माणसाला रोग का व कसा होतो यासंबंधी अनेक तर्कवितर्क केले जात होते आणि हे निसर्गाचे कोडे १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत सुटू शकलेले नव्हते. रोग आणि जंतू यांच्यातील विशिष्ट नाते सांगणारा सिद्धांत मांडणारे लुई पाश्चर हे पहिलेच शास्त्रज्ञ होत. त्यांच्या असे लक्षात आले की दूध नासणे, मद्य खराब होणे याला सूक्ष्मजीव जबाबदार असतात. या सूक्ष्मजीवांना जर दूर ठेवायचे असेल तर हे द्रव पदार्थ ६० ते १०० अंश सेल्शिअसला तापवायला हवेत. या प्रक्रियेला ‘पाश्चरायझेशन’ असे संबोधले जाते. दुधाचे दही होणे या क्रियेस लॅक्टिक जिवाणू कारणीभूत असतात असे लुई पाश्चर यांनी १८६१ साली प्रतिपादन केले. त्यांनी हेही सिद्ध केले की कोंबडय़ांमधे होणारा कॉलरा हा विशिष्ट जंतूंमुळे होतो. रोगकारक जंतूंना त्यांनी ‘जर्म’ असा शब्द वापरला म्हणून या सिद्धांताला ‘जर्म थियरी’ असे म्हणतात.
इ.स.१८४० मध्ये डॉक्टर जेकब हेन्ले यांनी आपल्या शोधनिबंधात संसर्गजन्य रोगांचे मूळ हे परजीवी जंतूंमध्ये असते असे म्हटले होते. हाच धागा पकडून डॉ. कॉख या जर्मन डॉक्टरांनी संशोधन केले. वोल्स्ताईन जिल्ह्यात जनावरांमध्ये अँथ्रॅक्स या रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने होत असे. या रोगजंतूंचा कार्य-कारण भाव सिद्ध करण्यासाठी त्यांनी उंदरांवर प्रयोग सुरू केले. अँथ्रॅक्सने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या प्लीहेमधील स्राव त्यांनी उंदरांमध्ये टोचला. काही उंदरांच्या शरीरात निरोगी जनावरांच्या शरीरातील स्राव टोचला. ज्या उंदरांमध्ये रोगग्रस्त जनावरांचा स्राव टोचला होता ते सर्व मेले आणि दुसऱ्या गटातील उंदीर मात्र निरोगी राहिले. म्हणजे रोगी जनावरांच्या रक्तातून या रोगाचा संसर्ग होतो याचा सबळ पुरावा त्यांना मिळाला होता. या प्रयोगावरून त्यांनी काही गृहीतके मांडली. त्यांना ‘कॉख-हेन्ले गृहीतके’ असे म्हणतात.
१- रोगी व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शरीरात तो विशिष्ट रोगजंतू आढळला पाहिजे.
२- हा जंतू प्रयोगशाळेत वेगळा करता आला पाहिजे.
३-या जंतूंमुळे प्रयोगशाळेतील प्राण्यांमध्ये (उदा. उंदीर, गिनिपिग) तो रोग संक्रमित करता आला पाहिजे.
४- रोगसंक्रमण झालेल्या या प्राण्यातून हा रोगजंतू पुन्हा वेगळा करता आला पाहिजे. ही चार गृहीतके खरी उतरली तरच त्या जिवाणूला त्या विशिष्ट रोगासाठी जबाबदार धरले जाईल. याच जंतु सिद्धांतानुसार लुई पश्चार यांनी रेबिज, कॉलरासारख्या रोगांवर लस तयार करण्याचे तंत्र विकसित केले.
– डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
ईमेल : office@mavipa.org