– डॉ. श्वेता चिटणीस
सभोवतालच्या दृश्यभागाशी स्वत:चं बाह्य रूप जुळवून घेणारे म्हणजे ‘छद्मावरण’ करणारे बरेच प्राणी आहेत. त्यापैकी, जमिनीवर सरडे आणि पाण्यात ऑक्टोपस हे प्राणी प्रामुख्याने रंग बदलण्यासाठी ओळखले जातात. पण या प्राण्यांना कोणता रंग धारण करायचा हे कसं कळतं? चोहीकडे हिरवळ आहे तर हिरवा रंग धारण करू या असं सरडे कसं ठरवतात?
हे प्राणी सेकंदाच्या एक दशांश वेळात, अत्यंत जलद गतीने रंग का बदलतात? इतर प्राण्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी, त्यांचं स्वत:चं खाद्य असलेल्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी, इतर प्राण्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी काही प्राणी रंग बदलतात. रंग बदलण्यासाठी या प्राण्यांचा मेंदू, मज्जासंस्थेद्वारा त्यांना सूचना देतो आणि त्याप्रमाणे त्वचा रंग बदलते.
शत्रू हल्ला करणार असं वाटून सरडे घाबरले की, सरड्यांच्या मेंदूमधलं ‘एड्रीनालीन’ नावाचं संप्रेरक, रंग बदलण्याच्या सूचना देतं. त्वचेखाली असलेल्या ‘मेलानोसाइट’ या पेशी गरजेप्रमाणे त्वचेमधला मेलानिनचा स्राव कमी किंवा जास्त करत असतात. मेलानिनच्या प्रमाणानुसार त्वचेचा रंग बदलतो. प्राणी घाबरल्यास मेलानोसाइटचा स्राव अधिक होऊन त्यांचा रंग गडद म्हणजे काळपट, गडद जांभळा किंवा चॉकलेटी होतो. ते सुरक्षित वातावरणात असल्यास मेलानोसाइट कमी होऊन त्वचेचा रंग फिकट म्हणजे पिवळा, किरमिजी किंवा मातकट होतो. हिरवळीवर आरामात बसलेला सरडा गवताचा पोपटी रंग धारण करतो. शिवाय त्यांच्या शरीराचं तापमान जास्त झाल्यास रंग फिकट होतो व कमी झाल्यास गडद होतो. मेंदू त्वचेचं तापमान योग्य राखतो. त्यांच्या त्वचेखाली ‘इरिडोफोर’ नावाच्या प्रकाश परावर्तित करणार्या पेशी असतात, त्याही त्यांना रंग बदलण्यास मदत करतात. प्राण्यांच्या त्वचेमध्ये असणार्या ‘क्रोमॅटोफोर्स’ नावाच्या रंगद्रव्ययुक्त पेशींमुळे त्वचेचा रंग बदलतो. हे रंग संप्रेरकांच्या पातळीप्रमाणे प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबी शोषतात व बाहेर फेकतात. ऑक्टोपसच्या शरीरात मेंदू व त्वचा त्याला छद्मावरण करण्यास मदत करतात. त्यांच्या त्वचेतील ‘ऑप्सिन’ नावाचं प्रथिन, परिसरातला प्रकाश कमी व जास्त होऊ लागल्यास, मेंदूच्या मदतीशिवाय त्वचेचा रंग बदलतं.
ऑक्टोपसचा मेंदू परिसरातील रंगीत प्रवाळ, वाळू, खडक, शिकारी मासे व पाण्यातील कमी-अधिक प्रकाश इत्यादी माहिती पाठवतो. त्यानुसार क्रोमॅटोफोर्स व इरीडोफोर्समधील रंगद्रव्यं आकुंचन पावतात किंवा अधिक प्रमाणात रंग बाहेर फेकतात. त्वचेतल्या इरिडोफोर आणि लूकोफोर पेशी प्रकाश परावर्तित करून त्यांच्या त्वचेला चकचकीत रंग देतात. तसंच हजारो क्रोमॅटोफोर्स लाल, काळ्या, पिवळ्या, तपकिरी इत्यादी रंगद्रव्यांनी भरलेले असतात, जे रंगबदलाला कारणीभूत ठरतात.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
