पेन हे एक असं साधन आहे, ज्याच्या साहाय्याने आपण कागदावर लिहू शकतो किंवा चित्र काढू शकतो. जगातील पहिलं पेन म्हणजे बोरू किंवा पीस. बोरूच्या टोकाला तिरकस कापून त्यापासून लेखणी तयार केली जात असे आणि मग ही लेखणी शाईमध्ये बुडवून त्याच्या टोकानं भूर्जपत्रावर लिहिलं जात असे. सुमारे इसवीसन पूर्व ३००० मध्ये याचा वापर प्रथम झालेला आढळतो.

इसवीसन ६००च्या सुमारास पक्ष्यांच्या पिसापासून लेखणी तयार केली गेली. पण या लेखणीला सारखं शाईत बुडवावं लागत असल्यामुळे अशी लेखणी तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला, ज्यात शाई साठवण्याची सोय असेल. या प्रयत्नातून १८८४ मध्ये लुईस वॉटरमेन यांनी पहिल्या शाईच्या पेनचा शोध लावला. याआधीदेखील असे काही प्रयत्न झाले पण वॉटरमेनचं पेन हे प्रचलित झालं. यामध्ये शाई साठवण्याची सोय होती. या पेनमध्ये द्रव पदार्थाच्या केशाकर्षणाच्या गुणधर्माचा वापर केला गेला होता. केशाकर्षणामुळे पेनाच्या निबच्या खाली असलेल्या ‘फीड’पर्यंत शाई येते आणि पेन कागदावर ठेवून लिहिल्यावर कागदावर अक्षरं उमटतात.

या प्रकारच्या पेनमध्ये कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात शाई येत असे. या पेनच्या शाईत पाणी हे द्रावक असतं. त्यामुळे कागदावरची शाई सुकायला वेळ लागतो. हे पेन विमानात वापरता येत नाही. उंचावर गेल्यावर हवेचा दाब कमी होतो व साठवलेली शाई पेनच्या बाहेर येते. त्यामुळे या दोषांवर मात करण्यासाठी ‘बॉलपेन’चा शोध लावला गेला. बॉलपेनची शाई बरीच घट्ट असते. बॉलपेनच्या पुढच्या टोकाला सॉकेटमध्ये अतिशय सूक्ष्म बॉल बसवलेला असतो. हा सॉकेट शाईने भरलेल्या नळीला म्हणजे ‘रिफील’ला जोडलेला असतो. लिहिताना हा बॉल सॉकेटमध्ये फिरतो व रिफीलमधली शाई कागदावर उमटते.

रेखीव अक्षरासाठी आणखीन एक लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘जेलपेन’! बॉलपेनची शाई ही तेलाचा द्रावक म्हणून वापर करते. शिवाय सॉकेट व बॉलमध्ये घर्षण कमी करण्यासाठी ग्लिसरॉलसारख्या द्रवाचा वंगण म्हणून उपयोग होतो. मात्र जेलपेनच्या शाईत द्रावक पाणी असतं आणि शाई ही जेल स्वरूपात असते.

शोभिवंत अक्षरासाठी ‘स्केचपेन’चा वापर केला जातो. याचं टोक फेल्टचं बनलेलं असतं पण याची लिहिलेली अक्षरं काही दिवसांनी फिकी पडतात.

‘पर्मनंट मार्कर’मध्ये शाई ही अल्कोहोलमध्ये विरघळवलेली असते. या शाईमध्ये काही अशी रसायनं असतात जी पृष्ठभागाला घट्ट धरून ठेवतात. टचस्क्रीन संगणक (कॉम्प्युटर), लॅपटॉप व टॅबलेट यांच्या स्क्रीनवर लिहिण्यासाठी हल्ली ‘स्टायलस’चा वापर होतो. तेही आधुनिक पेनच की! आणि तेही पूर्णपणे शाईिवरहित!

 – सुधा सोमणी ट,मराठी विज्ञान परिषद