नवदेशांचा उदयास्त : मंगोलियन लोकांचे अश्वप्रेम

मंगोलियाच्या रहिवाशांमध्ये ९५ टक्के तेथील मूळचे मंगोल वंशाचे आणि उर्वरित पाच टक्क्यांमध्ये कझाख जमातीचे आहेत.

मंगोलियात लहानपणापासूनच घोडेस्वारी सुरू होते.

मंगोलियात प्राचीन आणि मध्ययुगीन काळात बौद्ध धर्मआणि संस्कृत भाषेचा प्रभाव मोठा होता. तेथील अनेक बौद्ध विहारांमध्ये संस्कृत भाषेतील मंत्र लिहिलेले आढळतात. मंगोलियाच्या राष्ट्रध्वजावर डावीकडे त्यांचे सोयोंबो हे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. सोयोंबो या शब्दाचा अर्थ ‘स्वत: जन्मलेला’ असा आहे. मूलत: सोयोंबो हा शब्द संस्कृत शब्द स्वयंभू याचा अपभ्रंश आहे!

मंगोलियाच्या रहिवाशांमध्ये ९५ टक्के तेथील मूळचे मंगोल वंशाचे आणि उर्वरित पाच टक्क्यांमध्ये कझाख जमातीचे आहेत. या देशातील ३० टक्के लोक भटक्या जमातीचे मेंढपाळ लोक आहेत. अश्वपालन, त्यांची निगा हा मंगोलियन माणसाचा जिव्हाळ्याचा विषय! युरोपियन लोक मंगोलियन संस्कृतीला ‘हॉर्स कल्चर’ म्हणतात! युरोपियन, अमेरिकन लेखक मंगोलांच्या अश्वप्रेमाविषयी म्हणतात – ‘‘मंगोल माणूस त्याच्या घोडय़ाशिवाय केवळ अर्धाच मंगोलियन असतो, परंतु स्वत:च्या घोडय़ावर स्वार झालेला मंगोल मनुष्य इतर ठिकाणच्या दोन माणसांच्या बरोबर असतो!’’ एलिझाबेथ केंडाल या लेखिकेने मंगोलियात भरपूर प्रवास केल्यावर म्हटलंय की, ‘‘घोडय़ाशिवाय मंगोल माणूस, पंखांविना पक्ष्यासारखा आहे!’’ मंगोलियातील घोडय़ांची एकूण संख्या ३० लाखांहून अधिक म्हणजे माणशी एक घोडा अशी आहे! मंगोलियात घोडा पाळणे हे  श्रीमंतीचे लक्षण नसते. मंगोल मनुष्य आपल्या घोडय़ाला काही खुराक देत नाही, तो त्याला आपल्या कुरणावर मनसोक्त चरायला सोडतो. साधारणत: दहा-बारा माद्यांच्या कळपामध्ये एक नर घोडा त्यांच्या संरक्षणासाठी पाळला जातो. बहुधा नर घोडा म्हणजे स्टॅलियनच्या आयाळीचे आणि शेपटाचे केस कापत नाहीत. नर घोडय़ाच्या आयाळीचे लांब केस हे शक्तीचे, मजबुतीचे प्रतीक समजतात. मंगोलियात घोडीचे दूध सर्रास वापरले जाते. शेतीच्या कामासाठी आणि प्रवासासाठी नर घोडे वापरले जातात, अनेक वेळा घोडय़ाचे मांस अन्न म्हणून खाल्ले जाते. नवविवाहित दाम्पत्याला घोडे भेट देण्याची येथे प्रथा आहे. वधू-वरांना दोन्ही बाजूं्च्या नातेवाईकांकडून दहा ते बारा घोडे व एक स्टॅलियन भेट म्हणजे एकूण २० ते २४ घोडे आणि दोन स्टॅलियन भेट  म्हणून मिळते. मंगोलियन माणूस घोडेस्वारीत जगात सर्वाधिक पटाईत समजला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horse love of the mongolian people zws

Next Story
इतिहासात आज दिनांक… ८ सप्टेंबर
ताज्या बातम्या