर्माफ्रॉस्ट) असे म्हणतात. हा गोठलेला बर्फ सिमेंट काँक्रीटपेक्षाही कठीण आणि घट्ट असतो. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात किंवा अतिशय उंच पर्वतरांगांत कमीत कमी दोन वर्षे किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ असे कायमस्वरूपी गोठलेले प्रदेश आढळतात. त्यांचे तापमान शून्य अंश ते उणे दोन अंश सेल्सियस असते. असे प्रदेश अलास्का, ग्रीनलँड, सायबेरिया, कॅनडा आणि अंटार्क्टिकावरील पृष्ठभागाखाली आढळतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे प्रदेश समुद्राच्या तळाशीही आढळतात. उत्तर गोलार्धातील १५ जमीन आणि संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर केवळ ११ जमीन ही पृष्ठभागाखाली गोठलेली असते.

बर्फामुळे एकत्रित झालेली माती, खडक आणि वाळू यामुळे असे अतिशित भूमी प्रदेश बनतात. अशा प्रदेशांचा वरचा थर नेहमीच गोठलेल्या अवस्थेत नसतो. या थराला सक्रिय (अॅक्टिव्ह) थर म्हणतात. त्यातील बर्फ उन्हाळ्यात पूर्णपणे वितळतो आणि थंडीच्या दिवसात गोठतो. हा थर अतिथंड प्रदेशात हिवाळ्यात केवळ १५ सेंटीमीटर जाड असतो आणि क्वचितच वितळतो. थोड्याशा उबदार भागामध्ये मात्र तो काही मीटर जाड असतो आणि लवकर वितळत नाही.

हा घट्ट थर वितळल्यामुळे उत्तर गोलार्धात अशा प्रदेशावर वसलेली गावेच्या गावे उद्ध्वस्त होतात. बर्फ वितळल्यामुळे त्यात साठून राहिलेल्या सेंद्रिय कार्बनचे त्यातील सूक्ष्मजीवांमुळे (मायक्रोब्ज) विघटन होऊ लागते आणि वातावरणात कार्बन डाय ऑक्साइड व मिथेनसारखे हरितगृह वायू जमू लागतात. आजकाल कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने अशा वितळणाऱ्या भूभागांची नेमकी माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पृथ्वीवरून असे लक्ष ठेवणे फारच कठीण असते. ध्रुवीय प्रदेशातील समुद्र्तळावर, समुद्रबुड जमिनीच्या (कॉन्टिनेन्टल शेल्फ) खालीही अशा तऱ्हेचे थर आढळतात, हेही पृथ्वीवरचे एक विलक्षण आश्चर्यच आहे.

शेवटच्या हिमयुगात (एक लक्ष ते २५,००० वर्षांपूर्वी) जेव्हा ध्रुवीय प्रदेशात समुद्र पातळी आजच्यापेक्षा खूप खाली होती तेव्हा ही चिर-अतिशीत भूमी तयार झाली. चिर-अतिशीत भूमीशी संबंधित सर्वात नेत्रदीपक भूस्वरूप म्हणजे पिंगो. त्या बर्फाच्छादित, वर्तुळाकार, लहान आकाराच्या, गोठलेल्या गाळाच्या लंबवर्तुळाकार टेकड्या असतात. त्यांची उंची ३ ते ६० मीटर असते आणि त्यांचा व्यास १५ ते ४५० मीटर इतका असतो. हिमयुग संपले, समुद्राची पातळी वाढली आणि चिर-अतिशीत भूमीचा काही भाग खारट आणि उबदार पाण्याखाली बुडाला.

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org