लोह, कॅल्शियम आणि जस्त यांसारखे धातू मानवी शरीरासाठी अत्यावश्यक असतात, अर्थात तेही योग्य प्रमाणात! पण कधीकधी काही धातू अगदी थोड्या प्रमाणात जरी शरीरात गेले तरी ते अपायकारक ठरतात. अशा धातूंना ‘जड धातू’ म्हटलं जातं. हे धातू शरीरात साठत जातात आणि त्यामुळे हळूहळू गंभीर आजार उद्भवतात.

यातला पारा हा अत्यंत धोकादायक धातू आहे. तो प्रदूषित मासे, औद्योगिक कचरा आणि काही सौंदर्यप्रसाधनांतून शरीरात जातो. त्याचा परिणाम मेंदू व मज्जासंस्थेवर होऊन स्मरणशक्ती कमी होणं आणि शरीराला कंप सुटणं अशी लक्षणं दिसतात. गर्भवतींमध्ये तो बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम करतो. त्यामुळे त्यांनी मोठे समुद्री मासे मर्यादित प्रमाणात खावेत, असं सांगितलं जातं.

तसंच शरीराला शिसंही अपायकारक ठरतं. शिसं जुन्या रंगांमधून, दूषित पाण्यातून आणि काही काजळ-सुरम्यांतून शरीरात जातं. शरीरात शिरलेलं शिसं हाडांमध्ये साठत राहतं. त्याचा मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. प्रौढांना उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात.

कॅडमियम हाही एक अपायकारक धातू. हा सिगारेटच्या धुरातून, काही खतांमधून आणि बॅटरी-गळती झाल्यास शरीरात जाऊ शकतो. तो मुख्यत: मूत्रपिंड आणि हाडांचं नुकसान करतो. त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात. कॅडमियम कर्करोगजनक मानला जातो. त्यासाठी धूम्रपान टाळणं हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. गळणार्‍या ‘बॅटरीज्’ची योग्य विल्हेवाट लावणंही गरजेचं आहे.

अर्सेनिक हा धातूसदृश पदार्थ आहे. तो दूषित भूगर्भजलातून शरीरात जातो. दीर्घकाळ असं पाणी प्यायल्यास त्वचेवर डाग पडतात, तळहात-तळपाय जाड होतात. फुप्फुसांचा, मूत्राशयाचा वा त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पाण्याची तपासणी करणं आणि योग्य फिल्टरचा वापर करणं आवश्यक आहे.

ॲल्युमिनियम हा ‘जड धातू’ नसला तरी रोजच्या वापरातील एक धातू आहे. तो फार विषारी नसला तरी त्याचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यात आंबट पदार्थ शिजवल्यास हा धातू अन्नात मिसळू शकतो. त्यामुळे स्टेनलेस स्टील किंवा लोखंडी भांडी वापरणं अधिक सुरक्षित!

वर चर्चिलेले धातू शरीरातून सहज बाहेर पडत नाहीत आणि अवयवांत साठतात. ते शरीरातील महत्त्वाच्या रासायनिक प्रक्रिया बिघडवून नवीन रक्तनिर्मिती मंदावतात. तसेच ते पेशी, डीएनए व प्रथिनांना हानी पोहोचवून कर्करोग व इतर दीर्घकालीन आजारांचा धोका वाढवतात.

थोडक्यात, जड धातू शरीरात जाऊच नयेत याची काळजी घेणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. स्वच्छ पाणी, सुरक्षित अन्न, योग्य भांडी आणि योग्य सवयी यामुळे आपण मोठ्या धोक्यापासून स्वत:ला वाचवू शकतो.

  • गिरीश घाटे, मराठी विज्ञान परिषद