– गिरीश घाटे
गाडीचं इंजिन सुरू होतं, दिवे लागतात, हॉर्न वाजतो. या सगळ्यामागे काम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे गाडीची बॅटरी. गाडीच्या कार्यात बॅटरी आवश्यक आहे. पण ती नेमकी कशी काम करते आणि काही वर्षांनी ती का बदलावी लागते, याचा विचार आपण क्वचितच करतो. चला, गाडीच्या बॅटरीचं जीवनचक्र समजून घेऊया.
बहुतेक गाड्यांमध्ये लेड- ॲसिड बॅटरी वापरली जाते. तिच्यामध्ये शिशाच्या आणि लेड डायऑक्साइडच्या प्लेट्स असतात. या प्लेट्स सल्फ्युरिक आम्ल आणि पाण्याच्या द्रावणात बुडालेल्या असतात. या द्रावणाला ‘इलेक्ट्रोलाइट’ म्हणतात.
गाडी सुरू करताना बॅटरीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेत शिशाच्या प्लेट्समधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि तारांमधून वाहू लागतात. इलेक्ट्रॉनच्या या प्रवाहालाच विद्युतप्रवाह म्हणतात. हाच प्रवाह स्टार्टर मोटरला मिळून इंजिन सुरू होतं. इंजिन सुरू होऊन गाडी चालू लागल्यावर अल्टरनेटर कार्यरत होतो. तो वीज निर्माण करून बॅटरी पुन्हा चार्ज करतो. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया उलट दिशेने घडते आणि वापरलेली ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाते. अशा प्रकारे बॅटरी सतत डिस्चार्ज आणि चार्ज होत राहाते.
बॅटरीचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचं चक्र हजारो वेळा चालतं. मात्र प्रत्येक वेळी प्लेट्सवर लेड सल्फेटचा थोडासा थर तयार होतो. चार्जिंगदरम्यान त्यातील बहुतांश थर निघून जातो; पण काही भाग कायम राहतो. कालांतरानं हा थर जाड होत जातो. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया मंदावते आणि बॅटरीची वीज साठवण्याची क्षमता कमी होते. यालाच ‘सल्फेशन’ म्हणतात.
याशिवाय गाडीच्या धक्क्यांमुळे आतल्या प्लेट्स झिजतात आणि त्यांचे सूक्ष्म कण तळाशी साचतात. हे कण वाढल्यास शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण होतो. तसंच इंजिनच्या उष्णतेमुळे इलेक्ट्रोलाइटमधलं पाणी कमी होतं. त्यामुळे प्लेट्स उघड्या पडून त्यांवर गंज चढतो. गाडी दीर्घकाळ न वापरणं किंवा चार्जिंग यंत्रणेत बिघाड असणं यामुळेही बॅटरीचं आयुष्य कमी होतं.
बॅटरी खराब होण्यापूर्वी काही संकेत दिसू लागतात. गाडी सुरू होण्यासाठी जास्त वेळ लागतो, स्टार्टर मंद फिरतो किंवा हॉर्नचा आवाज मंदावतो. योग्य देखभाल, नियमित वापर आणि चार्जिंग यंत्रणा व्यवस्थित असल्यास गाडीची बॅटरी साधारण दोन ते तीन वर्षं टिकते. त्यानंतर तिची कार्यक्षमता कमी होत जाते आणि अखेरीस ती बदलावी लागते.
थोडक्यात, गाडीच्या बॅटरीच्या आत सतत रासायनिक प्रक्रिया सुरू असतात. या प्रक्रियांची हजारो चक्रं पूर्ण झाल्यानंतर तिची कार्यक्षमता कमी होते आणि अखेरीस नवीन बॅटरीची गरज भासते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
