गारा बरसू लागल्या की उन्हाळा संपून पावसाळा सुरू होणार या ऋतूबदलाची चाहूल लागते. तपांबर म्हणजे ‘ट्रोपोस्फियर’ हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वांत खालचा, जमिनीलगतचा आणि महत्त्वाचा थर आहे. भूपृष्ठापासून सुमारे १३ ते १६ किलोमीटर उंचीपर्यंत हा थर विस्तारलेला आहे. या थरातच हवामान बदल, ढग, पाऊस आणि वादळे निर्माण होतात
‘क्युम्युलोनिंबस’ या उभ्या रेषेत वाढणार्या ढगांमध्ये गारा तयार होतात. या ढगांना ‘वादळी ढग’ असंही म्हणतात. या ढगांची वाढ तपांबराच्या खालच्या स्तरापासून सुरू होऊन ती उभ्या रेषेत वर सरकते व पूर्ण तपांबर व्यापते. कमी उंचीवरचे ढग पाण्याच्या थेंबापासून तयार झालेले असतात, तर जास्त उंचीवरचे ढग बर्फाच्या कणांचे असतात. हे ढग विजांच्या गडगडाटांसह पाऊस व गारा पाडतात. अगदी चक्रीवादळसुद्धा निर्माण करतात.
हे ढग तयार होण्यासाठी भरपूर आर्द्रता, अस्थिर वारे आणि त्यांना वर ढकलणारी उष्णता आवश्यक असते. उन्हामुळे तापलेली हवा हलकी होऊन ती बाष्पासह वेगाने वर जाते. याला ‘उर्ध्ववाहिनी’ म्हणतात. यामुळे वार्याचे प्रवाह तयार होतात. ढगांच्या वरच्या अतिथंड भागात हे थेंब गोठतात आणि त्यांचे लहान बर्फाचे कण तयार होतात. जोरदार वार्यामुळे हे कण हवेत वर-खाली फिरत राहतात. फिरत असताना प्रत्येक वेळी त्यांच्यावर नवीन पाण्याचा थर जमा होऊन तो गोठतो आणि बर्फाचे कण मोठे होत जातात.
या मोठ्या आकाराच्या बर्फाच्या गोळ्यांना ‘गारा’ म्हणतात. जेव्हा हे बर्फाचे गोळे खूप जड होतात आणि वारा त्यांना हवेमध्ये पेलू शकत नाही, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे ते गारांच्या रूपात जमिनीवर पडतात. गारांमध्ये गोठलेल्या पाण्याचे थर किंवा पापुद्रे दिसतात. गारा ५ मिलिमीटर ते १५ सेंटिमीटर व्यासापर्यंतच्या आकाराच्या असतात. सर्वात मोठी गार अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्यातील विवियन गावात २३ जून २०१० रोजी पडलेली २० सेंटिमीटर व्यासाची आणि ९०० ग्रॅम वजनाची होती.
गारांच्या वर्षावाचा म्हणजेच गारपिटीचा वेग गारांच्या आकारावर, गारांच्या हवेतल्या घर्षणावर, स्थानिक वार्याच्या वेगावर आणि गारांच्या वितळण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. ५ सेंटिमीटर व्यासापेक्षा कमी आकाराच्या गारांचा जमिनीवर पडण्याचा वेग हवेत तासाला १५ ते ४० किलोमीटर असतो. ५ ते १० सेंटिमीटर व्यासाच्या आकाराच्या गारांचा वेग तासाला ७० ते ११५ किलोमीटर असतो. गारपिटीचे क्षेत्र अंदाजे पाच हजार चौरस मीटर ते अडीच हजार चौरस किलोमीटर असू शकते. ढगांची ताकद, उर्ध्ववाहिनी, वार्यांची रचना व हालचाल आणि आर्द्रता यांवर गारपिटीचे क्षेत्र अवलंबून असते.
– अनघा शिराळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
