२४ कॅरेट सोनं विकत घ्यायला आपण दुकानात गेल्यावर २२ कॅरेट, ९१६, एचयूआयडी असे वेगवेगळे शब्द दिसले की गोंधळ उडतो. चला, हे सगळं अगदी सोप्या ड्टााषेत समजून घेऊ या.
कॅरेट हे सोन्याची शुद्धता मोजण्याचं एकक आहे. ‘कॅरेट’ हा शब्द अरब देशातील कॅरोब झाडाच्या बियांपासून आला. या बियांना ‘कॅराटीयन’ म्हणत. पूर्वी या बिया वजन मोजण्यासाठी वापरल्या जात, कारण त्यांचं वजन जवळजवळ सारखं असायचं. अरबीतील हा शब्द पुढे बदलत ‘कॅरेट’ झाला. रोमन काळात एक सोन्याचं नाणं २४ बियांच्या वजनाइतकं असे. म्हणून २४ ड्टााग म्हणजे शुद्ध सोनं ही कल्पना रूढ झाली आणि २४ कॅरेट ही कमाल शुद्धता मानली जाऊ लागली.
२४ कॅरेट म्हणजे ९९.९% शुद्ध सोनं. हे सोनं गडद पिवळं, चमकदार असतं; परंतु हे शुद्ध सोनं खूप मऊ असल्याने त्याचे दागिने सहज वाकू शकतात. म्हणून ते मुख्यत: नाणी व बिस्किटांसाठी वापरलं जातं.
२४ कॅरेट सोनं मऊ असल्यानं टिकाऊपणासाठी त्यात इतर धातू मिसळतात. २२ कॅरेट सोन्यात, ज्याला ‘९१६ गोल्ड’ असंही म्हणतात, १००० पैकी ९१६ ड्टााग म्हणजे ९१.६% सोनं असतं.
बहुतेक ड्टाारतीय दागिने २२ कॅरेटचे असतात. हे २४ कॅरेटपेक्षा कडक असतात, पण सोन्याचा मूळ पिवळा रंग यात टिकतो. १८ कॅरेट सोनं, ज्याला ‘७५० गोल्ड’ असंही म्हणतात, ते ७५% शुद्ध सोनं असतं. हिर्यांचे व आधुनिक डिझाइनचे दागिने या सोन्यात घडवतात.
सोन्याला वेगळे गुणधर्म आणण्यासाठी त्यात विविध धातू मिसळले जातात. तांबं सोन्याला मजबुती देतं आणि थोडी लालसर छटा आणतं. याला ‘रोझ गोल्ड’ म्हणतात. चांदी मिसळल्यानं सोनं कडक होतं, परंतु सोन्याचा पिवळा रंग टिकून राहतो. याशिवाय निकेल आणि पॅलेडियम मिसळून ‘व्हाइट गोल्ड’ तयार केलं जातं.
१००% शुद्ध सोनं व्यवहार्य नाही. सर्वात शुद्ध सोनं ‘फाइव्ह नाइन’ म्हणजे ९९.९९९% शुद्ध मानलं जातं. २४ कॅरेट म्हणजे ९९.९% आणि ‘स्टॅंडर्ड गोल्ड’ म्हणजे ९९.५% शुद्ध सोनं. आता ड्टाारतात सोन्याच्या दागिन्यांवर ‘बीआयएस हॉलमार्क’ बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, दागिन्यावर ‘२२ के ९१६’ असा मार्क असतो. याचा अर्थ, ते २२ कॅरेट, ९१.६% शुद्ध सोनं असतं. १ एप्रिल २०२३ पासून प्रत्येक हॉलमार्क दागिन्यावर एचयूआयडी नंबर बंधनकारक आहे. या कोडवरून दागिन्यांची संपूर्ण माहिती मिळवता येते.
पुढच्या वेळी सोनं खरेदी करताना फक्त वजन आणि डिझाइन पाहू नका. कॅरेट आणि एचयूआयडी नक्की तपासा. तेव्हाच तुमचं सोनं खरंच ‘सोनं’ ठरेल!
गिरीश घाटे , मराठी विज्ञान परिषद
