आपण चित्रपटात पाहतो की गाडीच्या काचेला बंदुकीची गोळी (बुलेट) लागते, काच फुटते पण काचेचे तुकडे विखुरले न जाता तिथे जाळीदार नक्षी तयार होते. बुलेट आरपार न जाता तिथेच रुतून बसते आणि गाडीतली व्यक्ती सुरक्षित राहते. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती किंवा लष्करी अधिकारी यांच्यासारख्या देशासाठी महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांना, अशी संरक्षण देणारी बुलेटप्रूफ काच असते. वेगवान गोळीपासून सुरक्षित ठेवणारी बुलेटप्रूफ काच!

साध्या काचेतून गोळी मारल्यास ती आरपार जातेच, पण काचेचे तुकडेही सगळीकडे उडून इजा होण्याची शक्यता जास्त वाढते. बुलेटप्रूफ काच ही साध्या काचेसारखीच दिसते. पण बुलेटप्रूफ काचेची रचना वेगळी असते. या काचेमध्ये काच, प्लास्टिक आणि इंटरलेयर (चिकटणारा पातळ पडदा) यांचे अनेक थर असतात. बुलेटप्रूफ काचेच्या जाडीप्रमाणे हे थर एकापासून दहापर्यंत असू शकतात. काचेच्या उपयोगानुसार, काचेची जाडी आणि त्यातल्या थरांची संख्या ठरवली जाते. म्हणजे बॅन्क काउंटरसाठी २५ मिलिमीटरची जाडी पुरेशी असते; पण राष्ट्रपतींसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांमध्ये बुलेटप्रूफ काचेची जाडी ७० मिलिमीटर ठेवली जाते.

काचेच्या थरांच्या निश्चितीनंतर, त्यातले दूषित घटक, डाग काढून, प्रत्येक थर काळजीपूर्वक स्वच्छ केला जातो. थरांमध्ये साधी आणि टेम्पर्ड (उष्णतेतील बदल, आघात सहन करू शकणारी) काच वापरली जाते. जिथून आघात होण्याची शक्यता असते, त्या बाजूला बहुधा अशी टेम्पर्ड काच लावतात. पॉलिकार्बोनेट किंवा ॲक्रेलिकसारखे मजबूत, पारदर्शक प्लास्टिक वापरले जाते. काच-प्लास्टिक चिकटवणार्‍या इंटरलेयरसाठी पॉलिविनाइल ब्युटिरल किंवा थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथेन वापरले जाते.

थरांतली हवा पूर्णपणे काढण्यासाठी काच-इंटरलेयर-प्लास्टिकचे ‘सँडविच’ ऑटोक्लेव्ह (विशेष भट्टी) मध्ये उच्च तापमान आणि दाबाखाली ठेवले जाते. या लॅमिनेशन प्रक्रियेमुळे प्लास्टिक वितळून सर्व थर घट्टपणे एकमेकांना चिकटतात आणि एक मजबूत, पारदर्शक काच तयार होते. लॅमिनेशननंतर काचेला हळूहळू थंड करतात. काचेला आकार देऊन त्यावर आवश्यकतेनुसार इतर थर दिले जातात. उदाहरणार्थ ओरखडारोधक थर!

काचेचा टिकाऊपणा आणि परिणामकारकता तपासण्यासाठी चाचण्या केल्या जातात. गोळी जेव्हा बुलेटप्रूफ काचेवर आदळते, तेव्हा काचेचा बाहेरचा थर फुटतो. गोळीची ऊर्जा आतल्या पॉलिमर आणि काचेच्या अनेक थरांमध्ये पसरते आणि शोषली जाते. पॉलिमरच्या लवचीक थरामुळे गोळीचा वेग कमी होतो, परिणामी गोळी काच भेदू शकत नाही आणि आतल्या व्यक्तीचे संरक्षण होते. एकदिशीय बुलेटप्रूफ काचेत गोळी बाहेरून आत येत नाही, पण आतून बाहेर जाऊ शकते. तर द्विदिशीय बुलेटप्रूफ काच दोन्ही दिशांनी येणार्‍या गोळ्या थांबवते.

-चारुशीला सतीश जुईकर
मराठी विज्ञान परिषद