धुकं, दव आणि दहिवर हे हिवाळ्यातल्या हवामानाचे नैसर्गिक आविष्कार आहेत. यासाठी हवा थंड आणि स्थिर असावी लागते. तसंच त्या हवेत बाष्पाचं प्रमाण अधिक असणं आवश्यक असतं.

हिवाळ्यात रात्री जमिनीचा पृष्ठभाग वेगाने थंड होतो. त्याजवळची हवा खूप थंड होते. वरची हवा तुलनेने उबदार राहते. त्यामुळे थंड हवा खालीच अडकून राहते. हवेतल्या पाण्याची वाफ जेव्हा एखाद्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते, तेव्हा तिचं द्रवीकरण होऊन, सूक्ष्म जलकणांत रूपांतर होतं. हवेत असलेल्या सूक्ष्म धुळीच्या कणांभोवती हे जलकण जमा होतात आणि त्यांचं धुकं तयार होतं. वर उबदार हवा असल्यानं ही थंड हवा वर जाऊ शकत नाही. त्यामुळे धुकं बराच वेळ टिकून राहतं. हवेतल्या जलकणांची घनता वाढली, की धुकं दाट होतं आणि दृश्यमानता कमी होते.

धुकं चार प्रकारचं असतं. ‘प्रसारण धुकं’ रात्री जमिनीचं तापमान कमी झाल्यामुळे तयार होतं. ‘अभिवहन धुकं’ उबदार, ओलसर हवा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यावर तयार होतं. ‘खोर्‍यातलं धुकं’ थंड हवा खाली साचल्यामुळे दर्‍यांमध्ये तयार होतं आणि ‘सीमारेषेवरलं धुकं’, थंड आणि उबदार हवामानाच्या सीमारेषेवर तयार होतं. खरं तर धुकं म्हणजे जमिनीवर उतरलेले पाण्याच्या सूक्ष्म थेंबाचे ढगच असतात.

हवेमध्ये तिच्या तापमानानुसार विशिष्ट प्रमाणात पाण्याची वाफ असते. गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त पाणी साठवू शकते. जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढते तेव्हा ती संपृक्त होते. ही बाष्पाने संपृक्त झालेली हवा, अतिथंड वस्तूंच्या जवळ आल्यास तिचं सांद्रीभवन होतं आणि तिचं सूक्ष्म जलबिंदूंमध्ये रूपांतर होतं. या जलबिंदूंनाच ‘दवबिंदू’ म्हणतात. हे दवबिंदू झाडांच्या पानांवर, गवताच्या पात्यांवर किंवा काचेच्या तावदानावर जमा होतात.  

ज्या प्रदेशांतलं तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं, अशा प्रदेशात वातावरणातलं बाष्प गोठून त्याचं, बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकांमध्ये रूपांतर होतं. असे बर्फाच्या सूक्ष्म स्फटिका़ंचे थर झाडांच्या पानांवर, गवताच्या पात्यांवर जमतात. त्यांना दहिवर किंवा ‘फ्रॉस्ट’ असं म्हणतात.

धुकं तयार होण्यासाठी जमिनीचं तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि दव व दहिवर तयार होण्यासाठी ते शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणं आवश्यक असतं. धुकं म्हणजे वातावरणातील आर्द्रता पाण्याच्या सूक्ष्म कणांच्या रूपाने हवेत तरंगणं. दव म्हणजे वातावरणातील आर्द्रता जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होऊन पाण्याच्या थेंबांच्या रूपात जमणं. हेच दवबिंदू जेव्हा गोठतात आणि त्यांचं बर्फाच्या सूक्ष्म स्फटिकांमध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्यांना दहिवर म्हणतात.