औद्योगिकक्षेत्रात मालाची निर्मिती होता असताना व निर्मितीनंतर मालाची गुणवत्ता तपासली जाते. प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेतलेला मालाचा नमुना अचूक असावाच लागतो; कारण या निष्कर्षांवरच उद्योगाचे आर्थिक गणित ठरते.

पेट्रोलियमक्षेत्रात साठवणूक टाक्यात हजारो लिटरचा माल साठवून ठेवला जातो. इंधन व वंगणाची गुणवत्ता तपासणी करताना त्यातील लिटरभर नमुना काढून प्रयोगशाळेत तपासला जातो. हा नमुना विशिष्ट मोजमापाने घ्यावा लागतो. या विविध प्रकारच्या साठय़ांचे नमुने काढण्यासाठी विविध शास्त्रोक्त पद्धती वापरतात. हे नमुने स्वैरपणे काढून चालत नाही. नमुना प्रातिनिधिक स्वरूपाचा असावा लागतो. त्यात एकजिनसीपणा तर हवाच असतो, पण तो संयुक्तही (कम्पोझिट) असावा लागतो.

टाक्यातील नमुना काढताना त्यातील सर्व थरांना न्याय द्यावा लागतो. वरचा थर, मधला थर आणि तळाचा थर; अशा तिन्ही थरांतील नमुने काढून त्यांचे एकप्रमाणाचे मिश्रण केले जाते व संयुक्तच   नमुना तयार केला जातो. साधारणपणे वरच्या थरातील नमुना हा पृष्ठभागापासून एक षष्ठांश खोलीपर्यंत, मधला थर हा अध्र्या खोलीपर्यंत तर खालचा थर हा पाच षष्ठांश खोलीपर्यंत असतो. अर्थात, वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, अगदी वरच्या, मधल्या किंवा एकदम तळाच्या थरातील नमुना काढायचा किंवा कसे, ते ठरविले जाते. पाइपमधून वाहणाऱ्या पदार्थाचा प्रवाही नमुनाही तपासणीसाठी काढावा लागतो. पिंप, बाटल्या, ड्रम, नळकांडी, डबे; अशा छोटय़ा  पॅकमधल्या मालाचा नमुना सांकेतिक पद्धतीने (उदा. घनमूळ पद्धतीने) काढण्यात येतो. त्यानुसार पॅकेजमध्ये दोन ते आठ पॅक असतील तर नमुन्यासाठी त्याच पॅकेजमधले दोन पॅक निवडतात. जर पॅकेजमध्ये नऊ ते २७ पर्यंत पॅक असतील तर नमुन्यासाठी त्याच पॅकेजमधले तीन पॅक निवडतात. अशा प्रकारे नमुना काढल्यावर तो स्वच्छ बाटली वा धातूच्या डब्यातून प्रयोगशाळेत पाठविला जातो. नमुन्याचा पदार्थाशी, तो वाहून नेणाऱ्या साधनाच्या द्रव्याबरोबर (धातू, पॉलिथिन, काच इत्यादी) कोणतीही रासायनिक क्रिया होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. नमुना द्रवरूपात असेल तर, त्यातील थोडय़ाशा द्रवाने बाटली-डबा धुऊन (रिन्सिंग) मग त्यात नमुना भरणे जास्त योग्य!

एखादा नमुना गुणवत्ता कसोटीस उतरत नसेल तर दुसरा नमुना मागवून खात्री करून घेतात. नमुना असलेल्या साधनावर लेबल असणे महत्त्वाचे असते आणि त्यावर नमुन्याचा स्रोत, बॅच क्रमांक, तारीख, वेळ व इतर माहिती असणे आवश्यक असते.

– जोसेफ तुस्कानो ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : निर्मल वर्मा यांचे साहित्य

नवकथेचे पुरस्कर्ते, पत्रकार निर्मल वर्मा यांनी अनेक वर्षे भारताबाहेर प्रवास, वास्तव्य केल्यावर भारतात परत आल्यावर त्यांना दिसणारा भारत कसा दिसला? देश- विदेशातील अनुभवांमुळे मनात जो तुलनात्मक विचारांचा कल्लोळ माजला त्याविषयी ते  ‘अपने देश वापसी’मध्ये लिहितात- ‘गंगा-यमुनेच्या तीरावर डुबकी मारल्यावर प्रवासातील माझा सारा थकवा- दोन्ही नद्यांत अर्धाअर्धा वाहून जातो. पाणी तसे गलिच्छ आहे. सुकलेली फुले पाण्यावर तरंगत आहेत. अशा आपल्या देशातील नदीच्या पाण्यात विदेश प्रवासाचा शिणवटा बुडून जातो. मग मनात आलं, हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या आर्यानी याच नदीच्या पात्रात आपला धूळभरा देह आणि थकवा धुवून दूर केला असेल. त्या सगळ्या विदेशींना वाटतं की, हिंदुस्तानी माणसं अद्भुत आहेत. गंगेच्या अस्वच्छ पाण्यात अनेक जंतू असतात, याची त्यांना जाणीवही नसते. या देशात सर्वत्र सगळं काही मोकळं ढाकळं असत. स्वत:साठी असं खास काहीच नसतं. भारतीयांना प्रायव्हेट- खासगी- हा शब्दच माहीत नसतो. याउलट युरोपात सामाजिक जीवन कितीही मुक्त असलं तरी आपल्या घरात, आपल्याच माणसांपासून ते स्वत:च खासगीपण जपताना दिसतात.. भारतात परतल्यावर ज्या गोष्टी तीव्रपणे खटकतात ती गरिबी नसून आत्मसन्मानाची जराही बूज नसलेलं सुसंस्कृत वर्गाचं वैचारिक दारिद्रय़ आहे. गरिबी आणि दारिद्रय़ यामध्ये फरक आहे..’

हिन्दी साहित्य क्षेत्रात अज्ञेय आणि निर्मल वर्मा हे दोनच लेखक असे होते की त्यांनी प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे पाश्चात्त्य व भारतीय संस्कृतीच्या आंतरद्वंदाचा खोलवर आणि व्यापक विचार केला आहे. ‘शब्द आणि स्मृती’ या निबंध संग्रहातील लेखांमध्ये निर्मल वर्मानी विविध साहित्य प्रकारांविषयी, भारतीय कादंबरी लेखनाच्या निकषाविषयी काही विचार मांडले आहेत. ते लिहितात- ‘हिन्दीमध्ये किती चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, हा इथे प्रश्न नाही. मूळ प्रश्न हा आहे की, हिन्दी कादंबऱ्यांचं मूल्यांकन आपण कोणता कसोटीवर करतो? जोपर्यंत आपल्याकडे योग्य मूल्यमापकच नसेल तर आपल्या मूल्यांकनाला विश्वासार्हता प्राप्त होत नाही. कादंबरी किती वास्तववादी आहे, यापेक्षा त्यातील घटना, पात्र, आशय या सगळ्यांचा अंर्तबाह्य़ मेळ किती समर्थ शैलीत रेखाटला आहे या प्रक्रियेवर कादंबरीची गुणवत्ता जोखता येईल. अनुभवाच्या आशयापेक्षा तो आशय ज्या प्रकारे व्यक्त होतो त्या रूपाला, अभिव्यक्तीला महत्त्व आहे. भारतीय समाजाची मुळं ज्या मातीतील आहेत, त्याला अनुसरूनच कादंबरीची रचना (फॉर्म) शोधायला हवी.’

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com