नवदेशांचा उदयास्त : मंगोलियन उझबेकिस्तान

मंगोल फौजांनी केलेल्या निष्ठूर कत्तलीमुळे मूळ इराणी वांशिक लोकांचा मोठा संहार झाला.

उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथील अमीर तिमूर स्मारक

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

आठव्या शतकात उझबेकिस्तानच्या प्रदेशावर इराणी साम्राज्याची सत्ता असताना अरब मुस्लिमांनी आक्रमण करून त्यांचा अंमल बसविला. आठव्या-नवव्या शतकांमध्ये त्यांनी उझबेक प्रदेशातील सर्व जमातींचे इस्लामीकरण केले. हा काळ इस्लामचा सुवर्णकाळ समजला जातो. पुढे नवव्या-दहाव्या शतकात हा प्रदेश पुन्हा इराणच्या सामानी साम्राज्यात समाविष्ट केला गेला. १३ व्या शतकात मंगोलियाचा क्रूरकर्मा चेंगीजखानने मध्य आशियावर आक्रमण करून बऱ्याच मोठय़ा प्रदेशावर कब्जा केला. त्यात उझबेकिस्तानचा प्रदेशही होता. मंगोल फौजांनी केलेल्या निष्ठूर कत्तलीमुळे मूळ इराणी वांशिक लोकांचा मोठा संहार झाला. हा प्रदेश मंगोल साम्राज्याचा भाग बनल्यावर तिथे मंगोल-तुर्की वंशाच्या जमातींचे लोक मोठय़ा संख्येने येऊन स्थायिक झाले. मंगोल सत्ताधाऱ्यांमुळे उझबेक प्रदेशात मंगोल-तुर्की परंपरा आणि संस्कृती रुजली. १२२७ मध्ये चेंगीजखानाचा मृत्यू झाला. त्यानंतर हे राज्य त्याच्या चार मुलांकडे विभागले गेले परंतु या चारही भागांचे नेतृत्व चेंगीजखानचा पुत्र चगतायखान याच्याकडे राहिले. या राज्यातल्या व्यापारी सिल्क रोडमुळे १३व्या शतकात हा सर्व प्रदेश समृद्ध बनला होताच. पुढे १४ व्या शतकात सत्ताधारी घराण्यात झालेल्या सत्तासंघर्षांत दुसराच एक मंगोल टोळीप्रमुख तैमूरलंग ऊर्फ तिमूर हा १३८० मध्ये या सर्व उझबेक प्रदेशाचा सत्ताधीश बनला. त्याने राज्यविस्तार करीत इराण, आशिया मायनर तसेच  उत्तरेतील कुरणांचा स्टेपी प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. त्याच्या मृत्यूनंतर १४ व्या शतकाच्या सुरुवातीस पुन्हा एकदा सत्तासंघर्ष उफाळून आला आणि राज्याची  शकले पडली. तैमूरलंगची राजधानी समरकंद हे एक समृद्ध शहर होते. तैमूरच्या राज्यावरील पुढचा शासक उलुघ बेग याच्या काळात समरकंद हे विविध ज्ञान-विज्ञान आणि कला यांचे मोठे महत्त्वाचे केंद्र बनले. १५ व्या आणि १६ व्या शतकांच्या काळात या समरकंद आणि परिसरात गणित, ज्योतिषशास्त्र, क्रीडा प्रकार, वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रांमध्ये अभ्यास होऊन अनेक नवीन संकल्पना तयार झाल्या. युरोपियन रेनेसॉ म्हणजे प्रबोधनकाळाप्रमाणे १५ वे शतक हा उझबेकिस्तानचा तिमूरिड प्रबोधनकाळ समजला जातो. तैमूरच्या साम्राज्याला उतरती कळा लागल्यावर पुढे १६व्या शतकात हा प्रदेश पूर्वेकडील उझबेक भाषा बोलणाऱ्या भटक्या जमातींनी व्यापला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: History of uzbekistan mongolian uzbekistan zws

Next Story
कुतूहल : कार्यालयाची रचना
ताज्या बातम्या