संगणकाच्या साहाय्याने चित्रालेख (ग्राफिक्स) गतिक (डायनॅमिक) करण्यासाठी सारणी बीजगणिताचा (मॅट्रिक्स अलजिब्रा) प्रामुख्याने उपयोग होतो. चित्रांचा आकार-प्रकार, रूप, स्थान व दिशानिदेशन (ओरिएन्टेशन) बदलताना मूलत: भौमितिक रूपांतरण केले जाते. उदाहरण म्हणून त्रिकोण या द्विमितीय आकृतीचे स्थानांतरण (ट्रान्सलेशन), परिवलन (रोटेशन), परावर्तन (रिफ्लेक्शन), आकारमान रूपांतरण (स्केलिंग) व वितलीयकरण (स्क्यू) सारणीच्या नियमांनुसार कसे होईल ते पाहू. सोबत दिलेल्या आकृतीत अबक त्रिकोणाचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ शिरोबिंदू आहेत. ‘अ’चे मूळ निर्देशांक (क्ष, य) तर रूपांतरित निर्देशांक अ’(क्ष’, य’) होतील. त्याचप्रमाणे आकृतीतील इतर बिंदूंचे रूपांतर होईल. सारणीतील घटक रूपांतरणाचे सहगुणक दर्शवतात. आकृतीचे ‘स्थानांतरण’ करताना (आकृती १), प्रत्येक बिंदू ठरावीक ‘ड’ अंतराने पूर्वनिर्धारित दिशेने सरकवला जातो.‘परिवलन’ करताना (आकृती २) आकृती धन ड० कोनातून फिरवण्यात येते. आकृतीचे परावर्तन (आकृती ३) केल्यावर प्रतिबिंबित चित्र अशा प्रकारे दिसेल. आकृती ठरावीक ‘ड’ पटीने लहान किंवा मोठी करणे म्हणजेच ‘आकारमान रूपांतरण’ (आकृती ४) होय. आकृती भूपृष्ठाला समांतर किंवा लंबरेषेत, ‘ड’ घटकाने ओढून तिरकस केल्यास ‘वितलीयकरण’ (आकृती ५) होईल. अशाप्रकारे त्रिमितीय चित्रांचेही रूपांतरण केले जाते. संगणकामध्ये चित्र-रूपात साठवलेला डेटा, सारणी बीजगणिताच्या नियमांनुसार सहजतेने हाताळण्यासाठी; चित्राच्या दृश्य रूपाबरोबरच भौमितिक माहिती असणे आवश्यक ठरते. संगणकीय चित्र, निर्देशक प्रणालीत (को-ऑर्डिनेट सिस्टीम) रूपांतरित करताना भौमितिक सिद्धांतांचा वापर होतो. त्यामुळेच स्थिरचित्रांबरोबरच प्रगत आणि संमिश्र चित्रालेख, संगणकीय सरूपीकरण (सिम्युलेशन) आणि चित्रे गतिमान करण्यासाठी चेतनीकरण (अ‍ॅनिमेशन) करणे सुलभ होते.

– वैशाली फाटक-काटकर

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org