– मानसी राजेश हुले
आई झाल्यावर स्त्रीच्या शरीरात आपोआप दूध तयार व्हायला लागतं. बाळ जन्मल्यानंतर काही तासांतच हे दूध येतं आणि बाळासाठी तेच मुख्य अन्न ठरतं.
दूध तयार होण्याची प्रक्रिया गर्भधारणेपासूनच सुरू झालेली असते. स्त्रीच्या स्तनांमध्ये आधीपासूनच दूध तयार करणार्या ग्रंथी असतात. गर्भधारणेदरम्यान शरीरात हार्मोन्स म्हणजे संप्रेरकांमध्ये मोठे बदल होतात. विशेषत: इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या संप्रेरकांमुळे स्तनातील ग्रंथी विकसित होतात आणि दूध तयार करण्याची तयारी सुरू होते. मात्र या टप्प्यावर प्रत्यक्ष दूध मोठ्या प्रमाणात तयार होत नाही.
बाळाचा जन्म झाल्यानंतर प्लेसेंटा म्हणजेच ‘वार’ बाहेर पडते आणि त्यामुळे प्रोजेस्टेरोनचं प्रमाण अचानक कमी होतं. हा संदेश घेऊन मेंदूतल्या पीयुषीका म्हणजेच पिट्यूटरी ग्रंथीतून ‘प्रोलॅक्टिन’ नावाचं संप्रेरक जास्त प्रमाणात स्रवायला लागतं. दूध तयार करण्याचं मुख्य काम हे संप्रेरक करतं. स्तनातल्या ग्रंथी रक्तातून मिळणारं पाणी, साखर, मेद, प्रथिनं आणि खनिजं यांचा उपयोग करून दूध तयार करतात.
बाळ स्तनपान करतं, तेव्हा नुसतं दूध पिणंच होत नाही, तर शरीराला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. बाळाच्या दूध-शोषणामुळे मातेच्या शरीरात ‘ऑक्सिटोसिन’ नावाचं संप्रेरक स्रवतं. यामुळे तयार झालेलं दूध स्तनातून बाहेर येतं. जितकं जास्त स्तनपान, तितकं जास्त दूध तयार होण्याचा संकेत शरीराला मिळतो. म्हणूनच बाळाने नियमित स्तनपान केल्याने दूध बराच काळपर्यंत तयार होत राहतं.
दुधात पाणी, साखर, मेद, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि रोगप्रतिकारक घटक असतात. हे सगळं बाळाच्या वाढीसाठी आणि आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक असतं. सुरुवातीला येणारं घट्ट पिवळसर चिकाचं दूध म्हणजेच ‘कोलोस्ट्रम’, बाळासाठी विशेष फायदेशीर असतं. सर्वप्रथम हे कोलोस्ट्रम एखाद्या ‘लसी’प्रमाणे काम करत बाळाची प्रतिकारशक्ती वाढवतं. या दुधातल्या पेशींमध्ये जवळजवळ दोनतृतीयांश पेशी या प्रतिकारशक्ती वाढवणार्या पांढर्या पेशी असतात. कोलोस्ट्रम दुधामुळे जठर आणि अन्ननलिका यांच्या आतल्या भागावर रोगजंतू नष्ट करणारा पातळसा थर निर्माण होतो. जन्मत: बाळाचं जठर हे जेमतेम एखाद्या लहानशा गोटीएवढं असतं. तेव्हा त्यात अगदी थोडं दूध सामावलं, तरी ते दाट असल्यामुळे, त्यात बाळाला आवश्यक ते सर्व घटक असतात. नंतर येणार्या पातळ दुधापेक्षा, पहिले काही दिवस येणार्या या दुधात जवळजवळ दुप्पट जास्त प्रथिनं आणि खूप कमी चरबी आणि शर्करा असते, ज्यामुळे हे दूध सहज पचतं.
बाळाच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीसाठी अनेकविध गुणधर्म असलेलं मातेचं दूध हे संप्रेरक मेंदू, स्तनातल्या ग्रंथी आणि बाळाचं स्तनपान यांचा एक नैसर्गिक आणि अचूक समन्वय आहे!
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
