डॉ. रेणू सिंह-मोकाशी
त्रिमिती छपाई तंत्र म्हणजेच थरावर थर चढवून वस्तू तयार करणे. यालाच ‘थ्रीडी प्रििटिंग’ म्हणून ओळखले जाते. ही तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारी पद्धत आहे. सुरुवातीला औद्याोगिक प्रारूपे तयार करण्यापुरती मर्यादित असलेली ही प्रक्रिया आता विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये वापरली जात आहे. सूक्ष्मजीवशास्त्र हे त्यापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. प्रयोगशाळांतील उपकरणे, जीवसृष्टीच्या अभ्यासासाठी विशिष्ट वातावरण तयार करणे, शिक्षणात्मक साधने आणि जिवंत सूक्ष्मजीवांसोबत प्रयोग अशा अनेक बाबींमध्ये त्रिमिती छपाईचा उपयोग होऊ लागला आहे.

पहिली गोष्ट म्हणजे या तंत्राद्वारे प्रयोगशाळेतील उपकरणांची निर्मिती आता शक्य झाली आहे. यात अत्यंत सूक्ष्म प्रमाणात द्रवपदार्थांवर प्रक्रिया करण्याची प्रणाली विकसित करता येते, ज्यामध्ये सूक्ष्मजीव वाढवले जातात. तसेच या तंत्राद्वारे विशिष्ट जैविक अभिक्रियापात्राचे (बायोरिएक्टर) भाग, तयार करता येतात.

दुसरे असे की, विशिष्ट सूक्ष्मजीवांसाठी संवर्धक वातावरण तयार करता येते. उदाहरणार्थ, ‘हायड्रोजेलमॅट्रिक्स’, यात पृष्ठभागावर वसाहत करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या (बायोफिल्म) अभ्यासासाठी, पारदर्शक जाळीदार पृष्ठभाग तयार करण्यात येतो, जो मानवी ऊतीसारखा वाटतो. ‘ऑक्सिजन-ग्रेडियंट चेंबर’ तयार करता येतो, ज्यात अवायूजीवी सूक्ष्मजीव वाढवता येतात. यामुळे दृश्यमान पृष्ठभागांवर सूक्ष्मजीवांच्या वाढीचे निरीक्षण करणे शक्य होते. संवर्धित सूक्ष्मजीवसमुदाय तयार करून त्यांच्या आंतरक्रिया समजून घेता येतात.

तिसरे असे की, जिवंत सूक्ष्मजीवांसह त्रिमिती जैवछपाई. जैवछपाई ही एक विशेष पद्धत आहे, ज्यामध्ये जिवंत पेशी वापरल्या जातात. याद्वारा जैवसंवेदक (बायोसेन्सर्स), जैवसामग्री (बॅक्टेरियल सेल्युलोज), प्रतिजैविक पृष्ठभाग जसे की बुरशी किंवा जिवाणू नष्ट करणारे पदार्थ तयार केले जातात.

चौथे असे की, या तंत्राद्वारे शिक्षण आणि जनजागृतीसाठी साधने तयार करता येतात. जसे जिवाणू, विषाणू आणि पेशींची मोठ्या आकारातील प्रतिकृती, संसर्ग कसा पसरतो हे दाखवणारे उपकरण वगैरे तयार करता येते.

आणि पाचवे असे की प्रतिजैविक संशोधन आणि औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी उपकरणे बनवता येतात. ‘डिस्कडिफ्यूजन’ चाचणीसाठी धारक, औषध पसरवणारी यंत्रणा (इन्सर्टर्स), जिवाणूनाशक साहित्याने तयार केलेली उपकरणे (तांबेमिश्रित प्लास्टिक) वगैरे. जैवसंगत आणि निर्जंतुक साहित्य वापरणे किंवा अतिसूक्ष्म पातळीवर छपाई करणे किंवा स्वयंचलित प्रयोगशाळा तयार करणे ही मात्र या तंत्रज्ञानापुढे भविष्यातील आव्हाने आहेत. भविष्यात त्रिमिती छपाई तंत्रामुळे मोठी क्रांती होऊ घातली आहे.

– डॉ. रेणू सिंह-मोकाशी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org